तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी
पं. स. माध्यमातून प्रयत्न केले जातील - महादेव जानकर
नांदेड दि. 26 :- तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध
विकास योजना राबविण्यासाठी प्रयत्न केली जातील, असे प्रतिपादन राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी कंधार येथे केले.
कंधार येथील बचत भवन येथे
पंचायत समितीच्यावतीने महादेव जानकर यांचा पंचायत समिती सभापती सौ. सत्यभामा पंडीत
देवकांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, कंधारच्या भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती देऊन
यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे
उपसभापती भिमराव जायेभाये, भाजपा प्रदेश कार्यकारणीचे सदस्य ॲड मुक्तेश्वर धोंडगे,
जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे, पंचायत समिती सदस्य शिवकुमार नरंगले, रासपचे
जिल्हाध्यक्ष सर्जेराव देशमुख, पशुसंवर्धनचे
विभागीय सहआयुक्त डॉ. एस. एम. सुर्यवंशी, तहसिलदार अरुणा संगेवार, गटविकास अधिकारी
किरण सायपोते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, मत्सव्यवसाय विभागाचे
सहाय्यक आयुक्त उमाकांत सबनीस आदी अधिकारी, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
शासनाच्या विविध विकास योजनेतून
तालुक्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. पंचायत समितीच्या माध्यमातून हे प्रयत्न
केले जातील. शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, लोकाभिमूख योजना पारदर्शकरित्या
राबवाव्यात. तसेच पंचायत समितीचे उत्पन्न वाढण्यासाठी व्यापारी संकुलासारखे उपक्रम
राबवून युवकांना रोजगार निर्मितीसाठीही मदत करावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने
वाढविण्यासाठी कुक्कुटपालन, दुग्धविकाससारखे शेतीपुरक व्यवसाय केले पाहिजे. शेततळे
असणाऱ्या शेतकऱ्यांना मत्सबीज व मत्सखाद्य शासनाच्यावतीने मोफत देण्याचे प्रयत्न
केले जाणार आहे. शेतीपुरक व्यवसाय करुन शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योजक बनावे,
असेही श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुक्तेश्वर धोंडगे
यांनी लोकाभिमूख व पारदर्शक कारभार करुन कंधार पंचायत समिती आदर्श बनविण्यासाठी
प्रयत्नशील राहू असे सांगितले. तर जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे यांचेही
समयोचित भाषण झाले.
प्रास्ताविक पंचायत समिती
सदस्य शिवकुमार नरंगले यांनी केले. यावेळी श्री. जानकर यांनी पंचायत समिती
कार्यालयासही भेट दिली. या समारंभास
नागरिक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000