Wednesday, October 27, 2021

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 441 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 381 एवढी झाली असून यातील 87 हजार 704 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, धर्माबाद 1 असे एकूण 4  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20 अशा एकूण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 51 हजार 305

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 47 हजार 689

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 381

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 704

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000


 आरोग्‍य विभागातील गट ड पदभरती परीक्षा केंद्र

परिसरात कलम 144 लागू    

नांदेड, (जिमाका) दि. 27 :- आरोग्‍य विभागातील गट ड पदभरती परीक्षा रविवार 31 ऑक्‍टेांबर रोजी दुपारी 2 ते सायं. 4 वाजेपर्यंत एका सत्रात 58 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केला आहे. 

या परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात रविवार 31 ऑक्‍टेांबर रोजी दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंतच्‍या या कालावधीत दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे.

00000

 विना अनुदानित तत्वावर भिक्षेकरी गृह स्थापन करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित 

नांदेड, (जिमाका) दि. 27 :- महिला व बालविकास विभाग यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यामध्ये विना अनुदानित तत्वावर  भिक्षेकरी गृह स्थापन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ज्या संस्था तथापी 100 प्रवेशितांसाठी  विना अनुदान तत्वावर काम करण्यास इच्छुक आहेत त्यांना प्रस्ताव सादर करता येईल. इच्छूक असणाऱ्या  संस्थांनी   याबाबतचा प्रस्ताव 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत महिला व बालविकास अधिकारी, शास्त्रीनगर यांच्याकडे सादर करावा,  असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.अब्दुल रशिद शेख यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...