Saturday, April 18, 2020

सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय ; राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सोमवार पासून उपस्थिती 10 टक्के



नांदेड दि. 18 :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती 10 टक्के इतकी ठेवण्यात यावी. याअनुषंगाने रोटेशन पद्धतीने कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयीन सचिव, संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने दि. 18 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे आदेशीत केले आहे.  
कोरोना विषाणूंचा (कोव्हीड 19) प्रसार राज्यातील कार्यालयामध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टिने सामान्य प्रशासन विभागाकडून शासन आदेशान्वये विविध सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. शासन अधिसुचनेनुसार राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
शासन निर्णय 23 मार्च 2020 अन्वये शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती 5 टक्के इतकी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. आता 15 एप्रिल रोजीच्या अधिसुचनेनुसार लॉकडाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आल्या असल्याची बाब विचारात घेऊन तसेच यासंदर्भात सर्वंकष विचार करुन राज्याच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत राज्य शासनाने पुढीलप्रमाणे सुधारित शासन निर्णय 18 एप्रिल 2020 रोजी निर्गमीत केला आहे.
संपूर्ण राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती 10 टक्के इतकी ठेवण्यात यावी. याअनुषंगाने रोटेशन पद्धतीने कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी प्रत्येक मंत्रालयीन सचिव संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी.
तथापि मंत्रालयातील सर्व सह / उपसचिवांनी कार्यालयात उपस्थित रहाणे बंधनकारक राहील. यापैकी महिला अधिकाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीपासून सूट देण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन सचिवांना /  कार्यालय प्रमुखांना राहतील. या उपस्थितीबाबतचे आदेश सोमवार 20 एप्रिल 2020 पासून अंमलात येतील. या आदेशाचा भंग करणारे अधिकारी, कर्मचारी हे शिस्तभंगाविषयक कार्यावाहीस पात्र राहतील.
मंत्रालय उपहारगृह तात्काळ सुरु करण्यासाठी संबंधित कार्यासनाने यासंदर्भात तातडीने उचित कार्यवाही करावी.  लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये उपनगरीय सेल्वेसेवा पूर्णपेणे बंद असल्याने बृहन्मुंबई येथील शासकीय कार्यालयातील तसेच मंत्रालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयापर्यंतच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बससेवेचा उपयोग करावा. तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त अन्य ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनीही संबंधित प्राधिकरणाच्या उपलब्ध बससेवेचा उपयोग करावा.
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सींग ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या बसेसची संख्या पुरेशी नसल्याने त्यामध्ये अत्यंत गर्दी होत असल्याने कर्मचाऱ्यांना विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयात जाण्यास इच्छूक नसल्याचे दिसते. सबब या बसेसधील प्रवशांमध्ये उपलब्ध आसन व्यवस्थेपेक्षा अतिरिक्त प्रवासी घेतले जाणार नाहीत याची संबंधित स्थानिक प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या प्रशासनाने उचित दक्षता घ्यावी. तसेच तशी सूचना सर्व संबंधितांना निर्गमित कराव्यात. याकरिता सकाळी 7 ते 11 या कालावधीत तसेच सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत पुरेशा संख्येने बसेसच्या सेवा उपलब्ध होतील याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांची असलेली मोठी संख्या तसेच त्यांना दूरच्या ठिकाणावरुन करावा लागणारा प्रवास तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरील त्यांची अवलंबितता या सर्व बाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास याद्वारे आदेशित करण्यात येते की, त्यांनी सकाळी 7 ते 11 यावेळेमध्ये पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर या रेल्वेस्थानकाजवळून मंत्रालयापर्यंत (मधल्या विविध टप्पा रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनाही घेऊन) त्याचप्रमाणे सायंकाळी 4 ते 7 यावेळेत मंत्रालयापासून उक्त स्थानकापर्यंत जाण्यासाठी विशेष व पुरेशा संख्येने बसेसच्या सेवा सुरु कराव्या. बसमधील गर्दी टाळण्याकरिता दोन बसेसमधील कालावधी जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी.
बृहन्मुंबई क्षेत्राकरिता बेस्ट यांनी वरीलप्रमाणे विशेष बससेवा मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सुरु कराव्यात. या सुचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असेही सामान्य प्रशासन विभागाने दि. 18 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केले आहे.  
000000



मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट ; घरोघर वितरणावर मात्र बंदी
·         सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश
नांदेड दि. 18 :- राज्यात कोवीड-19 या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार सोमवार 20 एप्रिल 2020 पासून मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून (लॉकडाऊन) सूट देण्यात आली आहे. मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्तांना तसेच संचालनालयातील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारणेनुसार सांगण्यात आले आहे. 
कोरोना अर्थात कोवीड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र शासनाने 3 मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, जनतेची अडचण लक्षात घेऊन 20 एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना 17 एप्रिल 2020 रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली.  त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे. 
त्यानुसार, राज्यातील प्रिंट मीडियाला टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र, कोवीड 19 च्या प्रसारणाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी 10 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहे.
000000


सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना
कोविड-19 तपासणी केंद्रांची मान्यता
·         डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडचा समावेश
नांदेड, दि. 18 :- कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला होता.  यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडचा समावेश आहे.
त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत सुचित करण्यात आले होते. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात अशी तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधन सामग्री तसेच अन्य बाबी संबधित जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात याव्यात असे आदेशही देण्यात आले आहेत.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई जि. बीड; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव; राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती जि. पुणे या महाविद्यालयांचा यात समावेश आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये  कोविड-19 तपासणी केंद्र स्थापित करण्याच्या दृष्टीने विहित करण्यात आलेली मानके, कार्यपद्धती आणि अन्य बाबीची पूर्तता करण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्रमुखावर टाकण्यात आली आहे.  बाधित रुग्णांची तपासणी स्थानिक स्तरावर करणे आणि अशा रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार असल्याने या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
000000


कोरोना : नांदेड जिल्ह्याला दिलासा  
घरीच क्वारंटाईमध्ये असलेले 562 जण
            नांदेड दि. 18 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 614 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 182 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 24 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 52 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 562 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 5 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 327 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 312 नमुने निगेटीव्ह आले असून 10 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 75 हजार 776 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
000000


नांदेड शासकीय तंत्रनिकेतमध्ये
वर्क फ्रॉम होमचा यशस्वी उपक्रम
नांदेड दि. 18 :- पदविका अभ्यासक्रमाचे सम सत्र संपण्यास तीन आठवड्याचा कालावधी असतांना कोरोनामुळे राज्यात  लॉकडाऊन घोषीत झाले. यामुळे अध्यापनाचे कार्य थांबले विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक महेश शिवणकर यांच्या कुशल नियोजनाने उर्वरीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने वर्क फ्रॉम होम  हा उपक्रम प्राचार्यांच्या मार्फत राबविण्याचे निश्चित झाले. नांदेड शासकीय तंत्रनिकेतमध्ये विभाग प्रमुख अधिव्याख्यातांच्या सहाय्याने वर्क फ्रॉम होम यशस्वी रु दाखविल आहे.
नांदेड शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाखेतील विभाग प्रमुख, अध्यापक  यांच्या  मदतीने  विद्यार्थ्यांचे व्हॉटस अप ग्रुप तयार केले. ग्रामीण  भागातील  विद्यार्थ्यांकडे असणारी स्मार्ट फोनची अनुपलब्धता इंटरनेटची अनुपलब्धता इत्यादी अडचणी असतांनाही  60 ते  70 टक्के  विद्यार्थ्यांपर्य पोहचणे शक्य झाले. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शैक्षणिक माहिती उर्वरीत अभ्यासक्रमावरील नोट्स, असाईनमेंट्स, सराव परीक्षा, अभ्यास उपयोगी वेबसाईट्स, पावर पॉइंट प्रेसेंटेशन्स, मूल्य मापनासाठी प्रश्नावली, ऑनलाइन ऑडिओ आणी व्हिडी इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांकडून करवून  घेण्यात आल्या. यासाठी व्हॉटस अप ग्रुप,  झूम, मूडल, ईझिक्लास, गूगलक्लास रूम, यूट्यूब इत्यादी दृकश्राव्य साधनांचा प्रभावी उपयोग करण्यात आला. 
विद्यार्थ्यांना  सरावासाठी  ऑनलाइन टेस्ट सिरिज, क्विजेस, असाईनमेंट्स इत्यादी देण्यात आले त्याचे ऑनलाइन मूल्यमापन करण्यात आले. सर्वच विषयांचा उर्वरीत अभ्यासक्रम नियोजीत वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. वर्क फ्रॉम होम या उपक्रमाबद्दल असंख्य विद्यार्थी, णि पालकांनी व्हॉटस अपच्या माध्यमातून प्रतिक्रिया पाठवून समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसोबतच शासनाच्या मार्गदर्शनाने अध्यापकांनीही  विविध ऑनलाइन कोर्सेसला  प्रवेश घेवून गुणवत्ता वाढीवर भर देण्याचा यशस्वी प्रयत्नही या लॉकडाऊन काळात  करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य तथा स्थापत्य विभाग प्रमुख पी .डी. पोपळे, उपयोजीत यंत्र शास्त्र विभाग प्रमुख डी. एम. लोकमनवार, यंत्र विभागप्रमुख आर. एम. सकळकळे, विद्युत विभागप्रमुख व्ही.व्ही. सर्वज्ञ, स्थापत्य विभागप्रमुख एस पी कुलकर्णी, उत्पादन विभागप्रमुख एस. एम. कंधारे,  यंत्र  विभागप्रमुख एस. एस. चौधरी,  माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख एस. एन. ढोले, वैद्यकीय अणुविद्युत विभागप्रमुख बी. व्ही. यादव, विज्ञान विभाग नियंत्रक . आर. मुधोळकर यांनी प्रयत्न केले, अशी माहिती शासकीय तंत्रकिनकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी दिली आहे.   
00000

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...