Thursday, June 22, 2017

अनाधिकृत खत विक्री करणाऱ्या कृषि केंद्रावर गुन्हा दाखल
 अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खत खरेदी करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 22 :-  मुखेड तालुक्यातील कैलास कृषि सेवा केंद्र बाऱ्हाळी येथे शेतकऱ्यांना कच्ची पावती देवून रासायनिक खताची अनाधिकृत विक्री करण्यात येत होती. याबाबत तालुकास्तरीय पंचायत समिती पथकाने खत विक्री केंद्रास भेट देवून रासायनिक खताची कच्ची पावतीने विक्री करत असताना वसंत महाजन यांच्या विरुध्द खत नियंतत्रण आदेश 1985 अन्वये अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 कलम 3 (7) अन्वये पोलीस स्टेशन मुक्रामाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला. डीएपी 54 बॅग युरिया 194 बॅगची किंमत 1 लाख 17 हजार  600 रुपयाच्या खत विक्रीचा बंद आदेशही देण्यात आल. जिल्हयातील शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्यासाठी बियाणे, खत अधिकृत परवानाधारक  विक्रेत्याकडून खरेदी कराव, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले. 
मुखेड तालुक्यात बाऱ्हाळी येथील कैलास कृषि सेवा केंद्र येथे कच्ची पावती देवून खत विक्री करीत असल्याबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड तालुका कृषि अधिकारी श्री. नरनाळे, कृषि अधिकारी ए. व्ही.अंचलवाड यांच्या पथकाने या प्रकरणी मुक्रामाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केल आहे.   अशाच प्रकारे अनाधिकृत आर.आर.बी.टी.-3 कापूस बियाणे अनाधिकृत विक्री होत असल्या प्रकरणी पोलीस स्टेशन इस्लापूर येथेअनाधिकृत पिक वाढ संजिवके तयार करत असल्याचे आढळून आल्याने पोलीस स्टेशन नायगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावात फिरुन वाहनातून खते बियाणाची विक्री करणाऱ्याकडून खरेदी करु नये. अशा व्यक्ती कमी भावात खते बियाणाची विक्री करत असल्या तरी यातून बनावट खते बियाणाची विक्री होऊन फसवणूक होऊ शकते. असे प्रकार शेतकऱ्यांनी तातडीने कृषि विभागाच्या निदर्शनास आणून दयावेत. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्की पावतीसह बियाणे खते खरेदी करावी. पावतीवर शेतकरी विक्रेता या दोघाची स्वाक्षरी असावी. खरेदी केलेल्या बियाणाचे आवरण (वेष्टन) पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावेत. बनावट भेसळयुक्त बियाणांची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पॉकिटे सीलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करा.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाची छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने बियाणे खतांची विक्री होत असल्यास जादा दराने तसेच कच्ची पावतीद्वारे बियाणे खताची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागाची संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करणे आवश्यक असल्याचे कृषि विकास अधिकारी श्री  मोरे यांनी सांगितले. किटकनाशकांच्याबाबतीत ते अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकांच्या बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल एसएमएसद्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 (02462) 230123 भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...