Saturday, May 29, 2021

 

जिल्ह्यातील 94 केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 30 मे रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय,  हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको  या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, जंगमवाडी, दशमेश, श्रावस्तीनगर (विजयनगर) व सिडको या 11 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बिलोली, भोकर या 13 केंद्रावर  कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर या केंद्रावर कोव्हॅक्सीनेच 120 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सीनचे 80, ग्रामीण रुग्णालय बारड येथे कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 28 मे पर्यंत एकुण 4 लाख 24 हजार 325 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 29 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 86 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 8 हजार 860 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 95 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

000000

 

नांदेड जिल्ह्यात 183 व्यक्ती कोरोना बाधित

5 जणाचा मृत्यू तर 209 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 844 अहवालापैकी  183 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 87 तर अँटिजेन तपासणीद्वारे 96 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 217 एवढी झाली असून यातील 85 हजार 419 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 451 रुग्ण उपचार घेत असून 48 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  28 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, भोकर तालुक्यातील बेंबर येथील 65 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील देगाव येथील 50 वर्षाचा पुरुष तसेच 29 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 40 वर्षाच्या एका महिलेचा आश्विनी कोविड रुग्णालय, आसरानगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 880 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 42, बिलोली तालुक्यात 2, लोहा 4, परभणी 3, नांदेड ग्रामीण 13, धर्माबाद 4, मुखेड 1, बीड 1, अर्धापूर 1, हदगाव 2, नायगाव 4, भोकर 3, कंधार 3, यवतमाळ 4 तर  ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 46, हिमायतनगर 2, नायगाव 3, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 16, किनवट 3, उस्मानाबाद 1, माहूर 9, दिल्ली 1, हदगाव 3, मुखेड 4, परभणी 1 असे एकूण 183 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 209 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5, बारड कोविड केअर सेंटर 6, माडवी कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, माहूर तालुक्यांतर्गत 3, किनवट कोविड रुग्णालय 10, खाजगी रुग्णालय 45 मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 115, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, बिलोली तालुक्यांतर्गत 4, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 2 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 1 हजार 451 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 41, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 25, बारड कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 3, भोकर कोविड केअर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 5, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 3, बिलोली कोविड केअर सेंटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, एनआरआय कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 13, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 812, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 320, खाजगी रुग्णालय 108 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 117, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 109, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 39 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 34 हजार 100

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 34 हजार 21

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 217

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 85 हजार 419

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 880

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-187

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 451

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-48

00000

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना

जमात प्रमाणपत्र पडताळणीचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 29 :- वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राखीव जागेवर सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या अनुसूचित जमातीच्या जमात प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे जमात दावा पडताळणीचे प्रस्ताव समिती कार्यालयास सादर केलेला असल्यास त्यासंदर्भातील कार्यवाहीसाठी विद्यार्थ्याचे नाव, पत्ता व इतर आवश्यक माहितीसह अर्ज tcscaur.mah@nic.in या ई-मेलवर सादर करावेत, असे आवाहन औरंगाबाद विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी केले आहे.

 

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 10 डिसेंबर 2019 रोजी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विहित कालमर्यादेत जात प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याबाबत आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मराठवाडा प्रशासकीय विभागातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) या राखीव जागेवर प्रवेश घेण्यास इच्छूक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे जमात पडताळणी कार्यवाही विहित कालमर्यादेत पुर्तता करण्याचा निर्णय समितीद्वारे घेण्यात आला आहे.

 

विद्यार्थी व पालकाची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रकरणी प्रथम प्राधान्याने जमात दावा पडताळणीच्या कार्यवाहीबाबत पुर्तता करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी झाल्याने प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी सांगितले आहे.

00000

 

जगणे यापुढेही नव्याने उगवत राहिल...!

-  मनोज बोरगावकर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कधी काळी हजारो वर्षांपूर्वी अजस्त्र अशा डायनासोरचा वावर या पृथ्वीतलावर होता तेंव्हा अवघी  5 ते 6 फुट उंची असलेला माणूस या जगावर राज्य करील याचा विश्वास कोणालाच नसेल! प्रगतीचे सारी शिखरे पादाक्रांत केल्यावर मानव जात एका साध्या व्हायरसमुळे ठप्प होते हेच मुळात नव्याने जन्म घ्यायला लावण्यासारखे, पहिल्या श्वासापासून पुन्हा शिकण्यासारखेच आहे. एखादी गोष्ट पुन्हा नव्याने शिकायला मिळणे यासारखा मोठा आनंद कशात नाही. श्वासाला जपत जगणे हे तसे पहिले तर नव्याने उगवण्या सारखेच आहे हे आपण समजून घेतले पाहिजे या शब्दात नदिष्टकार मनोज बोरगावकर यांनी आपले अनुभव विश्व उलगडून दाखवत कोरोनाच्या या काळात सावरण्याचा मार्ग दिला. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरु केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच अभियानाला आपली सकारात्मकतेचा शिदोरी त्यांनी दिली. कोरोनाच्या या काळात आपल्या मानसिक तोलाला सावरणाऱ्या अनेक महत्त्वपूर्णबाबी त्यांनी उलगडून दाखविल्या.  

प्रगतीच्या नावाखाली आपण स्वत:ला, निसर्गाला, चराचराला केंव्हा पारखे झालो हे कोणाच्या लक्षातही आले नाही. निसर्गाला काही परतही करावे लागते ही मूळ शिकवण आपण विसरून गेलो. आपल्या जगण्यावर भौतिक सुखाचे, मोहाचे चढलेले हे अनावश्यक पुट, थर लागत गेल्याने हा निगरगट्टपणा आला तर नसेल ना असा प्रश्न बोरगावकर यांनी उपस्थित केला. कोरोना नावाच्या एका आजाराने ही सारी थरे आता गळून पडायला लागली आहेत. या 14 महिन्यात जे काही घडले ते आजवरच्या इतिहासात घडले नाही. कदाचित भविष्यातही इतक्या कमी कालावधीत घडेल हे सांगता येत नाही. गरीब-श्रीमंत, जात-पात, लहान-मोठा अशी सारी काही अंतरे आपण मिटवू शकलो नाही ते बदल या अवघ्या 14 महिन्यात घडले. एका-एका श्वासाची किंमत मानवाच्या लक्षात आली. एरवी प्रत्येक व्यक्ती जेंव्हा जन्म घेतो तेंव्हा त्याची नाळ कापल्या शिवाय त्याचा श्वास सुरू होत नाही. श्वासाचे हे तंतर नाळीपासून सुरू होते. नाळीशी असलेली आपली बांधिलकी आपण विसरुन गेलो आहोत. त्याला भानावर आणणारा हा काळ असल्याचे ते म्हणाले. हा काळ गरजूंसाठी एक होऊन मदत करणारा, भूकेल्याच्या ताटात अन्न पोहोचावे यासाठी जसे जमेल तसे काही तरी करायला लावणारा काळ आहे. या काळाने खूप काही समज आणि उमज माणसाला दिली असे त्यांनी स्पष्ट केले.  

प्रत्येक काळ हा इतिहासाचा संदर्भ असतो. सामान्य माणूस हा इतिहासाचा केवळ साक्षिदार नसतो तर तो इतिहास घडवू शकतो याचे पून:प्रत्यंतर देणारा हा काळ आहे. कोणीही कोणासाठी काहीही करण्यासाठी परावृत्त  करणारा हा काळ आहे. अगदी आपल्या घरातील परिवारातला सदस्य नसला तरीही कुणावर वेळ आलीच तर त्याला अग्नी डाग देऊन आपलेपणाने दोन आसवे ओघळविणारा हा काळ आहे. याला वाईट कसे म्हणावे असा प्रश्न उपस्थित करून बोरगावकर यांनी काळ हा जगण्याचे नवे संदर्भ देण्यासाठी, शिकविण्यासाठी अतूर असतो असे सांगितले. आपण प्रत्यक्ष जगल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय संदर्भ निर्माण होत नाहीत. संदर्भहिन जगणे आणि संदर्भासहित जगणे यात नेमका कोणता फरक असतो तो शिकविणारा हा काळ आहे, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. नितळ जगणेही असते, नितळ फक्त पाणी नसते, मन नसते याचा धडा देणारा, जगण्यातील नितळपणा आणणारा हा काळ आहे. हे सूत्र  समजून प्रत्येक व्यक्तीने आली ती आव्हाने पेलत, सोसत एकमेकाला धीर देत, काळजी घेत दिवस काढले तर यातून सावरायला वेळ लागणार नाही असा विश्वास बोरगावकर यांनी दिला. 

अशा काळात माणूस म्हणून आपले माणूसपण आपण तराशून घेतले पाहिजे. आपल्या आयुष्याला गुदमरुन टाकणारे जर काही असेल तर ते बाहेर काढून आपण शुद्ध झाले पाहिजे. असे केले तरच आपल्याला आत दडलेल्या संवेदनेला, माणुसकीला हाक मारता येईल व ती हाक तिथपर्यंत पोहचू शकेल. आपल्याला मिळालेली ही संधी समजून आपण जो काही आपल्यातील रितेपण आहे ते भरुन काढले पाहिजे. निसर्गाच्या हाका आपण ऐकल्या पाहिजेत. निसर्गासाठी फार दूर जायची गरज नाही. साधे आपल्या परसातल्या वेलीचे एक उदाहरण घेऊ. जाई-जुईचे फुल वेलीवरुन जेंव्हा पडते तेंव्हा ते गुरुत्वाकर्षणच्या नियमाप्रमाणे दणकण खाली आदळत नाही. स्वत:ला घिरक्या घेत-घेत ते अलगत जमिनीवर उतरते. अशी अनेक रहस्य आपल्या अवती-भोवती निसर्गाने देऊ केली आहेत. ही गुपिते अनुभवने म्हणजे एक प्रकारे नव्याने उगवण्यासारखे आहे. आपल्या आतला मानवतेचा झरा कधीही आटणार नाही एवढी काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले. या काळाने दिलेली जी संवेदनेची ओल आहे ती सर्वदूर नदीच्या स्वभावाप्रमाणे हळू-हळू झिरपत जाईल. चलो कायनात बॉट लेते, है तुम मेरे बाकी सब तुम्हारा ! या शब्दात मनोज बोरगावकर यांनी नवा विश्वास दिला.  


*******

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...