Thursday, June 22, 2017

सरळ प्रवेश, खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन
नांदेड दि. 23 :-  सरळ प्रवेशासाठी नमुद खेळातील जे खेळाडु महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असे राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने विजयी झालेले 17 वर्षाखालील खेळाडु या सरळ प्रवेश प्रक्रियासाठी पात्र आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी जे खेळाडु नियमानुसार व क्रीडा प्रबोधिनीसाठी मान्य खेळ असलेल्या खेळातील पात्र खेळाडुंनी नमुद केलेल्या खेळनिहाय तारखांना आवश्यक प्रमाणपत्रासहीत सकाळी 8 वा. चाचणी ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापिठात अंतर्गत राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये ॲथलेटिक्स, ज्युदो, शुटिंग, सायकलींग, वेटलिफिटंग, हॉकी, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, फुटबॉल, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, आर्चरी, हॅन्डबॉल या खेळातील उदयन्मुख खेळाडुंसाठी क्रीडा प्रबोधीनीच्या निवासी व अनिवासी प्रवेशाकरीता सरळे प्रवेश व खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले आहे.
चाचण्या आयोजनाचे प्रवेश पद्धतीनुसार कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. चाचणीचे ठिकाण- शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे सरळ प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा अंतिम दिनांक बुधवार 28 जुन 2017 रोजी खेळप्रकार- ॲथलेटिक्स, जलतरण, जिम्नॅस्टिक, ट्रायथलॉन, ज्युदो, बॉक्सिंग, सायकलींग, कुस्ती तर  गुरुवार 29 जुन  रोजी खेळप्रकार- हॉकी, फुटबॉल, हॅण्डबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, शुटिंग, वेटलिफिंटग. तर प्राचार्य क्रीडा प्रबोधिनी विभाग क्रीडा संकुल अमरावती येथे खेळप्रकार- आर्चरी.

0000000
   गांधीनगर शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु
नांदेड दि. 23 :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह महाराणा प्रताप चौक गांधीनगर नांदेड येथे प्रवर्ग निहाय 50 रिक्त जागा नियमानुसार भरण्यात येणार आहेत.  
इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मोफत अर्ज वाटप करण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह महाराणा प्रताप चौक गांधीनगर, नांदेड यांनी केले आहे.

000000
  आनंदनगर शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु  
नांदेड दि. 23 :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आनंदनगर नांदेड (जुने) येथे प्रवर्ग निहाय 60 रिक्त  जागा नियमानुसार भरण्यात येणार आहेत.
शालेय, महाविद्यालय, व्यावसायिक इ. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मोफत अर्ज वाटप करण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आनंदनगर नांदेड यांनी केले आहे.

000000
जवरला गावास जिल्हाधिकारी डोंगरे यांची भेट  
विविध विकास कामांचा घेतला आढावा
नांदेड दि. 22 :- राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या किनवट तालुक्यातील जवरला गावास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतीच भेट देवून विविध विकास कामांची पाहणी केली. कामांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवार 21 रोजी जवरला गावला भेट देवून विविध विकास कामांची पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. प्रविण घुले आदींची उपस्थिती होती.
यावेळी तालुका मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी कमी अंतराचा दुसरा रस्ता, सिंचनाच्या सोईकरीता तलाव, तांत्रिक शिक्षणासाठी आयटीआय, अधिकचे विद्युत ट्रान्सफार्मर आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या. यासंबंधी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकारात्मक पाऊले उचली जातील असे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले. या गावाच्या विकासासाठी तयार केलेल्या आरखड्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. काही प्रगती पथावर आहेत. या कामांना अधीक गती देवून ती पूर्ण केली जातील. या गावात क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. हे कामही गतीने पूर्ण केले जाईल. याबरोबरच विविध विकास कामे प्राधान्याने हाती घेऊन ती पूर्ण करण्यात येतील, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.

000000
बीएलओ, पर्यवेक्षकांची धर्माबादला बैठक संपन्‍न
नांदेड दि. 22 :- धर्माबाद तालुक्‍यातील बीएलओ व पर्यवेक्षकांची तहसील कार्यालयात  नवीन मतदार नोंदणी , मयत, दुबार, स्‍थलांतरीत मतदारांची वगळणी,  मतदार यादीत छायाचित्र नसलेल्‍या मतदारांचे छायाचित्र जमा करणे तसेच सात दिवसांच्‍या आत मतदारांनी छायाचित्रे दिले नाही तर त्‍यांचे मतदार यादीतुन नाव वगळण्‍याबाबत मार्गदर्शन तहसीलदार श्रीमती ज्‍योती चौहाण यांनी केले.
बैठकीस निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनिल माचेवाड , मंडळ अधिकारी अनिल परळीकर व बी. डी. पवळे, मतदार मदत केंद्राचे ऑपरेटर साहेबराव कदम यांची उपस्थिती होती.
राज्‍य मतदार दिवस 5 जुलै रोजी साजरा करण्‍याबाबत सुचित करण्‍यात आले. तसेच 8 व 22 जुलै रो‍जी मतदान केंद्रांवर बीएलओ उपस्थित राहून विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. तलाठी तथा पर्यवेक्षकांनी सज्‍जा अंतर्गत बीएलओ यांच्याशी समन्‍वय ठेवण्‍याबाबत निर्देश देण्यात आले.
00000


जिल्हा न्यायालयात योग दिन उत्साहात साजरा
नांदेड दि. 22 :-  जागतिक योग दिनाचे औचित्य साधु 21 जुन रोजी नांदेड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश  सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी न्या. बारणे म्हणाले की, सर्वांनी योगा हा नियमानुसारच केला पाहिजे. योग प्रशिक्षक मार्गदर्शनाचा श्रेयस मार्कंडेय यांनी रु दाखविलेल्या योग प्रात्यक्षिकाचा कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असे सांगीतले.   
नांदेड मुख्यालयातील न्यायाधीश तसेच जिल्हा न्यायालयातील कर्मचारी ज्येष्ठ विधिज्ञांच्या उपस्थितीत योग व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक श्रीमती सुषमा सुधाकर माढेकर, श्रेयस मार्कंडेय अॅड.  एच. आर. जाधव यांनी उपस्थितांना योगाचे महत्व सांगतिले. यावेळी विविध योगाची माहिती देताना योगा आणि व्यायाम यामधील फरक विषद केला. शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी योगा करणे किती महत्वाचे आहे किती सोपे आहे हे सांगीतले. रोजच्या जीवनात वेळ मिळेल तेव्हा योगा केला जावू शकतो. रोजच्या जीवनात योगा असतो पण त्याला समजुन घेणे महत्त्वाचे आहे, असे सांगीतले. यादरम्यान श्रेयस मार्कंडे यांनी दाखविलेल्या योग प्रात्यक्षीकाने सर्व उपस्थिताना भारावून टाकले.
श्रीमती माढेकर यांनी योगाबद्दल विस्तृत माहिती देतांना योगाबद्दल कविता सादर करून न्यायालयात काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली. आपल्या जीवनात योगामुळे झालेला बदल विषद करताना योग हा कुठल्याही वयोमानाच्या व्यक्तीस निरोगी राहण्यासाठी एक सरळ सोपा मार्ग आहे, असे सांगीतले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्या. श्रीमती व्ही. के. देशमुख यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयाचे प्र. प्रबंधक कबी सिध्दीकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिक्षक श्रीमती के. . कुलकर्णी, कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.  

000000
खते, बी-बियाणे खरेदीची काळजी घेण्याचे
कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
नांदेड, दि. 22 :- जिल्हयाच्या बहुतांश भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्यांना वेग दिला आहे. पेरणीच्या घाईत बियाणे, खते किटकनाशकांची खरेदी करताना फसवणूक होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन  जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्यांसाठी बियाणे, अधिकृत परवानाधारक  विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. गावात फिरुन वाहनांतून खते बियाणांची विक्री करणाऱ्यांकडून खरेदी करु नये. अशा व्यक्ती कमी भावात खते बियाणांची विक्री करत असल्या तरी यातून बनावट खते बियाणांची विक्री होऊन फसवणूक होऊ शकते. असे प्रकार शेतकऱ्यांनी तातडीने कृषि विभागाच्या निदर्शनास आणून दयावेत. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह बियाणे खते खरेदी करा. पावतीवर शेतकरी विक्रेता या दोघांच्या स्वाक्षरी असावी. खरेदी केलेल्या बियाणांचे आवरण (वेष्टन) पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावेत. बनावट भेसळयुक्त बियाणांची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पॉकिटे सीलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करा.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाची छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने बियाणे खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती कृषि अधिकारी जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करणे आवश्यक असल्याचे  श्री. पंडीत मोरे यांनी सांगितले. किटकनाशकांच्या बाबतीत ते अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकांच्या बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वणी, ई-मेल एस.एम.एस. द्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 (02462) 230123 भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वणी क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने केले आहे.

000000
अनाधिकृत खत विक्री करणाऱ्या कृषि केंद्रावर गुन्हा दाखल
 अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खत खरेदी करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 22 :-  मुखेड तालुक्यातील कैलास कृषि सेवा केंद्र बाऱ्हाळी येथे शेतकऱ्यांना कच्ची पावती देवून रासायनिक खताची अनाधिकृत विक्री करण्यात येत होती. याबाबत तालुकास्तरीय पंचायत समिती पथकाने खत विक्री केंद्रास भेट देवून रासायनिक खताची कच्ची पावतीने विक्री करत असताना वसंत महाजन यांच्या विरुध्द खत नियंतत्रण आदेश 1985 अन्वये अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 कलम 3 (7) अन्वये पोलीस स्टेशन मुक्रामाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला. डीएपी 54 बॅग युरिया 194 बॅगची किंमत 1 लाख 17 हजार  600 रुपयाच्या खत विक्रीचा बंद आदेशही देण्यात आल. जिल्हयातील शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्यासाठी बियाणे, खत अधिकृत परवानाधारक  विक्रेत्याकडून खरेदी कराव, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले. 
मुखेड तालुक्यात बाऱ्हाळी येथील कैलास कृषि सेवा केंद्र येथे कच्ची पावती देवून खत विक्री करीत असल्याबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड तालुका कृषि अधिकारी श्री. नरनाळे, कृषि अधिकारी ए. व्ही.अंचलवाड यांच्या पथकाने या प्रकरणी मुक्रामाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केल आहे.   अशाच प्रकारे अनाधिकृत आर.आर.बी.टी.-3 कापूस बियाणे अनाधिकृत विक्री होत असल्या प्रकरणी पोलीस स्टेशन इस्लापूर येथेअनाधिकृत पिक वाढ संजिवके तयार करत असल्याचे आढळून आल्याने पोलीस स्टेशन नायगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावात फिरुन वाहनातून खते बियाणाची विक्री करणाऱ्याकडून खरेदी करु नये. अशा व्यक्ती कमी भावात खते बियाणाची विक्री करत असल्या तरी यातून बनावट खते बियाणाची विक्री होऊन फसवणूक होऊ शकते. असे प्रकार शेतकऱ्यांनी तातडीने कृषि विभागाच्या निदर्शनास आणून दयावेत. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्की पावतीसह बियाणे खते खरेदी करावी. पावतीवर शेतकरी विक्रेता या दोघाची स्वाक्षरी असावी. खरेदी केलेल्या बियाणाचे आवरण (वेष्टन) पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावेत. बनावट भेसळयुक्त बियाणांची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पॉकिटे सीलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करा.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाची छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने बियाणे खतांची विक्री होत असल्यास जादा दराने तसेच कच्ची पावतीद्वारे बियाणे खताची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागाची संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करणे आवश्यक असल्याचे कृषि विकास अधिकारी श्री  मोरे यांनी सांगितले. किटकनाशकांच्याबाबतीत ते अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकांच्या बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल एसएमएसद्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 (02462) 230123 भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...