Friday, July 10, 2020


वृत्त क्र. 633   
      प्रधानमंत्री पिक विमा योजनेत
शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड दि. 10 (जिमाका) :- अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा असणे अत्यंत आवश्यक असून यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. शासनातर्फे यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली असून याअंतर्गत पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पिक विमा हप्ता भरण्यासाठी शेवटच्या आठवड्याची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरावा. शेतकऱ्यांनी स्वत:च्या लॉगीन वरुन पिक विमा भरण्यास प्राधान्य देऊन सी.एस.सी. सेंटरवर किंवा बँकेत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम व पुर्नरचित हवामान आधारित फळ पिक विमा मृग बहार 2020-21 ची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. सी. एस. सी. सेंटरने पिक विमा भरतांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारु नये तसे आढळल्यास संबंधित सेंटरवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी  दिले.  
बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकरी आर. बी. चलवदे, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक गणेश पठारे, सरव्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ए. एस. शिंदे, कृषि विकास अधिकारी ए. बी. नादरे, तंत्र अधिकारी पी. ए. गायके, विमा कंपनी प्रतिनिधी गौतम कदम, सी.एस.सी. प्रतिनिधी सदाशिव पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी चालू खरीप हंगामात आतापर्यंत एक लाख लाभार्थ्यांनी अर्ज केले असल्याची माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी दिली. शासन निर्णय 29 जुन 2020 नुसार खरीप हंगाम सन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी इफको टोकियो जनरल इंशुरन्स कंपनी लि. या कंपनीची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 आहे. ही योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनअंतर्गत 70 टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. जिल्हयाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 42 हजार 861 हेक्टर / आर असुन त्यापैकी 6 लाख 19 हजार 670 हेक्टर (83.42 टक्के) क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
000000


वृत्त क्र. 632   
नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 22.54 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात शुक्रवार 10 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 22.54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 360.59 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 258.84 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29.04 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 10 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 46.38 (289.94), मुदखेड- 27.33 (200.00), अर्धापूर- 49.00 (219.67), भोकर- 26.50 (290.73), उमरी- 11.33 (204.95), कंधार- 2.00 (154.84), लोहा- 7.00 (251.33), किनवट- 44.29 (252.38), माहूर- 20.25 (228.00), हदगाव- 35.86 (285.58), हिमायतनगर- 68.00 (494.66), देगलूर- 4.67 (221.77), बिलोली- 1.00 (236.60), धर्माबाद- 11.67 (293.32), नायगाव- 4.60 (222.60), मुखेड- 0.71 (295.12). आज अखेर पावसाची सरासरी 258.84 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4141.49) मिलीमीटर आहे.
000000


वृत्त क्र. 631   
कोरोनातून 5 व्यक्ती झाले बरे
 34 व्यक्ती बाधित तर एकाचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 10 :- कोरोनाचे जिल्ह्यातील आव्हान वाढत असून आज प्राप्त झालेल्या एकुण 188 अहवालांपैकी 132 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले तर नवीन 34 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळले. त्यामुळे‍ जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची एकुण संख्या 558 एवढी झाली आहे.    
कोरोना आजारातून आज 5 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 2 बाधित, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित तसेच औरंगाबाद येथे संदर्भित झालेला 1 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 358  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. 
आज शुक्रवार 10 जुलै रोजी कंधार इमामवाडी येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत रुग्णांची संख्या 25 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये नांदेड वाघाळा 41 वर्षाचा 1 पुरुष, गोकुळनगर येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड मोमिनपुरा येथील 55 वर्षाची 1 महिला, नांदेड हबिबियानगर येथील 70 वर्षाचा 1 पुरुष, दशमेश नगर बाफना येथील 57 वर्षाची 1 महिला, देगलूरनाका येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, गणेशनगर नांदेड येथील 14 वर्षाची 1 महिला, विजयनगर येथील 68 वर्षाची 1 महिला, वजिराबाद येथील 54 वर्षाचा 1 पुरुष, रविनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, धुमाळवाडी येथील 45 वर्षाची 1 महिला, 25 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली गांधीनगर येथील 16 वर्षाचा 1 मुलगा, बिलोली तालुक्यातील फारुकी येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील तबलीन गल्ली येथील 11 बाधितांमध्ये 3 वर्षाचा बालक, 16,45,43,27 वर्षाचे 4 पुरुष, 9, 13 वर्षाच्या 2 मुली, व 35, 43, 28, 30 वर्षाच्या 4 महिला, मुखेड व्यंकटेशनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, 38 वर्षाची 1 महिला, मुखेड वाल्मिकनगर येथील 22 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड मदनलपूर येथील 50 वर्षाची 1 महिला, 56 वर्षाचा 1 पुरुष, कंधार इमाम वाडी येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव बळवंतनगर येथील 12 वर्षाचा 1 बालक, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 33 वर्षाचा 1 पुरुष, परभणी आनंदनगर येथील 34 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. (नमूद वरीलपैकी 18 बाधित व्यक्तींचा अहवाल गुरुवार 9 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. तसेच उर्वरित 16 बाधित व्यक्तींचा अहवाल शुक्रवार 10 जुलै रोजी दुपारी प्राप्त झाला आहे.)
आज 175 पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची त्यात 10 महिला आणि 8 पुरुष बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात एकुण 558 बाधितांपैकी 25 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर 358 बाधित व्यक्ती बरे झाले आहेत. उर्वरीत 175 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 50, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 58, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 28, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 5, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 4 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.
शुक्रवार 10 जुलै रोजी 266 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 592,
घेतलेले स्वॅब- 7 हजार 860,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 497,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 34,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 558,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 24,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 6,
मृत्यू संख्या- 25,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 358,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 175,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 266 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


सुधारीत वृत्त क्र. 630  

जिल्ह्यात 12 जुलैच्या मध्यरात्री पासून 20 जुलै पर्यंत संचारबंदी
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश
नांदेड दि. 10 (जिमाका) :- कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून रविवार दिनांक 12 जुलै रोजी मध्यरात्री पासून ते सोमवार 20 जुलै 2020 च्या मध्यरात्री पर्यंत जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभर संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत. ही संचारबंदी दिनांक 12 जुलै रोजी मध्यरात्रीपासून असल्याने त्याचा अंमल हा 13 जुलैच्या सकाळपासून 20 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत राहिल.
या संचारबंदीतून काही मुलभूत अत्यावश्यक सुविधांचा विचार करुन पुढील बाबी, आस्थांपना, व्यक्ती व समुहाला सूट देण्यात आली आहे. सर्व शासकिय कार्यालये त्यांचे कर्मचारी, त्यांचे वाहने, सर्व शासकिय वाहनास यात सुट आहे. शासकिय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल. सर्व शासकिय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकिय रुग्णालयातील कर्मचारी वैद्यकिय अत्यावश्यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकिय दवाखाने व औषधालये यांना सुट देण्यात आली आहे. प्रिंट मेडीया / ईलेक्ट्रानिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्रक वितरक यांना घरपोच वर्तमान वाटपासाठी सुट असेल. रेशन / रास्तभाव दुकान हे सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीसाठी चालू राहतील.
आठवडी बाजार व भाजीपाला / फळ मार्केट बंद राहतील. भाजीपाला व फळे विक्री करणारे विक्रेते यांना एका ठिकाणी न थांबता हातगाडीवर गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत घरपोच विक्री करता येईल. दुध विक्रेत्यांना एका ठिकाणी थांबून दुध विक्री करता येणार नाही तथापि त्यांनी (गल्ली, कॉलोनी, सोसायटीमध्ये जाऊन सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत घरपोच विक्री करता येईल. ) जार वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत सकाळी 7 ते 11 यावेळेत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल.
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा न्यायालयीन अधिकारी / कर्मचारी यांना न्यायालयीन कामाकाजासाठी परवानगी असेल. घरगुती गॅस घरपोच सेवा सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत देण्यात यावी व त्याकरिता गॅस वितरक कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य असेल. विद्युत सेवा, मोबाईल टॉवर व दुरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना विभाग प्रमुखाच्या ओळखपत्राआधारे परवानगी राहिल. पेट्रोल व डिझेलपंप चालू राहतील परंतू तेथील कर्मचारी यांना कंपनीचे गणवेश व ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहिल. नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करुन तो वापरणे बंधनकारक राहिल. कोव्हिड-19 चे लक्षणे आढळून आल्यास अॅपमध्ये Self Assesment या सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी.
खत विक्री, बि-बियाणे विक्री व वाहतुक त्यांचे गोदामे, दुकाने सकाळी 7 ते 2 या कालावधीत चालू राहतील त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार तसेच कापूस व मका खरेदी केंद्रे इ. चालू राहतील. शेतीच्या पेरणी / मशागतीस संपूर्ण कामास मुभा राहिल. मालवाहतूक सेवा पुर्ववत चालू राहिल. औद्योगिक कारखाने सुरू राहतील तथापि तेथील कामगार व कर्मचारी यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था संबंधित उद्योजक / कारखानदारांनी त्याच ठिकाणी करण्याच्या अटीवर.
बॅंकेत केवळ अत्यावश्यक सेवांअतर्गत शासनखाती चलनद्वारे रक्कम भरुन घेण्याचे कामास व बॅंकेचे स्वतःचे कार्यालयीन कामास मुभा राहील. तसेच इतर व्यवहाराच्या अनुषंगाने 10 पेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत याची शाखा व्यवस्थापकांनी पुर्व दिलेल्या अटी व शर्तीनूसार नियोजन करावे.
जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी व जिल्हयात प्रवेशासाठी केवळ वैद्यकिय, अत्यावश्यक कारणाशिवाय ई-पास आधारेच प्रवासाची मुभा राहील. अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडण्यास पुर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार राहील.
सदर आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका व पोलीस विभागांनी संयुक्त पथके गठीत करण्यात आली आहेत. नगरपालिका हद्दीत नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत केले आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत केले आहेत. याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांचेकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  
सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्तीस, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच यापुर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार दंडात्मक कार्यवाहीसुध्दा करण्यात येईल.
या सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने, सुविधांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 10 जुलै 2020 रोजी निर्गमीत केले आहेत.
00000

वृत्त क्र. 629


कोरोनाच्या जागरात सकारात्मक सहभागासाठी  
मिशन पॉझिटिव्ह सोच
नांदेड (जिमाका) दि. 10 :- कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे विविध प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. या प्रयत्नांसमवेत लोकांच्या मनात कोरोना आजाराबद्दल असलेली भिती दूर करणे महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविले जाणारे मिशन पॉझिटिव्ह सोच हे अभियान जनतेच्या मनात सकारात्मक सद्भाव निर्माण करेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त करीत या अभियानास शुभेच्छा दिल्या.
या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यापासून रोखायचे असेल तर जनतेने स्वत:हून काळजी घेत सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वावरले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग खूप आव्हानात्मक आहे. लोकांनी अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. सुरक्षिततेसाठी शासनातर्फे जे काही नियम, आदेश दिले जात आहेत ते कसोशीने पाळले पाहिजेत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. मिशन पॉझिटिव्ह सोच या अभियानाचा मुळ उद्देश लोकांच्या मनात या आजाराविषयी असलेली भिती घालवून परस्परांबद्दल विश्वास निर्माण व्हावा असा आहे. यात ज्या कोविड योद्धांनी या आजारावर मात केली त्यांचे अनुभव त्यांच्याच बोलण्यातून लोकांपर्यंत पोहचावेत असा प्रयत्न केला गेला आहे. यातील मुलाखती या डिजिटल प्लॅटफॉर्म अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  
अलिकडच्या काळात व्हाट्सॲप, ट्विटर, इनस्ट्राग्राम, फेसबुक आदी सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक चुकीचे संदेश व्हायरल होत असल्यामुळे जनतेत कोरोना आजाराविषयी जनतेच्या मनात भिती व घृणास्पद भावना वाढीस लागली आहे. याची बाधा ज्यांना होते त्यांच्याविषयी अनेक गैरसमज सोशल मिडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जात आहेत. ज्या व्यक्ती या आजाराने बाधित होत आहेत त्यांना वेगळ्या मानसिक स्थितीतून जावे लागते. शिवाय ज्या कुटुंबात बाधित व्यक्ती आढळतो त्या कुटुंबाबद्दलही अनेक गैरसमज समाजात निर्माण होत असल्याने हा आजार आता एका मानसिक आव्हानावर येऊन ठेपला आहे. लोकांच्या मनातील कोविड-19 बद्दलचे असलेले गैरसमज दूर व्हावेत व बाधित व्यक्तींना समाजाकडून धीर मिळावा या उद्देशाने राज्यात प्रथमच मिशन पॉझिटिव्ह सोच हे अभियान प्रातिनिधिक स्वरुपात राबविल्या जात असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी दिली. कोरोनाविषयी एकमेकांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या भावना जितक्या अधिक प्रमाणात सोशल मिडियावर शेअर केल्या जातील तेवढ्या प्रमाणात लोकांच्या मनात या संसर्गजन्य आजाराकडे व ज्या कुटुंबातील सदस्याला हा आजार झाला त्यांच्या परिवारातील सदस्याविषयी एक वेगळी विश्वासर्हता या अभियानातून निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले. या अभियानात शासकिय विभागांसह समाजातील विविध मान्यवरांचा सहभाग घेतला जाणार आहे.
0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...