Wednesday, August 23, 2023
लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण नांदेड जिल्हा बाधीत क्षेत्र म्हणून घोषित · लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष
लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी
संपूर्ण नांदेड जिल्हा बाधीत क्षेत्र म्हणून घोषित
· लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष
नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपूर्ण नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केला आहे.
प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लम्पी चर्मरोगाच्या बाबतीत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे यांची ज्या ठिकाणी ते पाळले ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांना निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांना शव, कातडी, किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.
गोजातीय प्रजातीच्या बाधित पशुधनास स्वतंत्र ठेवणे व अबाधित पशुधनास वेगळे बांधणे तसेच या रोग प्रादुर्भावाने पशुधनाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी. तसेच बाधित परिसरात स्वच्छता व निर्जतुक द्रावणाची फवारणी करुन निर्जतुकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधाची फवारणी करावी.
लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या/मोकाट पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी व जनावरांचे गोठे व त्या लगतच्या परिसरात कीटकनाशक फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात/एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित पशुधनाची वाहतूक केल्यामुळे बाधित पशुधनापासून निरोगी पशुधनास या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा/राज्य सीमेवरील तपासणी नाका येथे पशूंची तपासणी करण्याच्या तसेच बाधित पशुधन राज्यात/जिल्ह्यात येणार नाहीत याबाबत तपासणी नाका प्रमुखांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
बाधित क्षेत्रातील बाधित पशुधनावर उपचार करणे त्याचप्रमाणे गोवर्गीय पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम स्वरुपात हाती घेवून उर्वरित गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. योग्य त्या जैव सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. या रोगाबाबत विविध माध्यमातून जनजागृती व माहिती पशुपालकापर्यत पोहोचविण्यात यावी.
लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव याबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती व जिल्हास्तरावर संबंधित पशुपालकांनी इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी माहिती त्वरीत देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचे विरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत
कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्या
लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत
नांदेड (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारीत एकरकमी योजना 31 मार्च 2024 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
राज्यातील उत्कृष्ट तीन गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषि
राज्यातील उत्कृष्ट तीन गणेशोत्सव
मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक
· प्रथम क्रमांकासाठी 5 लाख, द्वितीय 2 लाख 50 हजार व तृतीयसाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस
· गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत
नांदेड (जिमाका) दि. 22 :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाचा शासनाकडून पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. यात प्रथम क्रमांक येणाऱ्या विजेत्यास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक येणाऱ्या विजेत्यास 2 लाख 50 हजार रुपये तर तृतीय क्रमांक येणाऱ्या विजेत्यास 1 लाख रुपये पारितोषक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येणार आहे. राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 याप्रमाणे 36 प्राप्त शिफारसीत गणेशोत्सव मंडळापैकी 3 विजेते गणेशोत्सव मंडळ वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळाचाही राज्य शासनाकडून 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यासाठी शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय समिती गठीत करणेबाबत निर्देश आहेत. गणेशोत्सवास विजेत्या मंडळाची निवड करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गठीत केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष उपजिल्हाधिकारी सामान्य, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड हे तर कला महर्षी त्रिंबक वसेकर, चित्रकला महाविद्यालय, नांदेड येथील प्राचार्य, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस उपअधिक्षक गृह हे सदस्य आहेत. तर जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
या समितीत नियुक्त अधिकारी/पदाधिकारी यांनी शासन निर्णयातील निकषाप्रमाणे 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील विजेत्या गणेशोत्सव मंडळाची निवड करुन गुणांकन व शिफारसीसह अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करावा व त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. या समितीतील नियुक्त अधिकारी यांनी 19 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रजा/बदली किंवा अन्य कारणामुळे अनुपस्थित असल्यास त्यांचे पदावर संबंधीत विभाग/कार्यालयातील नियुक्त अधिकारी यांनी समितीचे पुढील कामकाज करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहे.
000000
फवारणी करतांना घ्यावयाची काळजी आणि गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन
फवारणी करतांना घ्यावयाची काळजी आणि
गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी तसेच ‘विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती व गुलाबी बोंडअळी नियंत्रण’ या विषयावर मंगळवार 29 ऑगस्ट 2023 रोजी लोहा तालुक्यातील सातबारा (7/12) फार्मर प्रोडयुसर कंपनी, लोंढे सांगवी यांचे शेतावर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांची उपस्थिती राहणार आहे. किटकनाशक मिश्रण तयार करणे, फवारणी करतांना वापरावयाचे सुरक्षा किटसह प्रात्यक्षिक व विषबाधा प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना फेसबुक लाईव्हद्वारे पाहता येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
00000
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...