शिक्षक मतदार संघाची यादी नव्याने
तयार होणार
शिक्षकांना नव्याने अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 :- शिक्षक
मतदारसंघाची मतदार यादी दिनांक 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने
तयार करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद
शिक्षक मतदारसंघाची यापूर्वी तयार केलेली मतदार यादी रद्द करुन नवीन यादी
तयार करण्यात येत आहे. या यादीसाठी
यापुर्वी नाव नोंदणी केलेली असली तरी शिक्षक मतदारांनी नव्याने नमुना 19 मधील
अर्ज करणे आवश्यक राहील. त्यानुसार सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक 5 नोव्हेंबर
2016 पर्यंत यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा निवडणूक
अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
मतदार
यादी तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे – मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करण्याचा
कालावधी - दिनांक 01 ऑक्टोबर 2016 ते 05 नोव्हेंबर 2016, प्रारुप यादी प्रसिध्दी
- दिनांक 23 नोव्हेंबर 2016, यादीवर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी -
दिनांक 23 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर 2016, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी - दिनांक
30 डिसेंबर 2016. मतदार नोंदणीसाठी त्या-त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाकडे अर्ज
सादर करावा लागेल.
शिक्षक मतदार यादीत मतदार नोंदणीसाठीची
पात्रता पुढील प्रमाणे - मतदारसंघातील सर्वसाधारण राहीवासी असावा. दिनांक
01.11.2016 पासून मागील सहा वर्षात किमान तीन वर्षे माध्यमिक पेक्षा कमी नसलेल्या
शाळेचा शिक्षक म्हणून कार्यरत असणे आवश्यक राहील. ( सदर शाळा ही सामान्य
प्रशासन विभागाचे राजपत्र दिनांक 08 ऑक्टोबर 1985 मध्य नमूद केल्या प्रमाणे असणे
आवश्यक आहे.). तसेच मा. अलाहबाद उच्च न्यायालय, खंडपीठ लखनऊ मधील
रिट याचिका क्र. 1269 (M/B) of
2008 मधील निर्देशानुसार वरील राजपत्रात नमुद असलेल्या विना अनुदानीत खाजगी माध्यमिक
पेक्षा कमी नसलेले शाळेचे शिक्षक सुध्दा सदर मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी
पात्र असतील. तथापि, त्यांना
शिक्षक मतदार यादीसाठी पात्र मतदार असल्या बाबतचे जिल्हा शिक्षण अधिकारी यांचे
प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
मतदार नोंदणीसाठी सादर
करावयाचे कागदपत्रे - नमुना 19 मधील परिपूर्ण भरलेला अर्ज. मागील सहा वर्षात
किमान तीन वर्षे वरील प्रमाणे माध्यमिक पेक्षा कमी नसलेल्या शाळेतील शिक्षक असल्याबाबतचे
विहित नमुन्यातील मुख्याध्यापक / प्राचार्य यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
राहील.
जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघाच्या
शिक्षक मतदारांनी या मतदार नोंदणी कार्यक्रमाची नोंद घेवून मतदार यादीत नोंदणीसाठी
वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
00000
No comments:
Post a Comment