Thursday, January 7, 2021

 

1971 च्या युद्वात सहभाग घेतलेल्या

हयात सैनिक अथवा त्यांच्या

विधवा पत्नींना माहिती देण्याचे आवाहन     

 नांदेड (जिमाका) दि. 7 :- सन 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या नांदेड जिल्हयातील हयात सैनिक ज्यांना सैन्यसेवेचे निवृत्ती वेतन आणि केन्द्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून मासिक / वार्षिक मदत मिळत नाही अशा महाराष्ट्र राज्याच्या अधिवासधारक सैनिकांचा तपशिल शासनाने मागविला आहे.  

जिल्हयातील माजी सैनिकांनी जिल्हा  सैनिक कल्याण कार्यालयात  डिस्जार्जबुक व माजी सैनिकांचे ओळखपत्र घेवून तपशिल नोंदवावा. माजी सैनिक हयात नसतील तर माजी सैनिक विधवा यांनी माहिती पाठवावी. जे  माजी सैनिक कार्यालयात येऊ शकत नाही त्यांनी दूरध्वनी क्रमांक 9403069447 वर व्हाटसॲपवर तात्काळ माहिती पाठवावी व संपर्क करावा, असे आवाहन  नांदेडचे  सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी  केले आहे.

00000

 

35 कोरोना बाधितांची भर तर

26 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 7 :- गुरुवार 7 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 35 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 7 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 26 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 743 अहवालापैकी 704 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 726 एवढी झाली असून यातील 20 हजार 598 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 351 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 576 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा  रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 11, मुखेड कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 4, हदगाव कोविड रुग्णालय 2, भोकर तालुक्यांतर्गत 2, कंधार 1, माहूर 1 असे एकूण 26 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.80 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 17, कंधार 7, किनवट 1, अर्धापूर 1, हिंगोली 1, परभणी 1 असे एकुण 28 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, परभणी 1, मुखेड 1 असे एकुण 7 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 351 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 20, मुखेड कोविड रुग्णालय 20, हदगाव कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 9, देगलूर कोविड रुग्णालय 18, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 141, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 59, हैद्राबाद येथे संदर्भीत 3, खाजगी रुग्णालय 41 आहेत.   

गुरुवार 7 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 177, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 62 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 87 हजार 728

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 61 हजार 885

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 726

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 598

एकुण मृत्यू संख्या-576

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.80 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-02

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-351

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-08.          

00000

 

 

सेवारत जवान गोरठकर यांना 

राज्य शासनाकडून 3 लाख रुपयाची आर्थिक मदत मंजूर

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचे सेवारत जवान कॉन्स्टेंबल नायगाव तालुक्यातील रुई या गावातील भास्कर गंगाधर गोरठकर यांना राज्य शासनाकडून 3 लाख रुपयाची आर्थीक मदत मंजूर केली आहे.  कॉन्स्टेबल श्री.गोरठकर हे जम्मू कश्मिर  येथे गस्तीच्या  कर्तव्यावर असताना 23 डिसेंबर 2001  आंतकवादीने केलेल्या घातपाताच्या हल्यात त्यांच्या उजव्या पायाला बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सतत उपचार चालू होते. 

कॉन्स्टेबल भास्कर गोरठकर यांना कायमस्वरुपी 50 टक्के अपंगत्व प्राप्त झाल्याने त्यांच्या या प्रकरणाचा पाठपुरावा करुन त्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. श्री. गोरठकर यांची सेवा 21 वर्षे झाली असुन सध्या ते बॉर्डर सेक्युरीटी फोर्समधे दांतीवाडा गुजरातमध्ये कार्यरत आहेत.

देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना मदत व्हावी यादृष्टिने सशस्त्रसेना ध्वजनिधी जमा केला जातो. या निधीसाठी योगदान देवू इच्छिणाऱ्या दानशुरांनी अधिक माहितीसाठी नागरिकांनी 9403069447 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही आवाहन  नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000000

 

बायोगॅस योजनेच्या लाभधारक महिलेशी

विभागीय आयुक्तांनी भेट देवून साधला संवाद 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- अपारंपारिक ऊर्जा व कृषि विभागांतर्गत हाती घेतलेल्या विविध योजनांच्या लाभधारकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी साधलेल्या प्रगतीची पाहणी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केली. नाळेश्वर येथील श्रीमती कमलाबाई अण्णाराव धोतरे या प्रगतशील महिला शेतकरीने बायोगॅस योजनेचा लाभ घेतला. प्लॉस्टिक टाकीचा वापर करुन नवीन तंत्राने तयार करण्यात आलेल्या बयोगॅसचे युनिट व त्याचा उपयोग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याचबरोबरच येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेल्या शेततळ्याचे व त्यामध्ये पोकरा योजनेंतर्गत केलेल्या मत्स्यपालानाचीही पाहणी केली. मस्त्यशेती, रेशीम पालन, मधुमक्षीका पालन, सौर ऊर्जेवर आधारित शेतीपंप अशा शाश्वत शेतीपूरक योजनांवर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

येथील प्रगतशील शेतकरी वाघ यांच्या शेतीला भेट देऊन त्यांनी सुधारित औजारे, रुंद सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकाची लागवड यांचीही पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर यांनी विकास कामांना त्यांना माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, तालुका कृषि अधिकारी सिद्धेश्वर मोकळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

000000






 

जिल्ह्यातील लोककला पथकांनी

निवडसूचीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 7 :-  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या योजनांची माहिती सर्व सामान्य लोकांपर्यत पोहचविण्यासाठी यापूर्वीच्या लोककला आणि पथनाटय सादर करणाऱ्या संस्थाच्या जिल्हानिहाय निवडसूचीची मुदत 20 डिसेंबर 2020 रोजी संपली आहे. नवीन निवडसूची तयार करण्यासाठी त्या-त्या जिल्हयातील संबंधित लोककला व पथनाट्य संस्थांकडून 1 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतीम मुदत 21 जानेवारी 2021 अशी आहे. संबंधित संस्थांनी नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी, माउली निवास, सिध्दीविनायक मंदिरा शेजारी, विसावानगर नांदेड-431602 या पत्त्यावर 21 जानेवारी 2021 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले आहे. 

नांदेड जिल्हयातील लोककला/पथनाटयव्दारे माहिती देणाऱ्या उदाहरणार्थ गण गवळण, अभंग, पोवाडे, वगनाटय, बहुरूपी,भारूड आदी लोककला/पथनाटय पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. याबाबत या क्षेत्रातील अनुभवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करणाऱ्या लोककला संस्था आणि पथकला संस्थांकडे विविध विषयावर (शासकीय योजनासह ) कार्यक्रम, पथनाटय करण्याचा अनुभव असावा, पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरूष, वादक यांचा समावेश असावा. लोककला/पथनाटय पथक ज्या जिल्हयातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा, केंद्र सरकारच्या गीत आणि नाटय विभागाकडे संस्था नोंदणीकृत असल्यास प्राधान्य दिले जाईल. संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे. 

इच्छुक संस्थांनी येथील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना आणि माहिती पत्रक प्राप्त करून घ्यावे. अर्जाचा नमुना तसेच माहिती पत्रक www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज भरून जिल्हा माहिती अधिकारी यांना 21 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत.

00000

 

लोकाभिमुख प्रशासनासाठी

कार्यालय प्रमुखांची तत्परता आवश्यक

-         विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- सर्वसामान्य जनतेची कामे प्रशासन स्तरावर त्वरित मार्गी लागण्यासाठी शासकिय यंत्रणेने सदैव तत्पर असले पाहिजे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिक जागरुकता बाळगून त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रश्नांचा त्वरित निपटारा झाला पाहिजे, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील विविध शासकिय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर यांनी याबाबत सादरीकरण केले.   

अवैध रेतीचे उत्खनन व यात होणारे गैर व्यवहार हे केवळ महसूल विभागापुरते मर्यादित नाहीत तर पर्यावरणाच्यादृष्टिनेही हा प्रश्न अत्यंत कळीचा बनला आहे. चांगल्या पर्यावरणासाठी उपलब्ध असलेली नैसर्गिक संशाधने ही तेवढ्याच काळजीने जपत यात नियमाप्रमाणे ज्याबाबी अंतर्भूत केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करुन नांदेड जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

 

अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी, रेती वाहतूक करता येऊ शकणाऱ्या अथवा तशी क्षमता असणाऱ्या प्रत्येक वाहनांना जीपीएस बसवून व याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी रेतीचे घाट आहेत त्या सर्व ठिकाणी जीपीएसचे फेन्सिंग बसवून कसा आळा घालता येऊ शकेल याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सादरीकरण केले. या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. परिवहन विभागाशी समन्वय साधून सदर बाब अनिवार्य कशी होईल याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी देवून या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले. 

प्लॉस्टिक कॅरिबॅग व इतर अनावश्यक निसर्गाला हानी पोहचविणाऱ्या वस्तुंच्या वापरावर बंदी, स्वच्छ शहर आणि खुले क्रिडांगण ही प्रत्येक शहरासाठी आवश्यक आहे. याचबरोबर आरटीपीसीआर चाचण्या कमी होता कामा नयेत. कोविड-19 चे अजूनही समूळ उच्चाटन झालेले नाही हे कायम लक्षात ठेवून त्याबाबत समाजात अधिकाधिक जनजागृतीवर भर देण्याबाबतही त्यांनी सांगितले. प्रशासनासमवेत जनतेचा सकारात्मक सहभाग घेऊन चांगल्या वातावरण निर्मितीसाठीही प्रशासकिय यंत्रणांनी काम करणे अभिप्रेत असून जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना व विकास कामांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नांदेड जिल्ह्यातील जैवविविधता जपणे व त्याचे संगोपन करणे हे आवश्यक आहे. वन विभागात जनावरांसाठी पानवठे तयार करणे, जंगली जनावरांचे संवर्धन याबाबतही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सूचना दिल्या.  

000000



  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...