Friday, February 14, 2020

शंकरराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही
त्यांचे मुंबईत स्वतःचे घर नव्हते
          ---- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 14:-  माझे वडिल शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे होते. पण अतिशय प्रेमळही होते. सार्वजनिक जीवनात ते खूप पारदर्शी जीवन जगले. म्हणून दोन वेळा महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री राहूनही 1975 मध्ये त्यांच्याकडे मुंबईत स्वत:चे घर नव्हते . शेवटी आम्ही आमदार निवासात राहिलो, अशी आठवण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितली .
येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ही मुलाखत अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतली. व्यासपीठावर अमिताताई चव्हाण याही उपस्थित होत्या. श्री. चव्हाण यांनी रितेश देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
महाराष्ट्रासह केंद्रातही महत्वाची विविध मंत्रालय आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळलेले दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे सार्वजनिक जीवन कडकशिस्तीचे, कणखर बाण्याचे आणि कठोरपणे निर्णय राबवणारे असे होते. परंतु, घरात मात्र ते प्रेमळ तर  होतेच तसेच त्यांच्या हद् यात  एक हळवा कोपराही होता, असे सांगून श्री. अशोक चव्हाण व अमिताताई चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
श्री. अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारण, समाजकारणासह, सिंचन, शिक्षण, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले . म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिली आहे. जायकवाडी धरणाची उभारणी करून मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर होते. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.     
श्री. चव्हाण म्हणाले की, जलसंस्कृतीचे जनक माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती आणली. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लावले. दुष्काळमुक्तीसाठी त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत मांडला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमर राजूरकर, अमिताताई चव्हाण, माजी मंत्री डि.पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नागरिक,पत्रकार आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्वी भावे यांनी केले .  
0000 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड दि. 14 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम  (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 14 फेब्रुवारी 2020 रोजी जुहू येथून विमानाने दुपारी 3-00 वा. नांदेडकडे प्रयाण. सांयकाळी 4-15 वाजता नांदेड येथे आगमन. सांयकाळी 6-30 वाजता यशवंत कॉलेज मैदान , नांदेड येथील प्रकट मुलाखत कार्यक्रमास उपस्थिती. 
0000
सर्व ऑटो/टॅक्सी चालक-मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक   
नांदेड दि. 14 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व ऑटो / टॅक्सी चालक -मालकांना/बॅजधारकांना कळविण्यात येते की, केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमयोगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजना अशा दोन जनतेच्या हितार्थ योजना जाहीर केल्या आहेत. व्यावसायिक वाहन चालक यांनी या योजनेचे सभासदत्व घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.  
त्यानुसार सर्व ऑटो / टॅक्सी चालक - मालकांना / बॅजधारकांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन-योजना व अटल पेन्शन योजनेचे सभासदत्व घेतल्याशिवाय त्यांचे वाहनासंबंधी परवाना / योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. या योजनेकरिता अर्ज सार्वजनिक सेवा केंद्र (सीएससी) यांच्यामार्फत करण्यात यावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
लेंडी अंतरराज्य प्रधान प्रकल्पाचे बंद पाडलेले बांधकाम सुरु करण्याबाबत
नांदेड, दि. 14:- लेंडी नदीवर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे .या प्रकल्पाचा पाणी वापर 168 दलघमी असून सिंचन क्षेत्र 26924 हे. आहे. या प्रकल्पाच्या बांधकामास इ.स.1986 मध्ये सुरुवात करण्यात आलेली असून सद्यस्थितीत धरणाचे बांधकाम 80 टक्के सांडवा व विमोचकाचे 95 टक्के पुर्ण झालेले आहे. तसेच कालव्याची कामे प्रगत आहेत.
            धरणाच्या बुडीत क्षेत्रात 12 गावठाणे येत असुन त्यांचे 11 ठिकाणी पुनर्वसन प्रस्तावित आहे त्यापैकी 9 गावाच्या पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सदरची कामे जुन, 2020 अखेर पुर्ण होतील. 2 गावठाणातील भुसंपादनाची कार्यवाही खाजगी वाटाघाटीने करण्यात येत आहेत. एका गावाचे (मुक्रमाबाद) स्वेच्छा पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित आहे. धरणाच्या बांधकामासाठी आवश्यक जमिन व बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मावेजा वाटप करण्यात आलेला आहे. मुक्रमाबाद येथील घरांच्या मावेजांसाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतुदीतुन निधी उपलब्धतेनुसार मावेजा वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. तसेच संपादित जमिनीच्या वाढीव मावेजा प्रकरणी मा. न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार वेळोवेळी वाढीव मावेजा वाटप करण्यात येत आहे.
घळभरणी पुर्वी करावयाची अत्यावश्यक कामे करण्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातील सरपंच, धरणग्रस्त समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांना अनेकवेळा बैठक घेवून धरणाची घळभरणी वगळता उर्वरित कामास सुरुवात करु देण्याची विनंती वेळोवेळी करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधितांशी विचार विनिमय सुरु असून त्यांच्या कायदेशीर चौकटीतील मागण्यांची पुर्तता करण्यात येत आहे. तसेच स्वेच्छा पुनर्वसन सारख्या नाविण्यपुर्ण संकल्पना राबवून शासन स्तरावरुन विशेष मान्यता घेण्यात येत आहे.
          या प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासन व तेलंगणा शासन यांचे दरम्यान झालेल्या करारनाम्यानुसार प्रकल्पाच्या 168 दलघमी पाणी वापरापैकी महाराष्ट्र राज्याचा 62 टक्के व तेलंगाणा राज्याचा 38 टक्के पाणी वापर आहे. प्रकल्पाच्या बांधकामावर आतापर्यत मार्च, 2019 पर्यंत 504.30 कोटी येवढा खर्च झाला असून त्यापैकी भुसंपादनावर रु. 236.20 कोटी इतका खर्च झाला आहे. प्रकल्पीय राज्यनिहाय पाणी वापराच्या प्रमाणात(38 टक्के) धरण बांधकामासाठी  तेलंगणा राज्याकडून निधी प्राप्त झाला आहे. मुखेड तालुका हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका असुन दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर लावावे लागतात. प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण झाल्यास कामावर आतापर्यत झालेला खर्च हा उपयोगी होवून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे आणि 26924 हे.जमिन ओलीताखाली येणार आहे. शासनाकडून हे काम पुर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने घळभरणीपुर्वीची कामे या वर्षी हाती घेवुन पुढील वर्षात घळभरणी करण्याचे नियोजित आहे. मुक्रमाबाद येथील घरांचा मावेजा वाटपास सुरुवात करण्यात आलेली असुन बुडित क्षेत्रातील सर्व कुटुंबाना घराचा व जमिनीचा मावेजा देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संपादित जमिनीत पिकाचे उत्पन्न प्रकल्पग्रस्त स्वत: घेत असल्यामुळे त्यांचे सध्या कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाचे बांधकाम सुरु करु देण्यास मनाई करणे योग्य नाही.
या कामास दि.20 फेब्रुवारी, 2020 नंतर केव्हाही सुरुवात करण्यात येईल. यावेळी कोणी व्यक्ती अथवा जमाव यांनी बांधकामात अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येइल याची नोंद घ्यावी. प्रकल्पाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे, लेंडी प्रकल्प विभाग, देगलुर कार्यकारी अभियंता  रा.मा.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...