Monday, December 4, 2023

 पनवेल महानगरपालिका पदभरती परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :-  पनवेल महानगरपालिका आस्‍थापनेवरील विविध संवर्गातील पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्‍याच्‍या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका पदभरती  परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं.18 आणि 22 नांदेड,  राजीव गांधी कॉलेज कॅम्पसविद्युतनगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 3 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 8 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 7 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 दहा रुपयांचे नाणे अधिकृतच

न घेतल्यास होणार कायदेशीर कारवाई

नांदेड (जिमाका), दि. 4 :-  जिल्ह्यातील काही शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका 10 रुपयांचे नाणे व्यवहार करण्यासाठी स्विकारत नसल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी दुकानदार, विक्रेते 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा असून हे नाणे स्विकारण्यास नकार देणारे विक्रेते, संबंधीत व्यक्ती यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणी प्रस्तृत करते. या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात. नाण्यांचे आयुष्य दीर्घकालिन असल्याने, निरनिराळया डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात. रिझर्व बँकेने आतापर्यत 14 डिझाईन्समधील 10 रुपयांची नाणी दिली आहेत. त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला वृत्तपत्र निवेदनामार्फत कळविण्यात आले आहे. ही सर्व नाणी वैध चलनात आहेत.

सर्व शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, व्यापारी विक्रेते यांनी 10 रुपयांच्या नाण्यांच्या वापराबाबतचा गैरसमज दूर केला पाहिजे. याचबरोबर बँकानी आपल्या शाखेच्या बाहेर बँनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरुन याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. बँकांनी ग्रामीण भागातील यंत्रणाचा पुरेपुर वापर करुन नागरिकांपर्यत हा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

0000




 लिंबगाव ते नाळेश्वर मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

·         पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :-  लिंबगाव ते नाळेश्वर या रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम करावयाचे असल्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केला आहे.  प्रतिबंध  करण्यात आलेल्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  

लिंबगाव ते नाळेश्वर रस्ता प्रजिमा 22 या प्रतिबंध करण्यात आलेल्या मार्गाऐवजी वाहने नाळेश्वर-वाघी-सायाळ रस्ता (प्रजिमा-25) या पर्यायी मार्गाने ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या नाळेश्वर-वाघी-सायाळ रस्ता (प्रजिमा-25) या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांनी

मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका), दि. 4 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत 15 डिसेंबर 2023 पर्यंत समाज कल्याण नांदेड यांच्याकडे सादर करावीअसे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

एमएसएमई क्षेत्र व शासनाची धोरणे व उपक्रम

याबाबत 6 डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 4 :- गुंतवणूक वृध्दीव्यवसाय सुलभीकरणनिर्यातएक जिल्हा एक उत्पादन व एमएसएमई क्षेत्राबाबत उद्योजकांना माहिती व्हावी. तसेच राज्य व केंद्र सरकारची धोरणे व उपक्रमाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत डिसेंबर 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखाली हॉटेल चंद्रलोकमहाराणा प्रताप चौकनांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.

या कार्यशाळेसाठी जिल्हयातील सर्व औद्योगिक संघटनानामांकित उद्योजकउद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्था यांनी उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्हयातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा आहे. तसेच स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणेनिर्यात प्रक्रियाखरेदीदार आणि विक्रेते शोधणेनिर्यात कर्ज आणि अनुदान योजनापॅकिंग व ब्रॅडींगआवश्यक चाचण्या इ. विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.

या कार्यशाळेचे सीडीबीआयआयडीबीआयकॅपिटल हे मुख्य प्रायोजक आहेत. याशिवाय उद्योग संचालनालयमुंबई अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र नांदेड व इतर निगडीत विभागाचे संबंधित अधिकारीतज्ञ मान्यवर कार्यशाळेत उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील औद्योगिक संघटनानिर्यातदारनामांकित उद्योजकउद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभागमहिला स्वयं सहाय्यता बचत गटाचे सदस्य निर्यातीशी संबंधीत अधिकारी व केंद्र व राज्य शासनाचा अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहेअसे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

दिनांक 3 डिसेंबर 2023

हक्काच्या लाभासाठी विश्वासाने पुढे या

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·   जिल्हा परिषदेत जागतिक दिव्यांग दिन संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 3 :- दिव्यांगावर मात करुन आत्मविश्वासाने उभे राहण्याची जिद्द सर्वच दिव्यांग व्यक्ती करतात. दिव्यांगांनाही विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला असून त्यांनाही समान संधी, संरक्षण आणि हक्क देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे. दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या हक्काच्या योजनांसाठी आत्मविश्वासाने पुढे यावे. आपल्याशी संपर्क साधण्यासाठी शासन दिव्यांगाच्या दारी ही अभिनव योजना आपण हाती घेतल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  

जागतिक दिव्यांग दिन सोहळा व दिव्यांग मतदार नोंदणी उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात केले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जजमनोविकार तज्ञ डॉ. दि.भा. जोशीवाचा उपचार तज्ञ डॉ. क्षितीज निर्मलजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारजिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.  

 

आपल्या हक्कासमवेत मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येक पात्र व्यक्तीला बजावता यावे यासाठी व्यापक प्रमाणात मतदार नोंदणी अभियान सर्वत्र सुरु आहे. यासाठी ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यापर्यत पोहोचून त्यांना मतदान ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत आहे. शासकीय योजना व इतर बाबींचे संनियंत्रण अधिक सुकर व्हावे, पारदर्शकता वाढावी यादृष्टीने दिव्यांग ॲपची निर्मिती केली आहे. यात ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दिव्यांग संघटनानी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

 दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रत्येकाजवळ युडीआयडी कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसमवेत मानसिक आजार असलेल्या व्यक्तींनाही समान न्यायाची हमी, त्यांच्या अधिकाराचे संरक्षण हे कायद्याने बहाल केले आहे. एखाद्या दिव्यांग व्यक्तीवर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण योग्य ते सहाय्य करण्यासाठी तत्पर आहे. आपल्या अधिकारांना ओळखून शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांनी केले.

 

दिव्यांगत्वाची अनेक कारणे आहेत. बरीचशी कारणे ही विज्ञानानी स्पष्ट केली आहेत. एका गोत्रात (जवळच्या नातेसंबंधात) लग्न न करणे हा त्यावरचा पर्याय आहे. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. याही पलिकडे जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याऐवजी अंधश्रध्दा ना खतपाणी घालतात. यातून समाजाने अधिक जागरूक होवून निर्णय घेण्याचे आवाहन मनोविकार तज्ञ डॉ. दि.भा. जोशी यांनी केले. अलिकडच्या जीवन शैलीमुळे प्रत्येक गरोदर स्त्री बाळाला नैसर्गिकरित्या जन्म देईलच असे होत नाही. बरेचजण दवाखान्यात न जाता बाळांतपणासाठी इतर पर्याय निवडतात. यामुळे मेंदू अथवा इतर अवयवावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे डॉ. दि.भा. जोशी यांनी सांगितले.

 

दिव्यांग व्यक्तींना कुणाच्या सहानुभुतीची गरज नसते. त्यांच्या हक्काचे त्यांच्यापर्यत पोहचावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सुध्दा कर्तव्य भावनेतून पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले.  कर्णदोषाची लक्षणे व त्यावर करण्यात येणारे उपचार याबाबत डॉ. निर्मल दिक्षित यांनी मार्गदर्शन केले.

 

इतर नागरिकाप्रमाणे दिव्यांग व्यक्तीना आपले अधिकार व हक्क आहेत. त्याच्या हक्क  व अधिकारासाठी अनेक कायद्याची तरतूद आहे. दिव्यांगासाठी असलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन ॲड . मनिषा गायकवाड केले.

 

नांदेड जिल्ह्यात दिव्यांग ॲपवर 20 हजार दिव्यांगाची नोंदणी झाली असून राज्यात नांदेड मध्ये सर्वात जास्त नोंदणी झाली असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मान्यवरांच्या हस्ते नितीन रोडेकृष्णा दिडशेरेनागेंद्र बलीकोंडावारविजय सोनकांबळेकाळबा सातपुतेचंद्रकांत इबितदार यांना स्मार्ट केन तर गौरी रासरकर यांना सीपी चेअरचे वितरण करण्यात आले. तर कैलास सोनवणेसम्यक कदमशे. निहाल अहेमदमोहन इरपेफैजल खान पठाणशे. सोहलज्ञानेश्वर भरकडेप्रतीक केकाटेसय्यद जुबेरशेख बुरहानरुपेश मेकलवाडपंकज सोनटक्केसंस्कार पतंगे या नवनिर्वाचित दिव्यांग मतदार नोंदणीकृत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निर्मल सर तर आभार मुरलीधर गोडबोले यांनी मानले.

00000   











      


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...