Monday, May 30, 2022

 नांदेड जिल्ह्यातील त्या 9 बालकांमध्ये

शासनाने जागविला नवा आत्मविश्वास

 

·       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन संवादानंतर

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सुर्पूद केले मदतीची किट   

नांदेड, दि. 30  (जिमाका) :- आपल्या माणसाला गमावल्याचे दु:ख हे न सांगता येण्यासारखे असते. कोविडच्या महामारीत ज्या मुलांनी आपले पालक गमावले त्यांना आत्मविश्वासने उभे करण्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन हा एक थोटाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातून येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला धैर्य मिळेल. अवघा देश तुमच्या सोबत आहे या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालक गमावलेल्या मुलांच्या मनावर हळूवार फुंकर घालीत नवा आत्मविश्वास दिला. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पंतप्रधानांचा संवाद ऐकता यावा यादृष्टिने तयारी करून 9 बालकांना निमंत्रीत केले होते. यातील 6 बालक हे 18 वर्षे पूर्ण केलेले आहेत तर 3 बालके हे 18 वर्षापेक्षा लहान आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या मुलांशी संवाद साधत जिल्हा प्रशासन तुमच्या पाठिशी खंबीर असल्याचा धीर दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, बालकल्याण समितीचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.     

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत या 9 मुलांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पंतप्रधानांनी दिलेले प्रमाणपत्र, पीएम केअर्स फॉर चिलड्रन योजनेचे पासबूक, पीएम हेल्थ कार्ड / आयुष्यमान कार्ड याचा समावेश असलेले किट बहाल केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यातील कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या बालकांचा शोध घेऊन त्यातील पात्र ठरलेल्या 9 मुलांना आज नवा आत्मविश्वास दिला.

00000



 

 

 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्री 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातील जुन्या वर्तमानपत्राची रद्दी, कालबाह्य अन्य नियतकालिके इत्यादींची आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहे. त्यासाठी खरेदीदार संस्थाकडून प्रति किलो प्रमाणे खरेदी दरपत्रकाची निविदा बुधवार दिनांक 8 जून 2022 पर्यत मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी आपले लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, विसावानगर , माउली निवास श्री राजेंद्र मनमोहन सिंगी यांचे घर, सिध्दीविनायक मंदिराच्या बाजूला, नांदेड 431602 या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी / शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांची बँक खाते आधार संलग्न करून सुरळीत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेअंतर्गत देय लाभ एप्रिल 2022 पासून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात आधार आधारीत अदा करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी लाभार्थ्यांची पी.एम. किसान योजनेची बँक खाती असलेल्या सर्व बँकांमध्ये सर्व पी. एम. किसान लाभार्थी खातेदारांची बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार महसूल विजय अवधाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

0000

 स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र

नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन


नांदेड, (जिमाका) दि. 30 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे मे 2022 पासून स्कूल बस संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी विशेष ऑनलाईन अपॉईंमेंट कोटा चालू करण्यात आला आहे. या सुविधेस जिल्हयातील स्कूलबस चालक / मालक यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. सर्वांनी उपलब्ध सुविधेचा जास्तीत-जास्त लाभ घेऊन स्कूलबस योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीसाठी अपॉईंमेंट घेऊन उपस्थिती रहावे. लवकरच जिल्हयातील शाळा सुरु होणार असल्याने त्यापूर्वीच आपल्या स्कूलबसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण नसलेल्या स्कूलबस विद्यार्थ्यी व स्कूलसाठी वापरु नयेअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन

 

·         नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 30:-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार 1 जुन 2022 रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये वेळेवर उपस्थित राहुन संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

या मेळाव्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील व्याज परतावा योजना विषयक मार्गदर्शन होणार आहे. उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. तसेच जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी या रोजगार मेळाव्याचे प्रसिद्धीपत्रक प्रदर्शनीय भागावर अथवा सूचना फलकावर लावावेत असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000000

आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीसाठी भरती मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने जून 2022 रोजी सकाळी 10 वा. रोजगार / शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आणि स्वयंरोजगारासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यास आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावेअसे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बिरादार एम. एस. यांनी केले आहे.

000000

 जिल्ह्यातील गरजू व होतकरू उमेदवारांसाठी

उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

·  उमेदवारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 30 :- कौशल्य विकास विभागाच्यावतीने राज्यभर उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरजू व होतकरु उमेदवारांनी सहभाग नोंदवण्यासाठी संपर्क साधावाअसे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रकैलाशनगरनांदेड येथील जिल्हा समन्वयक इरफान खानशुभम शेवनकर यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 02462- 251674 वर संपर्क साधावा. कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. काहीच्या नोकऱ्या गेल्या तर लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. यावर मात करण्यासाठी गरजु व होतकरु उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग व जिल्हा प्रशासन आणि युथ एड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ते जून (जिल्हा नांदेड) या कालावधीत उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

समाज कल्याण कार्यालयआंबेडकर भवन कामठा रोड नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात महिला व युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन तज्ज्ञ मंडळीकडुन उद्योगाबाबत मार्गदर्शन होणार आहे. यात व्यवसायाचे नियोजन करणे. योजनाची माहिती देणे. राज्य शासनांची ओळख करून देणे. त्यासाठी लागणाऱ्या अटींची पुर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करणे. अर्थिक तसेच डिजिटल साक्षर करणे. व्यवसायाचे पर्याय सुचवणे. व्यवसायासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या संधीबाबत माहिती देणे. तसेच नवीन व्यावसायिकांना बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन करणे आदींचा समावेश आहे.

00000

 दारिद्रयरेषेखालील रेषेखालील वर्गाच्या विकासासाठी

मानव विकास कार्यक्रमाला पुरेसा निधी उपलब्ध

-  आयुक्त नितीन पाटील 

 

·        शेळीपालन, कोंबडीपालन, मत्स्यपालन यावर द्यावा भर

·        आठवी ते बारावीत शिकणाऱ्या दारिद्रयरेषेखालील मुलींसाठी सायकल

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्रयरेषखालील लोकांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मानव विकास कार्यक्रम राबविला जात आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. पात्र लाभार्थ्यांच्या विकास कार्यक्रमासाठी कुठलीही निधीची कमतरता नसून या 9 तालुक्यात बचतगटांच्या माध्यमातून शेळीपालन, कोंबडी पालन, मत्स्यपालन यावर संबंधित विभाग प्रमुखांनी अधिकाधिक भर द्यावा, अशी सूचना मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी दिल्या.   

 

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आज नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम अंतर्गत हाती घेतलेल्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा नियोजन अधिकारी सु. आ. थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद बोधनकर, नाबार्डचे वरिष्‍ठ अधिकारी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. कृषि, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, माविम, राज्य परिवहन महामंडळ यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मुलींच्या शिक्षणावर विशेष भर मानव विकास कार्यक्रमात देण्यात आलेला आहे. आठवी ते बारावी पर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती व दारिद्रयरेषेखालील मुलीला 5 किमी पर्यंत शाळेत पोहचण्यासाठी सायकल दिली जाते. या मुलीसह तिच्या घरच्यांनाही ही सायकल शाळेव्यतिरिक्तच्या वेळात वापरता येऊ शकते. इतर व्यवसाय जर असेल तर त्यालाही ही सायकल सहाय्यभूत होऊ शकते, असे नितीन पाटील यांनी स्पष्ट करून योजनांकडे पाहतांना व्यापकदृष्टिकोन बाळगला पाहिजे, असे सांगितले. पात्र मुलींनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे अगोदर अर्ज दिला पाहिजे. हा अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना सादर झाल्यानंतर त्याला मंजुरी दिल्या जाते, असे त्यांनी सांगितले.

 

उपरोक्त निर्देशाप्रमाणे गरोदर महिलांसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विशेष तरतूद करण्यात आली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या गरोदर महिलांना पहिल्यावेळेस केंद्र सरकारकडून मदत दिली जाते. यानंतर महिला गरोदर राहिल्यास त्यांना प्रत्येक वेळी त्यांना मानव विकास आयुक्तालयातर्फे 4 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. यातील 2 हजार रुपये गरोदर काळात व 2 हजार रुपये नंतर दिले जातात. संबंधित महिलांपर्यंत जवळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती पोहचविली पाहिजे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी यासाठी दक्षता घेतली पाहिजे. याचबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर याबाबत ठळक अक्षरात माहिती फलकही लावले पाहिजेत, अशा सूचना आयुक्त नितीन पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

 

मानव विकास आयुक्त कार्यालयाचा उद्देश हा मानव विकासाचा निर्देशांक वाढविण्यासाठी आहे. ज्या योजनांमधून हा निर्देशांक जर वाढला जाणार नसेल तर तशा योजना स्विकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेळी पालन, कोंबडी पालन, मत्स्यपालन मध्ये पशूसखी / सखा, मत्स्य, कुक्कुट यासाठीही मानव विकास निधी उपलब्ध करून देऊ शकेल. यासाठी किमान 100 शेळ्यांच्या वाटपामागे एक व्यक्तीसाठी एका वर्षाकरीता महिना 5 हजार रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून देता येईल. ही पशुसखी / सखा बचतगटांना शेळीपालनासाठी आवश्यक असलेल्या बाबींसाठी व व्यवसायवृद्धीसाठी मदत करेल, असे स्पष्ट केले.

00000   






  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...