Tuesday, May 30, 2017

सामाजिक न्याय मंत्री
राजकुमार बडोले यांचा दौरा  
नांदेड , दि. 30 -   राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे बुधवार 31 मे 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 31 मे 2017 रोजी हैद्राबाद येथून विमानाने दुपारी 1 वा. नांदेड विमानतळावर आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. बावरीनगर दाभड ता. अर्धापूर या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासंदर्भात बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 3.30 वा. बोधीसत्व डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती पुर्णा जि. परभणी या संदर्भात बैठक. सायं. 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने होनवडज फाटा मुखेडकडे प्रयाण. सायं. 5 वा. मोटारीने होनवडज फाटा मुखेड येथे आगमन व आमदार तुषार राठोड यांनी आयोजित केलेल्या धम्म परिषदेस उपस्थिती. सायं. 6.30 वा. होनवडज फाटा येथून मोटारीने वसंतनगर मुखेडकडे प्रयाण. सायं. 6.40 वा. आ. तुषार राठोड यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट व स्नेहभोजनास उपस्थिती. रात्री 8 वा. मुखेड येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
000000


स्वच्छता अभियानातील कामगिरीसाठी
जिल्हाधिकारी डोंगरे यांचा मुंबईत सत्कार
मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी हागणदारी मुक्त होईल - मुख्यमंत्री फडणवीस
दरवाजा बंद अभियानस प्रारंभ, हागणदारीमुक्त 11 जिल्ह्यांसह 33 ग्रामपंचायतींचा गौरव

मुंबई, दि. 30 -  जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये हागणदारी मुक्तीसाठी अतिशय वेगाने कामे सुरु आहे. गेल्या वर्षभरात19 लाख शौचालयांचे बांधकाम झाल असून देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी हागणदारी मुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.  ‘दरवाजा बंद अभियानचा प्रारंभ, तसेच हागणदारीमुक्त 11 जिल्हे व 33 ग्रामपंचायतींच्या गौरवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठामध्ये स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री राजेंद्रसिंग तोमर, केंद्रीय सचिव, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती.
मेळाव्यात नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांचा सोलापूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्री. डोंगरे यांनी सोलापूर जिल्ह्यात स्वच्छता अभियानातंर्गत विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले. ज्यामुळे वैयक्तीक तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या घटकांबाबत जनजागृती करण्यात यश आले. सोलापूर जिल्ह्यातील 1029 ग्रामपंचायतीपैकी 467 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या. शौचालय बांधकामामध्ये सोलापूर जिल्ह्याने राज्यात दुसऱ्या क्रमांक पटकाविला. यात सन 2016-17 मध्ये शौचालय बांधकामाच्या 60 हजार 713 उद्दीष्टापैकी 31 मार्च 2017 पर्यंत 1 लाख 5 हजार 236 शौचालय बांधून 173.33 टक्के काम पूर्ण केले आहे. लोकसहभाग आणि विविध घटकांच्या पुढाकारामुळे सोलापूर जिल्ह्यात हागणदारीमुक्तीबाबत श्री. डोंगरे यांच्या पुढाकारातून मोठे यश मिळाले.
मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले क, उघड्यावर शौचाला प्रतिबंध व्हावा म्हणून दरवाजा बंद हे अभियान सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्व  अधिकारी अतिशय मेहनतीने काम करीत असून राज्यात 1 वर्षात 19 लाख शौचालये बांधण्यात आली आहे. राज्यात 35 टक्क्यांनी स्वच्छता वाढली आहे. 16 हजार गावे हागणदारी मुक्त झाली असून हे प्रमाण देशातील हागणदारीमुक्त गावांच्या 18 टक्के आहे. मिशनमोडवर हे काम सुरु आहे. जी गावे हागणदारीमुक्त नाही तेथे जाऊन ती हागणदारी मुक्त करण्याचे विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही मिशन देतोय. राज्यातील 250 शहरांपैकी 200 शहर हागणदारीमुक्त झालअसून ऑक्टोबर 2017 पर्यंत सर्व शहर, तर 2018 मध्ये सर्व महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल.  असा विश्वास व्यक्त करीत जनजागृतीसाठी अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
000000

फोटो ओळी- दरवाजा बंद अभियानचा प्रारंभ, तसेच हागणदारीमुक्त जिल्हे व ग्रामपंचायतींच्या गौरवानिमित्त मुंबईत मंगळवार 30 मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठामध्ये आयोजीत स्वच्छता मेळाव्यात नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांचा सोलापूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री राजेंद्रसिंग तोमर, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींचीही उपस्थिती होती.

000000
तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात
आज विविध उपक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 30 – जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयाच्यावतीने बुधवार 31 मे 2017 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तंबाखूचा वापर रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय नांदेड व जिल्ह्यांतर्गत सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे दंत शल्यचिकित्सक यांच्याकडे (टी.सी.सी.) या नावाने तंबाखू मुक्ती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.त्या अंतर्गत तंबाखूचा वापर करणाऱ्या रुग्णांची मौखीक तपासणी व समुपदेशन केले जाते. तसेच शाळा व महाविद्यालयात जाऊन मुलांचे तंबाखू विरोधी प्रबोधनाचे उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तंबाखू विरोधी व्याखाने, पथनाटये व प्रभात फेरीचे आयोजन करून जनजागृती केली जाते तसेच शासकीय व खाजगी विभागांची कार्यशाळा घेतली जाते. तंबाखू  विरोधी दिना निमित्त बुधवारी 31 मे रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथून जनजागरणपर  रँली, त्यानंतर व्याख्यानाचे  आयोजन करण्यात आलेले आहे.  या सर्व उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000

उद्याच्या अंकासाठी लेख-

तंबाखू हानीकारक... विकासाला मारक...!
आज जागतिक तंबाखू विरोधी दिन

तंबाखू अनेकांच्या प्रतिष्ठेचा विषय. प्रतिष्ठेचा याचसाठी की, अनेकांना आपण तंबाखू खातो, आणि त्यातही ब्रॅण्ड आणि उंची दर्जा राखतो, हे सांगण्याची भारी हौस. पण तंबाखू कुणाच्याच हिताची नाही. हे स्पष्ट आहे. त्याचमुळे जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू- विकासाला धोका असे घोषवाक्य निश्चित केले आहे.  
तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे तंबाखू कोणत्याही स्वरुपात शरीरात घेतली जाऊ नये यासाठी अनेकविधरित्या जनजागृती केली जाते.  त्यासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावरही निक्षून प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या चाळीसाव्या वर्धापनदिनात तंबाखूविरोधी मोहिम निश्चित झाली. त्यानंतर पुढे 1987 पासून 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तंबाखूचे सेवन, धुम्रपान किंवा अन्य कोणत्याही स्वरुपात शरीरात घेण्याने कर्करोगाची सर्वाधिक शक्यता असते. दरवर्षी तंबाखुमुळे कर्करोग आणि त्यातून होणाऱ्या मृत्युंची संख्या जागतिकस्तरावर सत्तर लाखाच्या घरात आहे. यात अविकसित, गरीब देशातील नागरिकांचीच संख्या सर्वाधिक असते. भारतात दरवर्षी तंबाखूमुळे कर्करोग होणाऱ्यांची आणि त्यामुळे मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्या सुमारे दहा लाखांच्या दरम्यान आहे.
        अमेरिका खंडाकडून युरोप खंडात तंबाखूचा प्रसार झाला व तेथील पोर्तुगीज व्यापाऱ्याकडून तो भारतापर्यत पोहचला . भारतात तंबाखूचा वापर अनेक शतकांपासून होतो आहे. सुरवातीला चघळणे, धुम्रपान यातच तंबाखूचा वापर होत असे. पण हा मर्यादीत वापर आता कित्येक पटींनी वाढला आहे. कारण आता तंबाखूपासून अनेक उत्पादने तयार करण्यात येतात, किंवा अनेक उत्पादनांत तंबाखुचा वापर केला जातो. धुम्रपानात सिगारेट, विडी, हुक्का, चिलीम याद्वारे तंबाखू वापरली जाते. तर चघळण्याच्या प्रकारात खैनी, गुटखा, तंबाखूमिश्रीत पान, पानमसाला, मावा, मिशरी, हुंगण्यासाठीची कोरडी तंबाखू –तपकीर अशा स्वरुपात तंबाखुचा वापर केला जातो.
तंबाखूमध्ये चार हजार पेक्षा जास्त विषारी रसायने असतात. त्यातील निकोटीन, कार्बन मोनोक्साइड व टार हे अतिशय घातक घटक आहेत. निकोटीन हा तंबाखूची सवय लावणारा मुख्य घटक आहे. यामुळे व्यक्तीचे तंबाखूवरील शारीरिक व मानसिक अवलंबन वाढते. खरेतर, निकोटीन हे अतिशय विषारी रसायन आहे, त्याचा एक थेंब ही जीवघेणा असतो.  तंबाखू न खाता अप्रत्यक्षरित्या नुसत्या धुराच्या सेवनाने ( Passive Smoking ) मुळे  सहा लाख लोकांचा मृत्यू ओढवतो. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारामध्ये  हृदय विकार, पक्षघात, आंधळेपणा, तोंडाचे विकार, आतड्यांना फोडे येणे, दमा, फुफुसांचे विविध आजार, गँगरीन, पोटाचा अल्सर, हाडे ठिसूळ होणे, नपुसंकत्व येणे व कर्करोग होणे असं गंभीर आजार उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनाही तंबाखुच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. तंबाखूच्या धुरामुळे जन्माला येणाऱ्याला बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तंबाखूमुळे पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. सिगारेटची थोटके  नदी, तलाव, सरोवरात आणि समुद्रात टाकली जातात. ही थोटके सागरी पक्षी, प्राणी, मासे गिळतात, त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
       जग तंबाखूमुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये भारतानेही सहभाग दर्शविला आहे. देशाच्या आरोग्य धोरणामध्ये तंबाखूचा वापर कमी करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आह. त्यानुसार सन 2020 मध्ये हे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी करण्याचा, तर पुढे 2015 पर्यंत 30 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
         भारतामध्ये सन 2003 पासून तंबाखू विरोधी कायदा ( COTPA ) पास करण्यात आला. या कायद्या अंतर्गत कलम (4) नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. कलम (5) अंतर्गत प्रत्याक्षात व अप्रत्याक्षात तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाची कोणत्याही स्वरूपातील (आवाजी, दृश्य स्वरूपातील छपाई ) जाहिरात करणे दंडनीय आहे. तसेच तंबाखूजन्य उत्पादन करणाऱ्या कंपनीनी खेळ अथवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई आहे. कलम (6) अ नुसार 18 वर्षाखालील मुलांना विक्रेत्यांनी तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे दंडनीय आहे . कलम (6) ब नुसार शैक्षणिक संस्थाच्या ( शाळा, महाविद्यालय) इत्यादीच्या आवारापासून (100) यार्ड पर्यंत तंबाखूची विक्री करणे दंडनीय आहे असे करताना कोणी अढलयास दोनशे रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.
              तंबाखू, जशी व्यक्तीगत आरोग्याला हानीकारक आहेच. त्याचप्रमाणे तंबाखु तिचा वापर न करणाऱ्यांनाही धोका पोहचवू शकते. कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्याही तंबाखूचे दुष्परिणामच समोर आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखू-विकासातील अडसर किंवा धोका किंवा तंबाखू-तुम्हा-आम्हासाठी धोका..ही घोषवाक्य इशारा देणारीच आहे. त्यामुळे तंबाखूपासून दूर राहण्यातच आपले आणि समाजाचे हित आहे.
निशिकांत तोडकर,
    माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड.
रास्तभाव धान्य दुकानात
जूनसाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 30 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी जून 2017 करीता साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे
या नियतनानुसार प्रती  शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. जिल्ह्यासाठी 2 हजार 287 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड व लोहा- 172, हदगाव- 182, किनवट- 273, भोकर- 86, बिलोली- 132, देगलूर- 117, मुखेड- 262, कंधार- 168, लोहा- 197, अर्धापूर- 53, हिमायतनगर- 92, माहूर- 123, उमरी- 78, धर्माबाद- 66, नायगाव- 165, मुदखेड- 64. सर्व बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
शिष्यवृत्तीच्या बँक खात्याशी आधार कार्ड
संलग्न करण्याचे समाज कल्याणचे आवाहन  
नांदेड,  दि. 30 :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक संकलित करुन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या बँक खात्याशी संलग्न करुन आधार क्रमांक लिंक केलेल्या पोच पावत्या समाज कल्याण कार्यालयास सादर करावीत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सावित्रीबाई शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते दहावी, मॅट्रिक पूर्व भारत सरकार शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय या शिष्यवृत्त्या सन 2013-14 पासून ऑनलाईन दिल्या जात आहेत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याने जिल्ह्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनिस्त सर्व मुख्याध्यापकांची तात्काळ बैठक बोलावून आधार कार्ड संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी संलग्न करुन घेणेबाबत सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
000000
धनगरवाडीत चला गावाकडे जाध्‍यास विकासाचा घेअभियान
                नांदेड,  दि. 30 :- औरंगाबाद विभागाचे आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्‍या संकल्‍पनेतील चला गावाकडे जाऊ ध्‍यास विकासाचा घे हे अभियान नांदेड तालक्‍यातील धनगरवाडी येथे 20 ते 29 मे 2017 या कालावधीत राबविण्यात आले. या गावात श्रमदानाचे काम करुन नागरीकांशी चर्चा करण्यात आली. गावातील अडीअडचणी जाणुन त्‍याचे निरसनही करण्‍यात आले.  
            या अभियानात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यास सुरुवात करण्यात आली.  वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनिकरण विभागामार्फत चारशे रोपे मोफत देण्‍यात येणार आहेत. मगांराग्रारोहयो अंतर्गत तती लागवडीसाठीचा प्रतिसाद पाहता तती लागवडीसाठी जिल्‍हा रेशीम विकास अधिकारी यांचे सहकार्याने मार्गदर्शन व प्रोत्‍साहन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. त्‍यातून नविन 10 शेतक-यांची निवड करण्‍यात आली. यापूर्वी या गावातील 21 शेतक-यांनी तती लागवड सुरु केली आहे. या सर्व 31 शेतक-यांना व्‍हर्मी कंपोस्‍टींग व नाडेफबाबत मार्गदर्शन करुन ही कामे घेण्‍यास प्रोत्‍साह देण्‍यात आले. 
गाळमुक्‍त तलाव व गाळयुक्‍त शिवार या योजनेअंतर्गत गावा शेजारील कल्‍हाळ तलावातील गाळ काढण्‍याच्‍या कार्यक्रमास सुरुवात करण्‍यात आली. यासाठी शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्‍नत शेतकरी समृध्‍द शेतकरी या शासनाच्‍या पंधरवाडा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत कृषीच्‍या कामांचे मार्गदर्शन करण्‍यात आले. ज्‍यासाठीही शेतक-यांनी उत्‍साह दर्शविला.  
तसेच त्‍यासोबत शासनाच्‍या गाळमुक्‍त तलाव व गाळयुक्‍त शिवार आणि उन्‍नत शेतकरी समृध्‍द शेतकरी पंधरवाडा असे कार्यक्रम एकत्रित राबविण्‍यात आले. यावेळी तहसिलदार किरण अंबेकर, जिल्‍हा रेशीम अधिकारी श्री. नरवाडे, लागवड अधिकारी श्री. शेख, मंडळ कृषी अधिकारी श्री. घाटूळ यांनी मार्गदर्शन केले. 

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...