Tuesday, September 27, 2016

विष्णुपूरी प्रकल्प भेटीत पूर नियंत्रणासाठी झटणाऱ्या
यंत्रणांचे जिल्हाधिकारी काकाणी यांच्याकडून कौतूक
सदैव सतर्कतेचेही निर्देश , माध्यमांचेही मानले आभार

नांदेड, दि. 27 :- संततधार पाऊस आणि गोदावरी नदीत अन्य जिल्ह्यातील प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याची आवक यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा समन्वयाने प्रयत्न करत आहेत.  या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पास भेट देऊन पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध यंत्रणाशी चर्चा करतानाच, आगामी काळातही आणखी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पूर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या या विविध यंत्रणाचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले आहे, तर या काळातील सहकार्यासाठी  विविध प्रसार माध्यमांचे, त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले आहेत. 
विष्णुपूरी प्रकल्पस्थळी नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, नांदेड मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम. टी. लव्हराळे, उपअभियंता निलकंठ गव्हाणे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजगिरे, उपअभियंता श्री. लोखंडे, विद्युत विभागाचे उपअभियंता श्री. अवस्थी आदींचीही उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याची आवक, जलसंचय क्षमता तसेच विविध तांत्रिक विभागांचीही माहितीही घेतली. नदीपात्राची  जलधारण क्षमता आणि पाणी वहन क्षमता यानुसार पाण्याचासाठा तसेच पुढे पाण्याची पातळी आणि वेग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या बाबींचीही यावेळी माहिती देण्यात आली. विविध घटकांच्या अहोरात्र संपर्क-समन्वयामुळे पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान रोखण्यात यश आले. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले, जिवीतहानी आणि मालमत्तेचे नुकसान काही प्रमाणात टाळता आले. पूर नियंत्रण यंत्रणेने दिवसाच्या प्रहरातच पाण्याचा विसर्ग करण्यासाठी अथक प्रयत्न केले.  यासाठी नागरिकांपर्यंत नेमकी माहिती पोहचविण्यासाठीही माध्यमांनीही प्रयत्न केले. त्याचेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी कौतूक केले.
विष्णुपूरीसह नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पातून यापुढे रब्बी हंगामासाठी होणाऱ्या कृषि सिंचनासाठीच्या उपाययोजनांबाबतही काटेकोर नियोजनाबाबतही त्यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा केली. तसेच विष्णुपूरीसह विविध प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी, यापुढेही हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पावसाचा जोर वाढल्यास आणखी सतर्कता बाळगण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
विष्णुपूरी प्रकल्पातून दुपारपर्यंत एकाच दरवाज्यातून विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता. प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे सध्या नव्वद टक्क्यांवर असलेल्या या प्रकल्पात पुन्हा सायंकाळपर्यंत आणखी पाणीसाठा वाढू शकतो. त्यासाठीही आवश्यक समन्वय राखण्याचे निर्देश देण्यात आले.

जलसंपदा विभागाचे कौतूक, माध्यमांचे आभार..
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांपासून गोदावरी नदीसह, मानार, लेंडी, पुर्णा आदी प्रकल्पांशी निगडीत नांदेड पाटबंधारे मंडळातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी अधिकारी-कर्मचारी पूर नियंत्रणासाठी झटत होते. माहितीची देवाण-घेवाण करीत होते, त्यासाठी प्रशासनाच्या सतत संपर्कात होते. यातूनच पूर नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करता आले. याकरिता जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड पाटबंधारे मंडळाचे कौतूक केले आहे. तर जिल्ह्यातील नागरिकांपर्यत वेळोवेळी प्रशासनाच्या प्रयत्नांची आणि पुराबाबतची वस्तुस्थिती पोहचविण्यात विविध माध्यम प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांनीही सहकार्य केले, त्यासाठीही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आभार मानले आहेत.
0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...