Tuesday, September 27, 2016

नांदेड, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक विमा भरपाईचे अर्ज
तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांकडे स्विकारून भरपाई द्यावी
                                                       - पालकमंत्री दिवाकर रावते

मुंबई, दि. 27 : नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबिन आणि उडीद पीकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पीक वीमा योजनेंतर्गत तहसीलदार किंवा कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज जमा करण्यात यावेत. याबाबत राज्यभरासाठी शासन आदेश निर्गमीत होत असून जिल्ह्यातील आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन दिले. पालकमंत्री श्री. रावते यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री. विजयकुमार यांच्याशीही आज चर्चा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक वीमा अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
     
आमदार सुभाष साबणे व तुषार राठोड यांनी आज मंत्रालयात श्री. रावते यांची भेट घेऊन जिल्ह्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याबाबत विनंती केली.
नांदेड आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सोयाबीन, उडीद इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसान भरपाईसाठी काही शेतकरी बँकांकडे गेले असता बँकांनी अर्ज स्विकारण्यास असमर्थता दर्शविली, असे आमदार श्री. साबणे व श्री. राठोड यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. पीक विमा योजनेंतर्गत भरपाईसाठी बॅकांकडे 48 तासाच्या आत दावे दाखल करावे लागतात. तथापी, या दोन जिल्ह्यात बँकांनी अर्ज स्विकारण्यास असमर्थता दर्शविली आहे, असे आमदारांनी सांगितले. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री श्री. रावते यांनी कृषी विभागाचे सचिव श्री. विजयकुमार यांच्याशी चर्चा केली. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. संपूर्ण जिल्ह्यात नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक वीम्याअंतर्गत भरपाई उपलब्ध करुन देण्यात यावी. तहसीलदार, कृषी अधिकारी यांना अर्ज स्विकारण्याबाबत सूचना देवून आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल, यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

०००००००
शिक्षक मतदार संघाची यादी नव्‍याने तयार होणार
  शिक्षकांना  नव्‍याने अर्ज करण्याचे आवाहन  

            नांदेड दि. 27 :- शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी दिनांक 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित नव्‍याने तयार करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्‍यानुसार औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची यापूर्वी तयार केलेली मतदार यादी रद्द करुन नवीन यादी तयार करण्‍यात येत आहे.  या यादीसाठी यापुर्वी नाव नोंदणी केलेली असली तरी शिक्षक मतदारांनी नव्‍याने नमुना 19 मधील अर्ज करणे आवश्‍यक राहील. त्‍यानुसार सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक 5 नोव्‍हेंबर 2016 पर्यंत यादीत नाव नोंदविण्‍यासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.
मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे – मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करण्‍याचा कालावधी - दिनांक 01 ऑक्‍टोबर 2016 ते 05 नोव्‍हेंबर 2016, प्रारुप यादी प्रसिध्‍दी - दिनांक 23 नोव्‍हेंबर 2016, यादीवर दावे व हरकती स्विकारण्‍याचा कालावधी - दिनांक 23 नोव्‍हेंबर ते 08 डिसेंबर 2016, मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी - दिनांक 30 डिसेंबर 2016. मतदार नोंदणीसाठी त्या-त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल.
शिक्षक मतदार यादीत मतदार नोंदणीसाठीची पात्रता पुढील प्रमाणे - मतदारसंघातील सर्वसाधारण राहीवासी असावा. दिनांक 01.11.2016 पासून मागील सहा वर्षात किमान तीन वर्षे माध्‍यमिक पेक्षा कमी नसलेल्‍या शाळेचा शिक्षक म्‍हणून कार्यरत असणे आवश्‍यक राहील. ( सदर शाळा ही सामान्‍य प्रशासन विभागाचे राजपत्र दिनांक 08 ऑक्‍टोबर 1985 मध्य नमूद केल्‍या प्रमाणे असणे आवश्‍यक आहे.). तसेच मा. अलाहबाद उच्‍च न्‍यायालय, खंडपीठ लखनऊ मधील रिट याचिका क्र. 1269 (M/B) of 2008 मधील निर्देशानुसार वरील राजपत्रात नमुद असलेल्‍या विना अनुदानीत खाजगी माध्‍यमिक पेक्षा कमी नसलेले शाळेचे शिक्षक सुध्‍दा सदर मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठी पात्र असतील.  तथापि, त्‍यांना शिक्षक मतदार यादीसाठी पात्र मतदार असल्‍या बाबतचे जिल्‍हा शिक्षण अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
            मतदार नोंदणीसाठी सादर करावयाचे कागदपत्रे - नमुना 19 मधील परिपूर्ण भरलेला अर्ज. मागील सहा वर्षात किमान तीन वर्षे वरील प्रमाणे माध्‍यमिक पेक्षा कमी नसलेल्‍या शाळेतील शिक्षक असल्‍याबाबतचे विहित नमुन्‍यातील मुख्‍याध्‍यापक / प्राचार्य यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक राहील.
            जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून मतदार यादीत नोंदणीसाठी वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

00000
मत्सबीज उपलब्धतेबाबत आवाहन
नांदेड दि. 27 :- जिल्ह्यातील मच्छिमार बांधव, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक शेतकरी, तलाव ठेकेदार यांनी देगलूर तालुक्यातील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र करडखेड व किनवट तालुक्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्र लोणी येथे प्रमुख कार्प मत्स्यबीज उपलब्ध असून सर्व मच्छिमार बांधवांनी या मत्स्यबीज शासकीय दरात खरेदी करुन आपल्याकडील तलाव, शेततळीमधून संचयन करावे तसेच निलक्रांती या योजनेअंतर्गत प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड यांनी केले आहे.

000000
आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन 1 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश
नांदेड दि. 27 :- राज्याच्या समाज कल्याण संचालनालयाच्यावतीने 1 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, विभाग आदींनी या दिवशी जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघ, पंचायत राज, नगरपालिका, नेहरु युवा केंद्र, विविध शैक्षणिक संस्था तसेच जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य अधिकारी, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आदी व इतर सामाजिक संस्था संघटनांही सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000
महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंतीबाबत आवाहन
           नांदेड, दि. 27 :- महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोंबर 2016 रोजी सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान व त्याअंतर्गत रविवार 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.45 वा. सर्व शासकीय कार्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांना करण्यात आले आहे.
            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  जन्मदिन  आंतरराष्ट्रीय  अहिंसा दिन म्हणून जगभर पाळण्यात येतो. त्यानिमित्त 2 ऑक्टोंबर रोजी सर्वांनी महात्मा गांधीच्या अमर संदेशाप्रती कटिबद्ध राहण्याची शपथ घ्यावयाची आहे. त्या दिवशी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध समयोचित कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयांसह सर्व ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नियोजन करण्यात यावे, त्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अन्य मान्यवर, एनसीसी, एमएसस, छात्रसैनिक, शहरातील महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापक तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी यांना निमंत्रित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 00000
 जिल्ह्यात हंगामात 99.82 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 3.87 मि.मी. 
           नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात  मंगळवार 27 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 61.94 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 3.87 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 953.82 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-138.93, अर्धापूर-116.61, नांदेड-115.33, भोकर-111.88, कंधार-109.03, हदगाव-105.05, मुखेड-104.77, बिलोली-103.11, नायगाव-97.64, माहूर-96.37, धर्माबाद-90.69, हिमायतनगर-89.77, मुदखेड-89.12, उमरी-83.56, देगलूर-82.36, किनवट-77.26. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  99.82 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड-निरंक (1051.65), मुदखेड- 4.67 (760.69), अर्धापूर-निरंक (1014.00) , भोकर-4.00 (1114.75), उमरी-निरंक (832.60), कंधार-00.33 (879.47), लोहा-निरंक (1157.67), किनवट-6.43 (958.03), माहूर-21.25 (1195.00), हदगाव-5.00 (1026.69), हिमायतनगर-4.00 (877.31), देगलूर-0.33 (741.50), बिलोली-2.80 (998.20), धर्माबाद-10.33 (830.38), नायगाव-1.80 (894.00), मुखेड-01.00 (929.14) आज  अखेर  पावसाची सरासरी 953.82  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 15261.08) मिलीमीटर आहे. 
 00000
विष्णुपूरी प्रकल्प भेटीत पूर नियंत्रणासाठी झटणाऱ्या
यंत्रणांचे जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडून कौतूक
सदैव सतर्कतेचेही निर्देश , माध्यमांचेही मानले आभार

नांदेड, दि. 27 :- संततधार पाऊस आणि गोदावरी नदीत अन्य जिल्ह्यातील प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची आवक यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा समन्वयाने प्रयत्न करत आहेत.  या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पास भेट देऊन पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध यंत्रणाशी चर्चा करतानाच, आगामी काळातही आणखी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या या विविध यंत्रणाचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले आहे, तर या काळातील सहकार्यासाठी  विविध प्रसार माध्यमांचे, त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले आहेत. 
विष्णुपूरी प्रकल्पस्थळी नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, नांदेड मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. टी. लव्हराळे, उपअभियंता निलकंठ गव्हाणे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजगिरे, उपअभियंता श्री. लोखंडे, विद्युत विभागाचे उपअभियंता श्री. अवस्थी आदींचीही उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याची आवक, जलसंचय क्षमता तसेच विविध तांत्रिक विभागांचीही माहितीही घेतली. नदीपात्राची  जलधारण क्षमता आणि पाणी वहन क्षमता यानुसार पाण्याचासाठा तसेच पुढे पाण्याची पातळी आणि वेग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या बाबींचीही यावेळी माहिती देण्यात आली. विविध घटकांच्या अहोरात्र संपर्क-समन्वयामुळे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान रोखण्यात यश आले. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले, जिवीतहानी आणि मालमत्तेचे नुकसान काही प्रमाणात टाळता आले. पूर नियंत्रण यंत्रणेने दिवसाच्या प्रहरातच पाण्याचा विसर्ग करण्यासाठी अथक प्रयत्न केले.  यासाठी नागरिकांपर्यंत नेमकी माहिती पोहचविण्यासाठीही माध्यमांनीही प्रयत्न केले. त्याचेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले.
विष्णुपूरीसह नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पातून यापुढे रब्बी हंगामासाठी होणाऱ्या कृषि सिंचनासाठीच्या उपाययोजनांबाबतही काटेकोर नियोजनाबाबतही त्यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा केली. तसेच विष्णुपूरीसह विविध प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी, यापुढेही हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पावसाचा जोर वाढल्यास आणखी सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
विष्णुपूरी प्रकल्पातून दुपारपर्यंत एकाच दरवाज्यातून विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता. प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे सध्या नव्वद टक्क्यांवर असलेल्या या प्रकल्पात पुन्हा सायंकाळपर्यंत आणखी पाणीसाठा वाढू शकतो. त्यासाठीही आवश्यक समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले.

जलसंपदा विभागाचे कौतूक, माध्यमांचे आभार..
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांपासून गोदावरी नदीसह, मानार, लेंडी, पुर्णा आदी प्रकल्पांशी निगडीत नांदेड पाटबंधारे मंडळातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी अधिकारी-कर्मचारी पूर नियंत्रणासाठी झटत होते. माहितीची देवाण-घेवाण करीत होते, त्यासाठी प्रशासनाच्या सतत संपर्कात होते. यातूनच पूर नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करता आले. याकरिता जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड पाटबंधारे मंडळाचे कौतूक केले आहे. तर जिल्ह्यातील नागरिकांपर्यत वेळोवेळी प्रशासनाच्या प्रयत्नांची आणि पुराबाबतची वस्तुस्थिती पोहचविण्यात विविध माध्यम प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांनीही सहकार्य केले, त्यासाठीही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आभार मानले आहेत.
0000000

लेख

जिल्ह्याच्या आरोग्यपुर्णतेसाठी
आरोग्य विभागाची विविध रुग्णालये प्रयत्नशील

सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नांदेड जिल्हयातील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत. ही सर्व रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. या रुग्णालयात विविध राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा पुरविल्या जातात. नांदेड जिल्हयात एप्रिल, 2015 ते जून, 2016 अखेर उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य सेवांचा आढावा या लेखात घेतला आहे.
            जिल्हयात एक स्त्री रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय आहेत. या जिल्हयातील रुग्णालयांमध्ये या कालावधीत 2 लाख 79 हजार 603 आंतररुग्ण सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या कालावधीत 1 हजार 647 लहान शस्त्रक्रिया 396 मोठ्या शस्त्रक्रिया व 2 हजार 897 प्रसूति करण्यात आलेल्या आहेत. 1 लाख 8 हजार 792 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी व 26 हजार 505 रुग्णांची क्ष-किरण तपासणीही करण्यात आलेली आहे.
।। माता बाल संगोपन कार्यक्रम।।
            बालके ही उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. म्हणून सुदृढ बालक जन्माने येण्यासाठी मातेने योग्य काळजी घेतली तर निरोगी बालके जन्माला येतील. त्यासाठी गरोदरपणातील मातेच्या तपासण्या, आरोग्य, आहार, रुग्णालयात प्रसूती, जन्मानंतर त्वरीत स्तनपान, बाळाचे लसीकरण या सर्वावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हयात माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत 2 हजार 897 गरोदर मातांना व 1 हजार 893 बालकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत. माता व बालमृत्यु दर कमी करण्यासाठी संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमही राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत 36 हजार 136 गरोदर मातांना  व 1 हजार 214 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आलेली आहे.
।। जननी सुरक्षा योजना।।
            जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून संस्थात्मक प्रसुतींना प्रोत्साहन देण्यात येते. अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलांना नॉर्मल प्रसुतीसाठी 600 रुपये व सिजेरियन प्रसुतीसाठी 19 हजार 500 रुपये अनुदान या योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हयात या योजनेतंर्गत 2 हजार 751 गरोदर मातांना 18 लाख 90 हजार 180 रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे.
।। मानव विकास कार्यक्रम ।।
            गरोदर मातांची प्रसुती सुलभ व सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी शिबीरे या मानव विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात येतात. जिल्हयात 10 शिबीरांचे आयोजन करण्यात आले. 845 गरोदर व स्तनदा मातांना आणि 305 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील 8 गरोदर मातांना प्रत्येकी 4 हजार रुपयाप्रमाणे बुडीत मजूरी पोटी 32 हजार रुपये एवढी रक्कम वितरीत करण्यात आली.
            जिल्हयात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत 3 हजार 987 मोतिबिंदू शस्त्रक्रिया व 93 हजार 750 शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. दोन हजार 480 चष्मे वाटपही करण्यात आले. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील 9 लाख 69 हजार 803 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमातंर्गत 68 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, 283 मुलांच्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. याच कार्यक्रमातंर्गत 301 कुपोषित बालकांना औषधोपचार करुन त्यांचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे.
            मनोधैर्य वाढविण्यासाठी व वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमाची नोव्हेंबर 2015 पासून जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. 30 जून 2016 अखेर विविध आजारांसाठी 30 हजार 164 शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय सेवा त्वरेने मिळाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (टोल फ्री 108) अंतर्गत 25 रुग्णवाहिकीने 20 हजार 502 रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, सर्व प्रकारचे कॅन्सर व मौखिक आरोग्य तपासणी करुन 7 हजार 992 रुग्णांना त्यांच्या आजारा करिता आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयात पीसीपीएनडीटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लिंग गुणोत्तर प्रमाणात 32 ने वाढ झालेली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत 844 हृदय शस्त्रक्रिया 838 रुग्णांच्या किडनीच्या आजारावरील उपचार, इतर रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            निरोगी जीवनासाठी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग विविध योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजू जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरवित असते. जिल्हयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखालील रुग्णालये त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. या आरोग्य सुविधा सर्वापर्यंत पोहचत आहेत त्याचा लाभ घेऊन आरोग्य सुदृढ ठेवावे.

-         दिलीप गवळी ,
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...