Tuesday, December 19, 2017

सशस्त्र सेनादल ध्वजदिन निधी संकलन 2017-2018 विशेष मोहिम  

नांदेड, दि. 19 :-  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या दालनात सशस्त्र सेनादल ध्वजदिन निधी संकलन 2017-2018 विशेष मोहीम राबविण्याकरिता मा. विभागीय आयक्त , औरंगाबाद यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आवाहन केले की, जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी , कर्मचाऱ्यांकडून निधी त्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी रुपये आठशे, अधिकारी वर्ग - एक रुपये पाचशे, अधिकारी वर्ग - दोन रुपये तीनशे , कर्मचारी वर्ग - तीन रुपये दोनशे तसेच कर्मचारी वर्ग- चार यांनी स्वेच्छेनुसार ध्वजदिन निधी संकलीत करुन जिल्ह्यास दिलेला इष्टांक रुपये 50 लक्षापर्यंत पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला . सदरचा निधी दिनांक 31 डिसेंबर, 2017 पर्यंत उत्स्फुर्तपणे जमा करण्याचा निर्धार सर्व कार्यालय प्रमुखांनी केला याबाबतचे सर्वांना आवाहन पत्रकाचे वाटप करण्यात आले. संकलित झालेला निधी जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांच्या नावे, रोखीने , धनादेश, धनाकर्ष स्वरुपात बनवून जिल्हा  सैनिक कार्यालय, नवीन तहसील कार्यालय आवार , चिखलवाडी कॉर्नर , नांदेड यांच्याकडे जमा करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे. या बैठकीचे प्रास्ताविक श्री. कमलाकर शेटे कल्याण संघटक यांनी केले .
****






जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी
26 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            नांदेड, दि. 19 :- महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाव्दारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्यावतीने गत वर्षीपासून राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या सन 2016-17 च्या पुरस्कारासाठी पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका विहित नमुन्यात   दि. 26 डिसेंबर 2017 पर्यंत तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे कार्यालयीन दिवशी सादर करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर  यांनी पत्रकाव्दारे केले आहे.  
 जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करून पाणी प्रश्न सोडविण्यासात योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. गत वर्षीपासून या पुरस्काराला सुरूवात करण्यात आली असून यासंबंधीचा शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 28 सप्टेंबर 2016  दि. 24 आक्टोबर 2016 9 ऑगस्ट 2017  रोजी निर्गमीत केले आहेत.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील साप्ताहिके व पाक्षिकांतील लिखाणाचा विचार केला जाईल. या पुरस्कारासाठी मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असे गट करण्यात आले आहेत. दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
मुद्रित माध्यम गटासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील. यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला 31 हजार, व्दितीय क्रमांकास 21 हजार, तृतीय क्रमांकास 15 हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला 50 हजार, व्दितीय क्रमांकाला 35 हजार, तृतीय क्रमांकाला 25 हजार तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला 1 लाख, व्दितीय क्रमांकाला 71 हजार, तृतीय क्रमांकाला 51 हजार असे बक्षीस देण्यात येते, या स्पर्धेत विजेत्या सर्वांना स्मृतीचिन्ह देण्यात येते. तसेच इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर तीन पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, व्दितीय क्रमांकास 71 हजार तर तृतीय क्रमांकास 51 हजारांचे बक्षीस देण्यात येते. याच बरोबर प्रत्येक विजेत्यास स्मृती चिन्ह देण्यात येते.
मुद्रित माध्यम गटासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार या पुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. एका वृत्तपत्राच्या एका आवृत्तीच्या एकाच पत्रकारास या स्पर्धेत भाग घेता येईल. एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्यातून प्रसिध्द होणारी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमध्ये प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच विचार केला जाईल.
पुरस्कारासाठी मागील पाच वर्षाची कामगिरी, त्याची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. सलग दोन वर्षे एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका स्विकारली जाणार नाही.
स्पर्धेत भाग घेत असलेल्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत कोणाचेही शिफारस पत्र जोडण्याची आवश्यकता नाही. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाची कागदपत्रे त्यांच्या दोन प्रतीसह पाठवावे लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका त्यासोबत पाठविलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड केलेली कागदपत्रे, न वाचता येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, अशा प्रवेशिका रद्द समजल्या जातील.
पुरस्कार पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमीत केलेला शासन निर्णय पाहावा. प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तरी दि. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या कात्रणांसह आपल्या प्रवेशिका दि. 26 डिसेंबर 2017 पूर्वी पोहोचतील या बेताने जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे  पाठवाव्यात. उशीरा आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.

**** 
नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका कार्यालयात
मुख तपासणी शिबीर संपन्न  2017       /
नांदेड, दि. 19 :- मुख स्वास्थ हे सर्व शरीराच्या स्वास्थाचे गमक आहे. त्याचप्रमाणे मुख स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुढील पुष्कळ आजारांपासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आढळून येतो. मौखिक कर्करोग जर पुर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परावर्तीत होण्यापासून आपण वाचवू शकतो. तंबाखूचे सेवन करणे हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.            दि. ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१७ हा कालावधी मुख स्वास्थ तपासणी मोहीम म्हणून साजरा होत आहे. त्या अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कार्यालयातील ३० वर्षावरील एकूण १०५ कर्मचाऱ्यांची मुख तपासणी आज करण्यात आली. सदर तपासणी ही जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बी.पी.कदम व अति-जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार             डॉ. साईप्रसाद शिंदे, दंतशल्यचिकीत्सक डॉ.किरण घोडजकर, डॉ. अशरफ कुरेशी, समुपदेशक प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व दंत सहाय्यक प्रमोद भिसे यांनी तपासणी करून मुखाचा कर्करोगाविषयी उपस्थितांना समुपदेशन केले.
****



जिल्हा प्रशासनाच्यावतीने
अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
नांदेड दि. 19 :- दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड येथे साजरा करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन श्री. राठोड, उपकोषागार अधिकारी, तहसीलदार (सामान्य), तहसीदार स.सा. आणि अल्पसंख्यांक सदस्य, शहरातील नागरिक कार्यालयातील सर्व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी व जिल्हा नियोजन अधिकारी श्री.राठोड यांनी अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना कशाप्रकारे राबविण्यात आल्याबाबतची माहिती दिली.
अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशिर हक्काबाबत जाणीव करुन देण्यासाठी प्रतिभा महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य हरमेंद्रसिंग अजायबसिंग, जिल्हा अल्पसंख्यांक संनियंत्रण समितीचे माजी सदस्य मोहमद जुबेर अहमद यांना व्याख्याता म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने निमंत्रीत करण्यात आले होते.
त्यांनी अल्पसंख्यांक जाती-जमातीमध्ये सहा घटकांचा समावेश असून हे सर्व संख्येने कमी आहेत, म्हणून अल्पसंख्यांक आहेत, ते गुणवत्तेने कुठेही कमी नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात समावून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातूनच निती आखली, पण त्या घेण्यासाठी अल्पसंख्यांकातील विविध घटकांना सक्षम बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्यांची भावना जोपसण्याची आवश्यकता असून आणि अल्पसंख्यांकाकरिता शासनामार्फत भरपूर सहाय्यता प्राप्त झाल्याबाबत शासनाचे आभार मानले. आयोगामार्फत महिलांसाठी बचत व लघुउद्योग यासारख्या योजना राबविल्यास अल्पसंख्यांकांची उन्नती होईल, अशी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानाचा नवीन पंधरा कलमी कार्यक्रमाविषयी ठळक वैशिष्ट्याबाबत माहिती सांगितली व अल्पसंख्यांकाबाबत शासन सर्वतोपरी जागरुक आहे, असे संबोधित केले. त्यानंतर निवासी उपल्हिाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करुन, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले .
****




24 डिसेंबर रोजी किनवट येथे
विनामुल्य भव्‍य ग्रामीण आरोग्य शिबीराचे आयोजन    
नांदेड, दि. 19 :- महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक 24 डिसेंबर, 2017 रोजी विनामुल्य भव्‍य ग्रामीण आरोग्य शिबीराचे आयोजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे मार्गदर्शन व संयोजनाने तसेच नांदेड जिल्हा प्रशासन व निरामय सेवा फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अटल मैदान, एम. आय.डी.सी., गोकूंदा रोड, किनवट जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबीराचे उद्घाटन दिनांक 24 डिसेंबर, 2017 रोजी सकाळी 9-00 वाजता होणार आहे.    
सदर शिबीरासाठी भव्य मंडप उभारणीचे काम दिनांक 13 डिसेंबर, 2017 रोजी लंगर साहिब नांदेडचे बाबा अमरजितसिंहजी यांच्या शुभ हस्ते भुमि पुजन करण्यात आलेले आहे. सदर शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. सदर समित्या जिल्ह्याच्या विविध आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.   
या शिबीरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर व भोकर या पाच तालुक्यातील सर्व गरजू व गरीब रुग्णांना महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथील दोनशे तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व उपचार लाभणार आहे. या शिबीरात रुग्णांची मोफत तपासणी, चाचणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, लठ्ठपणा तपासणी, स्तन कर्करोग तपासणी केली जाणार आहे. तसेच या शिबीरातंर्गत रक्तदान शिबीर व अवयवदान अर्ज भरणे या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या शिबीरात निदान झालेल्या नेत्ररोग, ह्दयरोग, अस्थिव्यंग रोग, जनरल सर्जरी, मेंदूरोग, बालरोग, मुत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, स्त्री रोग, कर्करोग, ग्रंथींचे विकार, लठ्ठपणा , मानसिक आरोग्य , श्वसन विकार, क्षयरोग, त्वचारोग, गुप्तरोग, अनुवांशिक आजार, कान, नाक, घसा यांचे आजार यासारख्या दुर्धर आजारांवर सुसज्ज व उच्चश्रेणीच्या रुग्णालयात सल्ला व उपचार सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती येथील जिल्हाधिकारी , नांदेड यांनी दिली आहे.    
या शिबीरासाठी शिबीरपूर्व तपासणी अभियान दिनांक 15 ते 23 डिसेंबर, 2017 या कालावधीत पाच तालुक्यांच्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी रुग्णालय तसेच प्राथमिक उपकेंद्र या ठिकाणी राबविण्यात येत आहे. दिनांक 15 डिसेंबर, 2017 पासून आजपर्यंत 20 हजार रुग्णांची विविध आजारांसाठी शिबीरपूर्व तपासणीत नोंदणी झालेली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आरोग्यदूत श्री. रामेश्वरजी नाईक , श्री. संदिप जाधव आणि महाआरोग्य शिबीर समन्वयक डॉ. यशवंत पाटील शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असून सर्व जिल्हा प्रशासन या शिबीराचा लाभ तळागाळातील गोरगरीब रुग्णांना मिळावा . यासाठी कार्यरत आहेत असे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. तसेच या लोकसहभागातून पार पाडणाऱ्या शिबीरासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
****     



महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...