Wednesday, June 27, 2018


 अनुदान योजना, बीजभांडवल कर्ज योजनेसाठी
प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत जिल्हा कार्यालय, नांदेड मार्फत मातंग समाज व 12 पोट जातींना योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजनेचे 1 हजार 200 व बीजभांडवल योजनेचे 225 उद्दिष्टे प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू लाभार्थ्यांनी कागदपत्रे घेवून जिल्हा कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजारापर्यंत गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेमध्ये रुपये दहा हजार अनुदान व बाकी बँकेचे कर्ज. बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजार एक ते 7 लाखांपर्यंत यामध्ये सहभाग 5 टक्के महामंडळाचे कर्ज 20 टक्के ( रु. 10 हजार  अनुदानासह) व बँकेचे कर्ज 75 टक्के. या योजनेत स्थिर भांडवल निर्मितीसाठीच्या उद्योगाचे कर्ज प्रस्ताव जसे वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदीसाठीच उद्दिष्टे देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, राशनकार्ड झेरॉक्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा त्या जागेचा पुरावा. व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा ग्रामसेवकाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहन खरेदीसाठी लायसन्स / परमीट / बॅच , वयोमर्यादा 18 ते 50 च्या आत असावे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी
5 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत दरवर्षी इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीव्युत्तर , वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थींना शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. पात्र विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 5 जुलै 2018 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावीत असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
अर्जासोबत गुणपत्रक, टी.सी. झेरॉक्स, जातीचा दाखला, एक फोटो व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतच्या पुराव्यासह हस्तलिखित अर्ज स्वीकरण्यात येत आहे. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्याने गुणवत्ता 60 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी-विद्यार्थींना महामंडळाकडून जेष्ठता व गुणक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. मुदती नंतरचे अर्ज स्वीकरण्यात येणार नाहीत. हे अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेसमोर , हिंगोली रोड, नांदेड याठिकाणी अर्ज भरुन दाखल करावेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000


आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची
माहिती सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 :- मासिक वेतन जून 2018 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
माहिती बाबतचे जून 2018 अखेरचे इ-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र मंगळवार 31 जुलै 2018 पर्यंत भरावयाची मुदत आहे. www.mahaswayam.gov.in ऑनलाईन इ.आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.
000000



कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या
तंबाखू विक्रेत्यांची तक्रार नोंदवावी
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
तंबाखू नियंत्रण पथकाने नायगाव येथे अचानक धाडी टाकून या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने कोटपा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकामार्फत 22 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 10 हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील डॉ. अश्विनी पांचाळ, डॉ. अब्दुल हादी तथा राजकुमार राक्षसमारे व स्थानिक पोलीस स्थानकामार्फत सोन्डारे, पेरगेवार, देगलूरकर (कुलकर्णी) तथा तारू आदी होते.
00000



मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 27 जून 2018 पासून घोषित करण्यात येत आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा बुधवार 27 जून 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 26 जुलै 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000


शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून
महाविद्यालयांनी शुल्क वसुली करु नये
नांदेड, दि. 27 :- ई-स्कॉलरशिप प्रणाली अंतर्गत शिष्यवृत्ती शिक्षण फी, परीक्षा फी  योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क वसुली केली जाणार नाही याची महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत अशा विद्यार्थ्यांचे अर्ज विनाविलंब समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याबाबत महाविद्यालयांनी योग्य कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील अनु.जाती, विजाभज, इमाव विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या www.mahaeschol.maharashra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे संबंधीत महाविद्यालयास सादर करणे आवश्यक आहे. सुधारीत शासन निर्णय 17 मे 2018 अन्वये निर्वाह भत्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिक्षण फी इतर फी ची रक्कम थेट महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालय सक्तीने शुल्क आकारत असल्याबाबत विद्यार्थ्यांमार्फत तक्रारी प्राप्त झाल्या असून भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजनेअंतर्गत शासन निर्णय दि. 1 नोव्हेबर 2003 अन्वये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क वसुल करणाऱ्या महाविद्यालयाविरूध्द कठोर स्वरूपाची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय क्र. इबीसी-2003/प्र.क्र. 301/मावक-2 दि. 1 नोव्हेंबर 2003 अन्वये सविस्तर सुचना दिल्या आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...