Friday, April 1, 2022

 खाजगी वाटाघाटीने आणखी

38 गावांना हक्काची स्मशानभूमी

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- गाव तेथे स्मशानभूमी ही प्रत्येक गावकऱ्यांच्या संवेदनेचा गाभा असलेली विशेष मोहिम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सुमारे 300 खेड्यांपेकी 200  गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. यातील 174 गावांचे आदेशही निर्गमीत करण्यात आले. उर्वरीत गावासंदर्भात युद्धपातळीवर प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असून जिल्ह्यातील आणखी 38 गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावला आहे.

 

उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील गावांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यात 2 गावे, कंधार तालुक्यात 3, भोकर 5, देगलूर 4, धर्माबाद तालुक्यात 4, हदगाव तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 9 गावे आहेत. स्मशानभूमी संदर्भात शासन निर्णयानुसार संबंधित गावांच्या भूधारकांची जमीन खाजगी वाटाघाटीतून उपलब्ध करून देण्यात आली.  

000000

 शासकीय कार्यालयामध्ये कार्यालयीन कामांसाठी दुचाकीवर

येणाऱ्या कर्मचारी-अधिकारी-नागरीकांना हेल्मेट आवश्यक

-         उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून दुचाकी स्वारांना वाहन रस्त्यावर चालवितांना हेल्मेट परिधान / घालणे हे मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 129 मध्ये नमूद आहे. यासंदर्भात मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेट घालणे अत्यावश्यक असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी 30 मार्च 2022 रोजी परिपत्रकान्वये आदेश निर्गमीत केले आहेत.   

या संदर्भानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे.हेल्मेट फक्त शासकीय कार्यालयामध्ये कार्यालयीन कामासाठी येणारे नागरीक व त्या कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी हे विनाहेल्मेट दुचाकी वाहनावर प्रवास केल्यास मोटर वाहन अधिनियमानुसार कारवाई होणार आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

00000

मराठी नववर्षाच्या स्वागताला

जिल्ह्यात कोरोना मुक्तीचे श्वास ! 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मराठी नववर्षाच्या गत दोन वर्षातील स्वागताला कोरोनाच्या काळजीची किनार होती. या काळजीतून नांदेड जिल्ह्याने आज मुक्त होत कोरोना मुक्तीचे श्वास दृढ करीत बाधितांची संख्या शून्यावर आणली आहे. मागील दोन महिन्यांपासून एक आश्वस्त दिलासा जिल्ह्यातील बाधितांच्या कमी होत चाललेल्या आकडेवारीवरुन मिळत होता. या आठवड्यात ही संख्या निरंक व एखाद दुसऱ्या बाधितापर्यंत मर्यादित होत आज गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बाधितांची संख्या शून्यावर असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिला. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नसून आज उपचार घेणारा एकही रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले आहे. जो एक बाधित गृहविलगीकरणात होता त्यालाही आज बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 717 अहवालापैकी 707 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. आज रोजी एकही अहवाल बाधित आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आजवर बाधित होणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 2 हजार 798 यावरच सिमीत झाली. 

अत्यंत दिलासादायक स्थिती असली तरी जिल्ह्यातील नागरिकांनी वाढती उष्णता व आरोग्याच्यादृष्टिने योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

 महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी   

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणीसाठी येत्या 15 एप्रिल 2022 पर्यंत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन सचिव डॉ. अशोक भोसले यांनी  केले आहे. 

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा  तपशील पुढील प्रमाणे आहे. नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी शुक्रवार 1 ते 15 एप्रिल 2022 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर ऑनलाईन नावनोंदणी अर्ज सोमवार 4 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. शुक्रवार 22 एप्रिल 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000 

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबी संपन्न 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त "रस्ता सरुक्षा मार्गदर्शन" शिबीराचे आयोजन 31 मार्च रोजी करण्यात आले. या शिबीरास अध्यक्षस्थानी मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत हे उपस्थित होते. 

सभापती किशोर स्वामी यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरु केलेल्या उपक्रमाबाबत आभार मानून अशा शिबीरातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबीरामहानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांना रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट / सिटबेल्ट परिधान करण्याबाबत मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये दुचाकी स्वारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केल्यास हे प्रमाण नक्कीच कमी होईल. याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयात नो हेल्मेंट नो इन्ट्री या अभियानाची माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपआयुक्त महानगरपालिका डॉ. पंजाबराव खानसोळे, अजित पालसिग संधू सहा. मोटार वाहन निरीक्षक बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.

000000

 नागरी सहकारी बँकांमधील भरती प्रक्रियेसाठी

नामतालिकेवर नियुक्तीसाठी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील पदांची नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी संस्थांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी पात्र नागरी सहकारी फेडरेशन्स कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जास्तीतजास्त ईच्छूकांनी नामतालिका (पॅनेल) सहभाग नोंदविण्याचे आवाहन पुणे येथील उपनिबंधक (नागरी बँका) आनंद कटके यांनी केले आहे. 

नामतालिकेवर समावेश होण्यासाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत असावी, सदर संस्थेस किमान 10 वर्षे पूर्ण झालेली असावीत, किमान 25 सहकारी बँकास दर संस्थेच्या सभासद असाव्यात, सदर संस्थेचा ऑडीट वर्ग मागील सलग 3 वर्षे असावा व सदर संस्था मागील सलग 3 वर्षात नफ्यात असावी. नामतालिकेवर समाविष्ट होणाऱ्या एजन्सीसाठी अधिकची पात्रता व लागू अटी शर्तींसाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्थायांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. 

या नामतालिकेवर (पॅनेलवर) समावेश होण्यासाठी संबंधित संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रासह आपला अर्ज सहकारआयक्त  निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, नवीन मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे -411001 यांचे नावे करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.25 एप्रिल,2022 पर्यंत राहील. प्राप्त अर्जाची छाननी दि.5 मे,2022 रोजी पूर्ण करुन अंतिम नामितालिका दि. 11 मे, 2022 रोजी प्रसिध्दी करण्यात येईल, सेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. संबंधितांनी अधिक माहितीसाठी 020-26122846/47 -मेल क्र. comm.urban@gmail.com वर संपर्क साधावा.

000000

 ग्रामीण गुंठेवारी प्रस्ताव स्विकारण्यास

30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भूखंड / अनधिकृत भूखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यास मान्यता दिली. यानुसार नांदेड जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दी अंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरीत ग्रामीण भागातील दिनांक 31 डिसेंबर 2021 पूर्वी अस्तित्वात असलेल्या वर नमूद केल्याप्रमाणे भूखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यासाठी प्रस्ताव दाखल मुदत 31 मार्च 2022 पर्यंत देण्यात आली होती. आता या मुदतीत 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. 

संबंधितांनी 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनाधिकृत भूखंड, अनाधिकृत भूखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यासाठी नगररचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनिअर यांच्यामार्फत छाननी शुल्कासह आपले प्रस्ताव 30 एप्रिल 2022 पर्यंत दाखल करता येतील, असे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...