Monday, July 1, 2019

सैनिकी मुलांचे वसतिगृह प्रवेश प्रक्रीया सुरु



            नांदेड दि. 1 :- सैनिकी मुलांचे वसतिगृह विद्यापीठ परिसर विष्णुपूरी नांदेड येथे सन 2019-20 साठी प्रवेश देण्यासाठीची  प्रक्रीया सुरु झाली आहे. 
वसतिगृह पन्नास मुलांच्या क्षमतेचे असून प्राधान्यक्रम हा युद्वविधवा, माजी सैनिक विधवा व  माजी सैनिक यांचे  पाल्य याप्रमाणे राहील. यात पदव्युत्तर व्यावसायीक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी पदव्युत्तर, बी.एड, डी.एड, पदवी अभ्यासक्रम, बारावी, 11 वी, दहावी उत्तीर्ण याप्रमाणे प्राधान्य राहिल.
माजी सैनिकांच्या पहिल्या पाल्यास  प्रथम प्रवेश दिला जाईल. जागा उपलब्ध असल्यास त्यांचे दुसरे व तिसरे पाल्यांना प्रवेश दिला जाईल. माजी सैनिकांचे सर्व पाल्यांचे प्रवेश झाल्यानंतर सेवारत सैनिकांच्या पाल्यांना प्रवेश दिला जाईल. यानंतरही जागा उपलब्ध असल्यास सिव्हीलियन पाल्यांना संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या अनुमतीने प्रवेश दिला जाईल.
            विहित नमुण्यातील प्रवेश अर्ज व माहिती विवरण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे उपलब्ध असुन इच्छुकांनी बुधवार 31 जुलै 2019 पर्यंत अर्ज भरुन सादर करावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02462-245510 वर संपर्क करावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी परभणी तथा नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.
000000




हरवलेल्या इसमाचा शोध



नांदेड दि. 1 :- धनेगाव (ता. नांदेड) येथील नरबा ऊर्फे सोन्या रामराव तेलंग (वय 20 वर्षे) हा मजुरी करणारा मुलगा 22 जून 2019 रोजी दुपारी 12 वाजेपासून धनेगाव येथील राहत्या घरातून नांदेड येथून आधार कार्ड आणतो म्हणून निघून गेला. शोध घेतला असता तो सापडला नाही. मुलाचा रंग- सावळा, उंची 5 फुट 2 इंच, केस – काळे, पोशाखा- गुलाबी रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट, पायात चप्पल, भाषा- मराठी, हिंदी, बांधा- मजबुत, डोळे- पाणीदार आहेत. हा मुलगा कोणाला आढळल्यास पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड (ग्रामीण) येथे मो. 9552542329 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.  
00000

बीजोत्पादनासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे खरीप पिकांची क्षेत्र नोंदणी



नांदेड दि. 1 :- खरीप हंगाम 2019-2020 मध्ये विविध पिकांच्या बीजोत्पदनासाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड कार्यालयात बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे क्षेत्र नोंदणी सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.  
बीजोत्पदक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या बीजोत्पादन कार्यक्रमाचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे सादर करण्याच्या पीकनिहाय अंतिम तारखा पुढील प्रमाणे आहेत. मुग व उडीद - 25 जुलै, संकरीत कापूस / सुधारीत कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मक्का व तूर - 31 जूलै 2019 असून या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा आहेत. क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपुर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर 15 दिवसात करता येईल त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
            क्षेत्र नोंदणीकरीता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनीधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांचेसह करण्यात येणार 500 रुपयाच्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बीयाणे खरेदी बिल, स्त्रोत बीयाण्यांचे मुळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बीयाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याचा स्वाक्षरीत व परिपुर्ण माहिती भरलेला विहीत नमून्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसूली दस्तावेज (7/12 8 ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बीजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बीयाणे वाटप अहवाल, गाव / पीक व दर्जानिहाय बीजोत्पादकांच्या विहीत प्रपत्रतील याद्या 4 प्रतीत इत्यादी कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत सादर करावेत. जेणेकरून त्यांना देय असलेल्या अनुदानाबाबत कृषि विभागास कार्यवाही करणे सोईस्कर होणार आहे. अर्जाची शुल्क 10 रुपये प्रती बीजोत्पादक व क्षेत्र नोंदणी शुक्र 50 रुपये प्रती बीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी शुल्क पायाभूत बीजोत्पादनाकरीता 200  रुपये प्रती एकर व प्रमाणीत बीजोत्पादनासाठी 150 रुपये प्रती एकर याप्रमाणे आहे.
000000

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आज बैठक ; तक्रारी देण्याचे आवाहन



नांदेड, दि. 1 :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार मंगळवार 2 जुलै 2019 रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात मंगळवार 2 जुलै 2019 रोजी दुपारी 4.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल.
या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...