Saturday, April 1, 2017

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा
 नांदेड दि. 1 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी हे सोमवार 10 एप्रिल 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 10 एप्रिल 2017 रोजी गोवा येथून खास विमानाने सकाळी 10.15 वा. नांदेड विमानतळावर आगमन. सकाळी 10.30 वा. हेलिकॉप्टरने माहूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वा. माहूरगड येथे आगमन व श्री रेणुकादेवी दर्शन व राखीव. दुपारी 12.30 वा. माहूर येथील वळणरस्ता विकास कामाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 1.45 वा. माहूर येथून हेलिकॉप्टरने औसा जि. लातूरकडे प्रयाण करतील.   

0000000
व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत
बुधवारी आयटीआयमध्ये प्रशिक्षण  
नांदेड दि. 1 :- शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत एप्रिल 2017 मध्ये होणाऱ्या 105 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेशी संबंधीत ऑनलाईन अर्ज भरणे व प्रवेशपत्र प्राप्त करण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे बुधवार 5 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.30 वा. केले आहे.
परीक्षेसाठी बसलेल्या शिकाउ उमेदवार व संबंधीत आस्थापनेचे प्रतिनिधी यांनी युजर आयडी व पासवर्डच्या माहितीसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठीसाठी दूरध्वनी 02462-250045 वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. बी. गणविर यांनी केले आहे.

0000000
न्या. बोरा यांचा दौरा
नांदेड दि. 1 - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमुर्ती पी. आर. बोरा हे रविवार 2 एप्रिल 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 2 एप्रिल 2017 रोजी औरंगाबाद येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन. त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोईनुसार श्री हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा येथे भेट, देगलूर तालुक्यातील लछन येथे भेट व राखीव. सायंकाळी नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

000000
राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 1 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-2017 परीक्षा रविवार 2 एप्रिल 2017 रोजी नांदेड शहरातील 24 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.
नांदेड शहरातील विविध 24 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 6 हजार 984 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000000
  राज्य सेवा पूर्व परिक्षेविषयी उमेदवारांना सूचना 
नांदेड, दि. 1 :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा (पूर्व) परीक्षा रविवार 2 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील 24 शाळा, महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. आयोगामार्फत दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  
या सूचना अशा, उमेदवारांनी परीक्षेला येतांना प्रवेशपत्र, ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी. उमेदवारांनी परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी, कॅल्पुलेटर, ब्ल्युटूथ इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करु नये. परीक्षेत कॉपी, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. परीक्षा  उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचारी यांचेकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून परिक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त व कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000000
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापुढे
केवळ बीएस-IV मानकांच्या वाहनांचीच नोंदणी
परिवहन आयुक्तांकडून परिपत्रक निर्गमित
          नांदेड दि. 1 :- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे बीएस-IV या वायुप्रदूषण मानकांची पुर्तता न करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांची विक्री वाहन उत्पादक किंवा विक्रेत्यांना करता येणार नाही. तसेच वाहन नोंदणी प्राधिकारी यांनाही एक एप्रिल 2017 पासून बीएस-IV मानकांची पुर्तता न करणाऱ्या कोणत्याही वाहनांची नोंदणी करता येणार नाही. तथापि, वाहनाची विक्री 31 मार्च 2017 ला अथवा त्यापुर्वी केली असेल, तर वाहन विक्रीचा पुरावा सादर केल्यावर मात्र अशी नोंदणी करता येईल, असे परिपत्रक राज्याच्या परिवहन आयुक्तालयाने निर्गमित केले आहे.
           या परिपत्रकात म्हटले आहे की, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 115 मध्ये वाहनांच्या वायुप्रदुषण विषयक मानकांबाबत तरतूदी विहित केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन (सिविल) मध्ये 29 मार्च 2017 रोजी बीएस-III वाहनांच्या नोंदणीबाबतही आदेश पारित केले आहेत.
         सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता सर्व नोंदणी प्राधिकारी यांनी  शनिवार 1 एप्रिल 2017 पासून बीएस-IV या वायुप्रदुषणाची मानकांची पुर्तता न करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांची नोंदणी करू नये. तथापि जर 31 मार्च 2017 ला अथवा त्यापुर्वी बीएस-III मानकांची वाहने विकण्यात आली असतील तर वाहन विक्रेत्याने त्याबाबतचा पुरावा सादर केल्यास अशी वाहने नोंदणी करीता स्वीकारण्यात यावीत.
            वाहन विक्रीच्या पुरावा म्हणून फॉर्म 21, इन्व्हाईस बील, विमा प्रमाणपत्र, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी बाबींचा विक्रीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. शुक्रवार 31 मार्च 2017 ला अथवा त्यापुर्वी बीएस-III वाहनांची तात्पुरते नोंदणी केलेली असेल तर अशी वाहने नोंदणीसाठी स्विकारता येतील. वाहनाचे उत्पादन महिना व वर्ष हे सदर वाहनास केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 126 अन्वये मान्यताप्राप्त तपासणी संस्थेद्वारे जारी केलेल्या मान्यता प्रमाणपत्रामध्ये उत्पादकाने घोषीत केलेल्या चेसीस कोडीफिकेशनवरुन पडताळणी करावी. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशास अनुसरून संबंधित नोंदणी प्राधिकारी यांनी वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही राज्याचे अपर परिवहन आयुक्त स. बा. सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे.  

0000000
अवकाळी पावसाबाबत जिल्ह्यातील
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
          नांदेड दि. 1 :- मराठवाड्यात शनिवार 1 एप्रिल 2017 पासून पुढील 48 तासात काही ठिकाणी विजा चमकणे तसेच पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
     भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या या इशाऱ्यात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्याच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही विशेषत: शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या शेतमालाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
       शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिके आणि धान्यसाठ्याची काळजी घ्यावी व कापलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेली धान्ये सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी. विजा चमकत असताना उंच झाडाचा आसरा घेणे टाळावे व सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन सावधगिरी बाळगावी. गाव, तालुका व उपविभागाच्या ठिकाणी असा प्रश्न उद्भविल्यास स्थानिक प्रशासनास व नागरीकांस सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून  देण्यात आल्या आहेत.
       याशिवाय अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल.

00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...