Monday, February 22, 2021

                                   वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत

औरंगाबाद, दि.22, (विमाका) :- शासन निर्णयान्वये राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या http://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करणे आवश्यक होते. परंतू यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे 27 अश्वशक्ती पेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदतवाढ दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे.

            या मुदतवाढीमध्ये जर संबंधित यंत्रमागांनी ऑनलाईन नोंदणी करीता अर्ज सादर केला नाही तर सदर यंत्रमाग नोंदणी करीत नाही तो पर्यंत त्यांची वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असे शीतल तेली-उगले, आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

माझी जबाबदारी भक्कम पार पाडण्यासाठी 

नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी  

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाय योजना हाती घेतल्या असून आता नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेऊन जे प्रवाशी नांदेड जिल्ह्यात येत आहेत त्यांची या छावणीत अँटिजेन कोरोना चाचणी केली जाईल. जे बाधित आढळतील त्यांना उपचारासाठी ते जेथून आले आहेत तिथे पाठविण्यात येईल व ज्यांचे अहवाल बाधित आले नाहीत त्यांना प्रवेश दिला जाईल. बाधितांवर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे जाईल याउद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. या छावणीद्वारे यवतमाळ येथून येणाऱ्या प्रवाशांचे वेळप्रसंगी समुपदेशनही छावणीच्या पथकातील सदस्य करतील. कोरोना चाचणी करता यावी यासाठी एक वैद्यकिय पथक याठिकाणी काही दिवस ठेवू असे  ते म्हणाले. 

माझे कुटूंब माझी जबाबदारी समवेत आता नागरिकांनी यापुढे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मी जबाबदार या कर्तव्याच्या भावनेतून प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले होते. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधून नांदेड जिल्हावासियांना काळजी घेण्यासमवेत प्रत्येकाने जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

प्रत्येक नागरिकांनी जर काळजी घेऊन अनावश्यक प्रवास व घराबाहेर पडण्याचे टाळले तर निश्चितच आपण सर्व मिळून कोरोनाच्या या प्रादुर्भावाला रोखू असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जनतेने प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देवून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट करुन नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.  

0000

 

रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेला रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे. त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली बुधवार 24 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे. 

सदर अवैध रेतीसाठा हा 425 ब्रास असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गटनंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 59 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू

611 अहवालापैकी 546 निगेटिव्ह 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- सोमवार 22 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 59 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 30 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 29 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 611 अहवालापैकी 546 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 208 एवढी झाली असून यातील 22 हजार 29 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 375 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 21 फेब्रुवारीला देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील 47 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 593 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 13, खाजगी रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, माहूर तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 21, लोहा तालुक्यात 2, परभणी 2, नांदेड ग्रामीण 1, नायगाव 1, हिंगोली 3 असे एकुण 30 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 21, किनवट तालुक्यात 2, हिंगोली 1, हदगाव 4, मुखेड 1 असे एकूण 29 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 375 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 31, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 44, किनवट कोविड रुग्णालयात 15, हदगाव कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 186, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 47, खाजगी रुग्णालय 4 आहेत.   

सोमवार 22 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 153, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 60 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 23 हजार 168

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 95 हजार 520

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 208

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 29

एकुण मृत्यू संख्या-593                             

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-375

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.                       

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...