Friday, March 3, 2023

 वृत्त क्रमांक 105

 

निरुपयोगी साहित्याच्या विक्रीसाठी लिलाव

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कंधार फुलवळ येथील जुने निरुपयोगी साहित्य लाकडी स्कॅप, लोखंडी स्क्रॅप, प्लास्टिक स्क्रॅप, इलेक्ट्रीकल  स्क्रॅप  व इतर निर्लेखित स्क्रॅप हत्यारे उपकरणे यांचा जाहिर लिलाव मंगळवार 14 मार्च 2023 रोजी करण्यात येणार आहे. इच्छुक व नोंदणीकृत खरेदीदारांनी प्रत्यक्ष संस्थेस भेट देऊन साहित्याची पाहणी करावी. निविदा दोन लिफाफा पद्धतीने विक्री करावयाची असून त्याची किंमत पाचशे रुपये आहे. अनामत रक्कम 2 हजार रुपये आहे. कोऱ्या निविदाची विक्री संस्थेच्या कार्यालयीन वेळेत 4 मार्च ते 10 मार्च 2023 कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून केली जाईल, याची स्क्रॅप खरेदीदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

00000  

वृत्त क्रमांक 104

 मानव अधिकार आयोगाचे सदस्य

भगवंतराव मोरे यांचा दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाचे सदस्य भगवंतराव डी. मोरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

बुधवार 8 मार्च 2023 रोजी औरंगाबाद येथुन कारने सोयीप्रमाणे नांदेड येथे आगमन व पोलीस स्थानकांना भेटी व रात्री मुक्काम. गुरुवार 9 मार्च 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे विविध प्रकरणांवर सुनावणी व रात्री नांदेड येथे मुक्काम. राखीव. शुक्रवार 10 मार्च रोजी सकाळी 9.30 वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक 103

नांदेड जिल्ह्यातील जैवविविधता व कृषिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योगाची संधी

-  डॉ. माधुरी रेवणवार   


·    कृषि विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील

प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान देऊन गौरव

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- कोरोनानंतरच्या कालावधीत ज्यांना-ज्यांना स्वयंरोजगाराला मुकावे लागले. यातील असंख्य लोकांना शेती व शेतीपुरक उद्योगातून स्वयंरोजगार मिळाला. बदलत्या काळानुसार ज्या झपाट्याने वातावरणात बदल होत आहेत, नैसर्गिक आव्हाने वाढत आहेत त्यानुसार शेतीला उच्च कृषि तंत्रज्ञानाची जोड देणे अनिवार्य झाले आहे. ज्यांच्या जवळ शेती आहे अशा कुटुंबातील जर कोणी उच्च शिक्षीत असेल तर त्यांनी शेती करणाऱ्या आपल्या बांधवांना उच्च तंत्रज्ञान समजून सांगितले पाहिजे. यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यातच भविष्यातील प्रगती व स्वयंरोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत, असे प्रतिपादन सगरोळी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले.

 

नांदेड जिल्हा कृषि महोत्सवानिमित्त आज तिसऱ्या दिवशी कृषि प्रक्रिया उद्योजकता या विषयावर आयोजित परिसंवादत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारआत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे उपविभागीय कृषि अधिकारी सुरेंद्र पवार, अनिल चिरफुले, राजकुमार रणवीर आदी उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यात अनेक जैवविविधता आहे. यात राणमेवा मोठ्या प्रमाणात आहे. लोहा, कंधार सारख्या भागात निसर्गत:च उपजत सिताफळाची मोठी देणगी आहे. कुठे करवंद आहेत. बिबाची फुल आहेत. विपुल प्रमाणात असलेली ही नैसर्गिक फळे प्रक्रियापासून इतर स्वयंरोजगार निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. सिताफळाच्या पल्पपासून ते हळद, करवंद, विविध प्रकारच्या लोणच्या पर्यंत व्यवसायाच्या संधी आहेत. यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. सगरोळी येथील कृषि विज्ञान केंद्र यासाठी मार्गदर्शनाला तयार असून युवकांना पुढे येण्याचे आवाहन डॉ. रेवणवार यांनी केले.

 

शेतकऱ्यांना उपजत असलेले ज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. पिढ्यानपिढ्या जपलेल्या या ज्ञानाला अधुनिकतेची जोड देण्यासाठी नव्या पिढीतील युवकांनी पुढे आले पाहिजे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जिथे कुठे नवीन युवक पुढे आले आहेत त्या-त्या ठिकाणी शेतीतून चांगली आर्थिक प्रगती आपल्या शेतकरी बांधवांनी साध्य करून दाखविली आहे. यात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कृषि उत्पादक कंपन्या, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाडिबीटी कृषि यांत्रिकीकरण योजनांच्या लाभार्थ्यांचे कौतूक व्हावे यासाठी कृषि महोत्सवात प्रत्येक तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन सन्मानित करीत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी याप्रमाणे 16 शेतकऱ्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याचबरोबर आत्मामार्फत स्थापन झालेल्या महिला बचतगटांपैकी ज्यांनी आपला अपूर्व ठसा उमटविला असा प्रातिनिधीक बचतगटांचाही यावेळी माविमतर्फे सन्मान करण्यात आला. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी प्रातिनिधीक स्वरुपात महिला बचतगटांच्या सदस्यांना शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार केला.

 

महाडिबीटी कृषि यांत्रिकीकरण

योजनेअंतर्गत चार ट्रॅक्टरचे वितरण

यावेळी महाडिबीटी कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत श्रीमती द्वारकाबाई रामराव कदम, श्रीमती पल्लवी अमोलसिंह परिहार, श्री पुरभाजी शंकरराव कदम, श्रीमती शोभा शिवाजीराव जाधव या 4 व्यक्तींना ट्रॅक्टरच्या चावी हस्तांतरीत करण्यात आल्या. याचबरोबर मानव विकास योजनेअंतर्गत कपीलधारा ॲग्रो प्रोडुसर कंपनीला लाभ देण्यात आला.

000000






  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...