वृत्त क्र. 1148
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील
लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी : मुख्य कार्यकारी अधिकारी
नांदेड दि. 28 नोव्हेंबर :- राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार 399 लाभार्थ्यापेकी 746 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु अद्यापपर्यत 651 लाभार्थ्यानी आधार पडताळणी पूर्ण करणे बाकी आहे. आधार पडताळणी बाकी असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी 5 डिसेंबर पर्यंत आधार पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश आहे. त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन अदा करण्याबाबत शासनाचे धोरण आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे. त्यांना माहे मे महिन्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिण्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाही. लाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहिती, मानधन मिळण्याच्या अगोदर व मिळाल्यानंतर मोबाइलवर संदेशाच्या रुपाने वेळोवेळी देता येईल. मानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही, मानधन मिळाले नाही किंवा परत गेले अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत.
प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणे ही वैयक्तीक लाभार्थ्याचीच जबाबदारी आहे. कारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करु शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईलवरुन किंवा सेतू सुविधा केंद्रातून आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक आधारला जोडणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधारक्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. परंतु या लाभार्थ्यांना हे करण्यास अडचण व माहितीचा अभाव असल्याने त्यांना शक्य होणार नाही. तेव्हा सर्व गट विकास अधिकारी यांना आधार पडताळणी करण्यासाठी व वारसा नोंद करण्यासाठी https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000