Monday, June 28, 2021

 

फळ पिक विमा योजनेत

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 28 :- जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा मृग बहार ही योजना मोसंबी, लिंबू व सिताफळ या अधिसूचित पिकांसाठी अधिसुचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2021-22 या वर्षासाठी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे. 

ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लि. स्टॉक एक्चेंच टॉवर्स 20 वा मजला दलाल स्टिट्र फोर्ट मुंबई 4000 23 यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. यात मृग बहार विमा हप्ता दर हा पुढीलप्रमाणे आहे. मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 4 हजार रुपये. लिंबु पिकाची विमा संरक्षित रक्कम (नियमित) 70 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित 3 हजार 500 रुपये तर सिताफळ फळासाठी विमा संरक्षण 55 हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता हा 2 हजार 750 रुपये एवढा आहे.

योजना अंमलबजावणी वेळापत्रक व अधिसुचित मंडळात ही योजना पुढे दर्शविल्याप्रमाणे जिल्ह्यात अधिसुचित फळपिकांना व अधिसुचित महसुल मंडळांना लागू राहिल. मृग बहार अधिसुचित महसूल मंडळात अधिसुचित फळपिक मोसंबी पिकासाठी कंधार तालुक्यातील बारुळ, फुलवळ. धर्माबाद- करखेली. नांदेड- लिंबगाव, विष्णुपुरी, नाळेश्वर. मुखेड- मुखेड, जाहुर. मुदखेड- मुदखेड, बारड. हदगाव- हदगाव, पिंपरखेड तर लिंबु पिकासाठी उमरी या अधिसुचित महसूल मंडळासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. तर सिताफळ पिकासाठी कंधार तालुक्यात बारुळ व कंधार तर हदगाव तालुक्यात तामसा, मनाठा, आष्टी व पिंपरखेड या अधिसुचित महसूल मंडळात पिक विमा भरण्याची मुदत 31 जुलै 2021 अशी आहे. 

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. एका शेतकऱ्यास अधिसुचनेनुसार 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत नोंद करता येणार आहे. जिल्ह्यात सन 2021-22 या वर्षासाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेंतर्गत मृग व अंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासन निर्णय समजून मुदतीत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी, संबंधित विमा कंपनी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

000000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित

तर  10 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 515 अहवालापैकी  6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 231 एवढी झाली असून यातील 88 हजार 588 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 147 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 904 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, कंधार तालुक्यांतर्गत 1, हिंगोली 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 6 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 10 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1, किनवट कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, अर्धापूर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 2, खाजगी रुग्णालयातील 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 147 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 20,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  4, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 3,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 58, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 50, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 130 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 3 हजार 941

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 1 हजार 113

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 231

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 588

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 904

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.10 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-79

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-147

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4                       

00000

लोकशाही दिनाचे 5 जुलै रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 5 जुलै 2021 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे. 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.  

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000


 जिल्ह्यातील 102 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 102 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 29 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 19 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा व विनायकनगर या 19 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट आणि 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर, कौठा, रेल्वे हॉस्पिटल या 8 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना शिवाजीनगर व सिडको या 3 केंद्रावर प्रत्येकी 70 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.  

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 27 जून पर्यंत एकुण 5 लाख 94 हजार 382 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 28 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...