शेतकरी पीक कर्ज माफीचे
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
नांदेड दि. 26 :- राज्य
शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या पीक
कर्ज माफी योजनेतंर्गत राज्य शासनाच्या आपले सरकार https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्याचबरोबर https://www.csmssy.in या पोर्टलवर अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. अर्ज भरण्यासाठी
शेतकऱ्यांना आधार कार्ड, कर्ज खाते उतारा, बँक पासबुक व आधार
कार्ड लिंक केलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. या कागदपत्रासह जिल्ह्यातील
कोणत्याही "आपले सरकार सेवा केंद्रामधुन" अर्ज भरता येईल, अशी माहिती
उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी दिली आहे.
या योजनेचा लाभ
घेण्यासाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया नांदेड तालुक्यातील बाभुळगाव
येथुन सुरु करण्यात आली आहे. या पीक कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे
आवश्यक आहे. अर्जाचा नमुना सर्व बँक शाखांमध्ये, ग्रामपंचायत कार्यालयात व
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिव यांचेकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी
कर्ज माफीचे अर्ज ऑनलाईन भरत असताना किंवा कर्ज वाटपासंबंधाने काही अडचण असल्यास
दर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या
वेळेत तहसिल कार्यालय येथे तालुकास्तरीय समन्वय समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन
तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले. पीक कर्ज माफी व ऑनलाईन अर्ज भरणे संबंधी उपनिबंधक
पी. ए. साठे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वि. का. सेवा
सहकारी संस्थेचे अध्यक्ष पी. एम. मोरे, सचिव एन. सी. कोटुरवार, संस्थेचे लाभधारक
शेतकरी, महा ई सेवा केंद्राचे संचालक श्री. आसोरे उपस्थित होते.
0000000