Thursday, August 10, 2017

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 10 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 70  व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार 15 ऑगस्ट, 2017  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहनही  राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय समितीने केले आहे.

0000000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 10 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

                                                                    00000
तुर खरेदी पडताळणीसाठी समिती गठीत
शेतकऱ्यांनी तुर खरेदी केंद्रावर आणु नये
 नांदेड दि. 10 :- बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत 31 मे 2017 पुर्वी टोकन व नोंद असलेल्या शेतकऱ्यांची तुर खरेदी करण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये शेतकरी व शेतकऱ्यांची तूर असल्याची पडताळणी करण्यासाठी  संबंधीत तालुक्याचे सहायक निबंधक यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती तुर नोंदीप्रमाणे पडताळणी करुन अहवाल दिल्यानंतर शेतकऱ्यांना दुरध्वनीद्वारे संपर्क करुन, बोलावून तुर खरेदी करण्यात येणार आहे. तुर्त शेतकऱ्यांनी तुर खरेदी केंद्रावर आणु नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.    

0000000
कौशल्य विकास कार्यालयाकडून  
रोजगार मेळावा संपन्न ; 15 उमेदवारांची नियुक्ती  
 नांदेड दि. 10 :- कौशल्य विकास रोजगार उद्योजकता कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी महत्मा फुले मंगल कार्यालय, आयटीआय जवळ नांदेड येथे नुकताच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास चार नामांकित उद्योजकांनी 227 पदे अधिसुचित केली होती. यावेळी 209 उमेदवारांनी मुलाखत दिल्या त्यापैकी 15 उमेदवारांना नियुक्ती आदेश तात्काळ देण्यात आले.
यावेळी सहायक संचालक उल्हास सकवान यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व आण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळाकडून बीज भांडवल योजना विषयक मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हुजुर साहेब आयटीआयचे प्राचार्य गुरुबच्चन सिंघ होते. शासकीय आयटीआयचे प्राचार्य सुशिल बुजाडे, व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे संस्थाचालक अभयकुमार दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.  सुत्रसंचालन व आभार अनिता भालेराव यांनी मानले.

000000
डीएलएड प्रथम वर्षासाठी विशेष फेरी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड दि. 10 :-  प्राथमिक शिक्षण पदविका (डीएलएड) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या 5 फेऱ्या घेण्यात आल्या. परंतू शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने त्या भरण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mscert.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावीत, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश होईल. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण खुला संवर्गासाठी 49.5 टक्के तर मागासवर्गीय संवर्गासाठी 44.50 टक्के गुण आवश्यक आहेत. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी 12 ते 16 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदत राहील. पडताळणी केंद्रावर जाऊन मुळ प्रमाणपत्रे पडताळणी 12 ते 17 ऑगस्ट 2017 पर्यंत करण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्गासाठी 200 रुपये, तर मागासवर्गीय संवर्गासाठी 100 रुपये राहील. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधुनच प्रवेश घेऊन अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेच प्रवेशपत्र स्वत: ईमेल / लॉगीनमधून प्रिंट घेऊन अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था, श्रीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...