Friday, October 29, 2021

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 620 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 398 एवढी झाली असून यातील 87 हजार 714 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 32 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, लोहा 1, यवतमाळ 1, असे एकूण 4  बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 2  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2  व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 32 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणा 6,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 4 अशा एकूण 32 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 53 हजार 355

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 49 हजार 712

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 398

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 714

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-32

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 आरोग्यवर्धक दिवाळीसाठी नांदेड जिल्हावासीयांनो

कोरोनाचे निर्देश पाळणे गरजेचे

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोविड-19 पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करतांना नियंत्रीत होत आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विसर न पडू देता नांदेड जिल्हावासी अधिक जबाबदारीने काळजी घेऊन हा उत्सव साजरा करतील, अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. दिवाळी उत्सव 2021 बाबत राज्य शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असून त्याचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दिवाळी निमित्त कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्‍तू खरेदी करण्‍यासाठी दुकाने, मॉल्स, शोरुम व रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळली पाहिजे. ज्‍येष्‍ठ नागरिक, लहान बालके यांनी घराबाहेर शक्य तो पडण्‍याचे टाळावे. कोरोना बाधित नागरिकांना फटाक्‍यांच्‍या धुरामुळे त्रास होऊ नये व वायु, ध्‍वनी प्रदुषण पातळी वाढू नये म्हणून फटाके फोडण्‍याचे टाळावे व दिव्‍यांची आरास करुन उत्‍सव साजरा करावा, असे यात स्पष्ट केले आहे. सध्या कोरोनाचे नियम शिथील करण्‍यात आले असले तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ए‍कत्रित येण्‍यावर निर्बंध कायम ठेवावेत. त्‍यामुळे सार्वजनिक कार्यक्रम दिपावली पहाट आयोजित करतांना मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन करावे. सांस्‍कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्‍याचे उपक्रम, शिबीरे रक्‍तदान आयोजित करणे उचीत राहील.   

कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्या दिड वर्षापासून सर्व धर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने पुढील मागदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. 

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे. कोविड संसर्गामूळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरघुती स्वरुपात मर्यादित राहील यांची दक्षता घेण्यात यावी. दिपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर गर्दी होत असते. नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन जेष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग संक्रमन वाढणार नाही. दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामूळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांना तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामूळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर रोजीच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सूचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठया प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम  उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना या मार्गदर्शक सूचनामधील सूचनामधील नियमांचे काटेकोर पालन होईल यांची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमाचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया  प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन क्र. 728/2015 दि. 23 ऑक्टोंबर 2018 तसेच सिव्हील अपिल क्र. 2865-2867/2021 निर्णय दि. 23 जुलै 2021 मधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. 

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे स्पष्ट केले आहे. 

00000

 देगलूर विधानसभा पोटनिवडणूक 

मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी

30 ऑक्टोंबरला मतदारांना मतदानासाठी सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य  बजावता यावे यासाठी शनिवार 30 ऑक्टोंबर रोजी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश शासनाने परिपत्रकाद्वारे निर्गमीत केले आहे. निवडणुकांमध्ये 100 टक्के मतदान हे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 (भाग 2) मधील 135 (ब) नुसार मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा कामाच्या तासात न्यायोचित सवलत देण्याचे प्रावधान आहे. मात्र अलिकडच्या काळात काही संस्था, आस्थापना या भरपगारी  सुट्टी किंवा सवलत देत नसल्यामुळे याचा विपरीत परिणाम मतदानावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागणे हे लोकशाहीसाठी घातक लक्षण समजले जाते. 

यादृष्टिने शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने गांभीर्याने विचार करुन निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात असलेल्या कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी दिली पाहिजे. याचबरोबर मतदार जर निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असतील तर त्यांनाही सवलत दिली पाहिजे. सदर सुट्टी खासगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स्, रिटेलर्स आदी उद्योग, ऊर्जा कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखान्यांना लागू राहिल. 

अपवादात्मक परिस्थितीत जर एखादा अधिकारी, कामगार, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी किमत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित आस्थापनांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. मतदारांकडून मतदानाकरीता सुट्टी अथवा योग्य ती सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य झाले नाही आशा प्रकारची तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब  खताळ यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

000000

 देगलूर पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेसाठी

1 हजार 677 अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- 90- देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान शनिवार  30 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहे. ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने 1 हजार 648 कर्मचारी आणि 29 क्षेत्रिय अधिकारी यांची नेमणूक केली आहे, असे देगलूर निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. 

या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रीयेत पुरुष मतदार 1 लाख 54 हजार 92, स्त्री मतदार 1 लाख 44 हजार 256 तर इतर 5 आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी मतदाराची संख्या 187 असून असे एकूण 2 लाख 98 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

00000

 निवृत्तीवेतन धारकांना पेन्शन मिळण्यासाठी

बँकेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्या नावासमोरच्या रकान्यात करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून बँकांना अद्या अक्षरनिहाय यादी पाठविण्यात आली असून ही स्वाक्षरी दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2021 या कालावधीत करावी, असे आवाहन कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे.

 

याचबरोबर बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखल करण्याकरिता http://jeevanpramam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सादर  करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील यादीत जर कोणी स्वाक्षरी  किंवा अंगठा उमटवलेला नसेल तसेच जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर 2021 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 29 :-जिल्ह्यात रविवार 15 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यात  शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे,अशी माहिती  अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात 1 नोव्हेंबर 2021 रोजीच्या सकाळी 6 वाजेपासून 15 नोव्हेंबरच्या 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहेत.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना या आदेशात नमूद असलेल्या कृत्ये सार्वजनिक परिसरात किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश कामावरील पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी तसचे परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी सभा, मिरवणुका मोर्चा, काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलिस अधिक्षक नांदेड यांना प्राधिकृत केलेल्या इतर पोलिस अधिकारी यांना राहील.

00000

 

 अन्न व्यावसायिकांनी परवाना / नोंदणी घेवूनच व्यवसाय करावा

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सणासुदीच्या दिवसात मिठाई व फराळाचे पदार्थ यांना मोठया प्रमाणात मागणी वाढते. या दिवसात बरेच व्यावसायिक मिठाई व फराळाचे पदार्थ उत्पादन व विक्रीचा व्यवसाय सुरु करतात. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेणे बंधनकारक आहे. अशा सर्व व्यावसायिकांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

परवाना व नोंदणीसाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. आवश्यक शुल्क ऑनलाइन भरावे. अन्न व्यवसायाच्या स्वरुपानुसार आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क वरील संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. अन्न व्यावसायिकांना परवाना किंवा नोंदणीसाठी काही अडचण असेल तर त्यांनी helpdesk-foscos@fssai.gov.in या ई-मेलवर किंवा 1800112100 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांचे आदेशानुसार सुटया(लुज) स्वरुपात विक्रीसाठी प्रदर्शित केलेल्या भारतीय पारंपारीक मिठाई या अन्नपदार्थच्या ट्रे किंवा कंटेनरवर बेस्ट बिफोर दिनांक टाकणे बंधनकारक केले आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा (पपरवाना व नोंदणी अधिनियम 2011) मधील इतर परवाना क्रमांक 2 नुसार मिठाई व्यावसायिकांनी नोटीस बोर्डवर मिठाईचे स्वरुप घटकपदार्थ प्रदर्शित करणे आवश्यक आहे. ही बाब ग्राहकहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे अन्न व औषध विभागाने स्पष्ट केले आहे.

मिठाई व्यावसायिकांनी या तरतुदीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. जे व्यावसायिक या तरतुदीचे पालन करणार नाहीत त्यांचेवर उचित कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले. सर्व मिठाई उत्पादक व विक्रेत्यांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यातर्गत आवश्यक परवाना/नोंदणी आस्थापनेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. मिठाई उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक खवा व इतर घटकपदार्थ परवाना व नोंदणी धारक आस्थापनाकडूनच खरेदी करावेत. अशा प्रकारे ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व मिठाई व्यावसायिकांनी वरील सूचनांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

वृत्त क्रमांक   513 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दि. 19 मे :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नद...