Friday, October 29, 2021

 देगलूर विधानसभा पोटनिवडणूक 

मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी

30 ऑक्टोंबरला मतदारांना मतदानासाठी सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य  बजावता यावे यासाठी शनिवार 30 ऑक्टोंबर रोजी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश शासनाने परिपत्रकाद्वारे निर्गमीत केले आहे. निवडणुकांमध्ये 100 टक्के मतदान हे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 (भाग 2) मधील 135 (ब) नुसार मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा कामाच्या तासात न्यायोचित सवलत देण्याचे प्रावधान आहे. मात्र अलिकडच्या काळात काही संस्था, आस्थापना या भरपगारी  सुट्टी किंवा सवलत देत नसल्यामुळे याचा विपरीत परिणाम मतदानावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागणे हे लोकशाहीसाठी घातक लक्षण समजले जाते. 

यादृष्टिने शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने गांभीर्याने विचार करुन निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात असलेल्या कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी दिली पाहिजे. याचबरोबर मतदार जर निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असतील तर त्यांनाही सवलत दिली पाहिजे. सदर सुट्टी खासगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स्, रिटेलर्स आदी उद्योग, ऊर्जा कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखान्यांना लागू राहिल. 

अपवादात्मक परिस्थितीत जर एखादा अधिकारी, कामगार, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी किमत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित आस्थापनांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. मतदारांकडून मतदानाकरीता सुट्टी अथवा योग्य ती सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य झाले नाही आशा प्रकारची तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब  खताळ यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...