Friday, November 17, 2017

 कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन
नांदेड दि. 17 :- शासन परिपत्रकानुसार रविवार 19 नोव्हेंबर ते शनिवार 25 नोव्हेंबर 2017 या कालावधी जिल्ह्यात कौमी एकता सप्ताह म्हणून व सोमवार 20 नोव्हेंबर हा अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व निमशासकीय, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदींसह विविध यंत्रणांनी दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहात रविवार 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस, सोमवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक  कल्याण दिवस, मंगळवार 21 नोव्हेंबर भाषिक सुसंवाद दिवस, बुधवार 22 नोव्हेंबर दुर्बल घटक दिवस, गुरुवार 23 नोव्हेंबर सांस्कृतिक एकता दिवस, शुक्रवार 24 नोव्हेंबर महिला दिन आणि शनिवार 25 नोव्हेंबर 2017 रोजी पर्यावरण जोपासना दिवस साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार 19 नोव्हेंबर रोजी शासनाच्या सर्व कार्यालयातून तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. हा सप्ताह साजरा करण्यासाठी संबंधितांनी अल्पसंख्याक विकास विभाग 14 नोव्हेंबर 2017 रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन करावे व आपल्या अधिनस्त यंत्रणांद्वारे सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करावा, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे. 

0000000
कापुस, तुर पिकासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 17 :- कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापुर, लोहा, कंधार या पाच तालुक्यामध्ये तुर, कापुस पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश दिला आहे.
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 10 इसी 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तसेच लाल्या नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट 1 टक्के फवारणी करावी. तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी, एनएसई (निबोंळी तेल ) 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 17 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 20 नोव्हेंबर 2017 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
शिष्यवृत्तीच्या महाडीबीटी
पोर्टलविषयी आज कार्यशाळा
  नांदेड, दि. 17 :-  शिष्यवृत्तीसाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलविषयी माहिती देण्यासाठी शनिवार 18 नोव्हेंबर 2017 रोजी दोन सत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता हायस्कुल समोर नांदेड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी (https://mahadbt.gov.in) कार्यान्वित करण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज किंवा अर्ज पडताळणी करताना शाळांना येणाऱ्या अडचणीबाबत माहिती देण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत  नांदेड, कंधार, लोहा, नायगाव, भोकर, मुदखेड, अर्धापुर, देगलूर तालुके तर दुसऱ्या सत्रात दुपारी 1 ते सायं 5 यावेळेत किनवट, मुखेड, हदगाव, माहुर, बिलोली, हिमायतनगर, उमरी, धर्माबाद तालुक्यांचा समावेश राहील.  
समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमधील प्रत्यक्ष महाडीबीटीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेवर कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आ. ब. कुंभारगावे यांनी केले आहे.  
0000000


समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...