Friday, April 1, 2022

मराठी नववर्षाच्या स्वागताला

जिल्ह्यात कोरोना मुक्तीचे श्वास ! 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मराठी नववर्षाच्या गत दोन वर्षातील स्वागताला कोरोनाच्या काळजीची किनार होती. या काळजीतून नांदेड जिल्ह्याने आज मुक्त होत कोरोना मुक्तीचे श्वास दृढ करीत बाधितांची संख्या शून्यावर आणली आहे. मागील दोन महिन्यांपासून एक आश्वस्त दिलासा जिल्ह्यातील बाधितांच्या कमी होत चाललेल्या आकडेवारीवरुन मिळत होता. या आठवड्यात ही संख्या निरंक व एखाद दुसऱ्या बाधितापर्यंत मर्यादित होत आज गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बाधितांची संख्या शून्यावर असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिला. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नसून आज उपचार घेणारा एकही रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले आहे. जो एक बाधित गृहविलगीकरणात होता त्यालाही आज बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 717 अहवालापैकी 707 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. आज रोजी एकही अहवाल बाधित आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आजवर बाधित होणाऱ्यांची संख्या ही 1 लाख 2 हजार 798 यावरच सिमीत झाली. 

अत्यंत दिलासादायक स्थिती असली तरी जिल्ह्यातील नागरिकांनी वाढती उष्णता व आरोग्याच्यादृष्टिने योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...