Friday, May 5, 2023

 जिल्हाधिकारी कार्यालयात

मंगळवारी पेन्शन अदालत

 

नांदेड (जिमाका) दि. 5  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 9 मे 2023 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

0000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 5 :- नांदेड जिल्ह्यात 12 मे 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 28 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 12 मे 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 कर्नाटक राज्याच्या सीमेलगत गावातील

मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- कर्नाटक सार्वत्रिक निवडणूक-2023 ची निडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांच्या ठिकाणचे किरकोळ देशीविदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. हा आदेश मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यंत म्हणजे 8 मे 2023 रोजी सायं 5 वाजेपासून ते 10 मे 2023 रोजी मतदान संपेपर्यंत तर मतमोजणीच्या दिवशी 13 मे रोजी संपूर्ण दिवस हा आदेश लागू राहिल. हा आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार निर्गमित केला आहे.  

 

या निवडणुकीचे मतदान 10 मे 2023 रोजी तर मतमोजणी 13 मे 2023 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणेआर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणेमतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करणे तसेच कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी देशी विदेशी व ताडी मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईलअसेही आदेशात नमूद केले आहे.  

000000

 नीट (युजी) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   

नांदेड (जिमाका) दि. 5 :- नीट (युजी) NEET(UG) 2023 परीक्षा रविवार 7 मे 2023 रोजी दु. 2 ते  सायं. 5.20 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 57 परिक्षा केंद्रावर  घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होवू नये म्हणून तसेच ही परीक्षा स्वच्छ व सुसंगत वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  नुसार या 57 परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 7 मे 2023 रोजी दु. 12 ते सायं. 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी याव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000 

 वृत्त

 

प्रत्येक शनिवार व रविवारी नांदेड येथील सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- कार्यालयीन कामामुळे अनेक नागरिकांना सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करणे अवघड झाले होते. नागरिकांना सुटीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करता यावीत यादृष्टीने प्रत्येक शनिवार रविवार सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. पक्षकारांना सुट्टी घेऊन किंवा आपले महत्त्वाचे काम सोडून दस्त नोंदणीच्या कामासाठी येण्याची आवश्यकता आता राहिली नाही. पक्षकार शनिवार रविवार दस्त नोंदणीचे कामकाज करून घेऊ शकतील.

ही सुविधा देताना सह दुय्यम निबंधक नांदेड क्रमांक दोन हे कार्यालय आता दर सोमवार मंगळवारी बंद राहणार आहे. तथापि दर सोमवार मंगळवारी दोन दिवसासाठी नांदेड शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालय एक व तीन हे जनतेसाठी खुले राहणार आहे. ही कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत.

 

पक्षकारांना सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे विशेषतः दस्त नोंदणीच्या कामी नोकरीनिमित्त किंवा इतर कारणांमुळे कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यासाठी त्यांना सुट्टी घेऊन किंवा आपले निगडीचे कामे बाजूला ठेवून दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून नोंदणी विभागाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये ज्या महानगरपालिका क्षेत्रात एकापेक्षा जास्त सामायिक क्षेत्रासाठी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत, त्या कार्यालयांपैकी काही कार्यालय नोंदणीच्या व इतर कामासाठी दर शनिवार रविवारी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दुय्यम निबंधक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...