Friday, June 23, 2017

पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावे  
                                                - डॉ. अफरोज अहेमद
            नांदेड, दि. 23 :-  ग्लोबल वार्मिंगच्या नुसत्याच चर्चा करुन चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करुन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आज ज्या गतीने जंगल नष्ट होत आहेत त्याच गतीने जंगलाचे संवर्धनही करण्याची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये पर्यावरण एक गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळेच केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून वनांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याला यशही येत असल्याचे मत पर्यावरण व पुनर्वसन समितीचे केंद्रीय सदस्य डॉ. अफरोज अहेमद यांनी व्यक्त केले.
           
सरदार सरोवर प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर वनजमीन गेली आहे. त्यात लाखो विविध प्रकारचे झाडे नष्ट झाले आहेत. त्याची भरपाई म्हणून गायरान जमिनीवर वन विभागाकडून पर्यायी वनीकरण करण्यात येत आहे. त्यात हदगाव तालुक्यातील कोहळी येथे 540 हेक्टर खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी डॉ. अहेमद नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती श्री बग्गा हे देखील होते.
यावेळी डॉ. अहेमद म्हणाले की, सरदार सरोवरामध्ये महाराष्ट्रातील 33, मध्यप्रदेशातील 152 तर गुजरातमधील 19 गावे गेली. सुमारे 46 हजार कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील 11 गावे मुलभुत सोयी-सुविधांयुक्त वसविण्यात आली आहेत. यात बहुतांश आदिवासी लोकांचा समावेश आहे. आज आदिवासी कुटुंबातील मुलेही उच्च शिक्षण घेत आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शिवाय 1 हजार 450 मेगा वॅट वीजही तयार होत आहे. त्यापैकी 300 मेगा वॅट वीज ही महाराष्ट्राला मिळत आहे. शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार, हदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. एस. एस. एखंडे, वनसर्वेक्षक मोहन कोस्केवार, नांदेड नेचर क्लबचे हतिंद्र कट्टी, महेश होकर्णे व कर्मचारी उपस्थित होते.

000000
पशु-पक्षांना फटाकाच्या ध्वनी पासून
त्रास होऊ देऊ नका
नांदेड दि. 23 :- पशु व पक्षांना फटाक्यांच्या ध्वनी प्रदुषणांचा भयंकर त्रास होत असल्याने हे मुके पशु पक्षी तीव्र ताण व दडपणाखाली जगत असतात. प्रत्येक सणावाराच्या व समारंभाच्यावेळी फोडण्यात येणाऱ्या फटाक्याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत जनजागृती करुन त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे आवश्यक आहे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन तथा सदस्य सचिव महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ यांच्यावतीने जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
मंडप, पेंडॉल तपासणीसाठी समिती गठीत
नांदेड दि. 23 :- मा. उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्राकरीता मंडप, पेंडल तपासणीसाठी सनियंत्रण समिती आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये गठीत करण्‍यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी असून सदस्य नांदेड महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष कंदेवाड व नांदेड पोलीस उपअधिक्षक (गृह) विश्वास नांदेडकर हे आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, सर्व सनियंत्रण समिती सदस्य शासन परिपत्रकात नमुकेल्याप्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही करतील. मंडप तपासणी समितीने सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभासाठी उभारण्‍यात येणा-या पथकांच्‍या क्षेत्राबाबतचा प्रस्‍ताव  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रत्‍येक र्षी जानेवारी महिन्‍याच्‍या 10 तारखेपर्यत सादर करतील. त्‍याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जानेवारी महिन्‍यांच्‍या 21 तारखेपर्यत मंडप तपासणी पथक, पथके गठीत करण्‍याबाबतचे आदेश निर्गमित केले जातील.  गठीत करण्‍यात आलेल्‍या मंडप तपासणी पथकाची माहिती सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये दर्शनीय भागावर प्रदर्शित करावी. समितीने गठित मंडप तपासणी पथकाआपल्‍या कार्यक्षेत्रातील सर्व मंडप, पेंडॉल यांना सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभापुर्वी सात दिवस अगोदर नियमित भेट देण्‍यासंदर्भात आदेशित करावे. समितीने मंडप तपासणी पथकाकडून तपासणीबाबतचा वस्‍तुनिष्‍ठ अहवाल विहित कालमर्यादेत (सण, उत्‍सव, समारंभ सुरु होण्‍यापूर्वी तीन दिवस अगोदर) प्राप्‍त करुन घेऊन एकत्रितपणे माहिती प्रपत्र क्र. 2 मध्‍ये जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.  मंडप तपासणी पथकामार्फत सादर करण्‍यात आलेल्‍या अहवालावर सक्षम प्राधिका-याने केलेल्‍या कार्यवाहीचा त्रै-मासिक अहवाल विवरणपत्र क्र. 2 मध्‍ये शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास नियमितपणे सादर करण्‍याची जबाबदारी मंडप तपासणी समितीची राहिल.  ही कार्यवाही करताना मा. उच्‍च न्‍यायालयांचे निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍यात यावी व कुठल्‍याही परिस्थिती मा. उच्‍च न्‍यायालयाचे आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.

000000
दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड दि. 23 :-  जिल्ह्यात सोमवार 26 जुन 2017 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने (चंद्र दर्शनानुसार) रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोमवार 26 जुन रोजी जिल्ह्यातील दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहे.
जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी रमजान ईद 26 जुन रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्या अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

000000
कृषि दिनानिमित्त 1 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन
शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
            नांदेड, दि. 23 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती शनिवार 1 जुलै 2017 रोजी कृषि दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद येथे शनिवारी सकाळी 11 वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...