Thursday, July 30, 2020


वृत्त क्र. 707  
मुखेडच्या कोरोना केअर सेंटर येथील बाधितांची
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी घेतली प्रत्यक्ष भेट  
क्ष-किरण सीआर मशीनचे उद्घाटन
        नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने ग्रामीण भागात अधिक वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. याअंतर्गत मुखेड येथील कोविड केंअर सेंटरला सीआर मशीनचे उपलब्ध करुन दिल्या असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी त्याचे औपचारिक उद्घाटन केले.  यावेळी डॉ. मगदूम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ए. एम. पाटील, नोडल ऑफिसर डॉ. एस. के. टाकसाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी मोरे व कोविड केअर सेंटर येथील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
 यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी पीपीई किट परिधान करुन डेडिकेटेड कोविड केअर सेंटर मधील कोरोना बाधितांच्या आरोग्याची विचारपूस करुन त्यांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याबाबत आश्वासित केले. कोरोना बाधित व्यक्तींनी घाबरुन न जाता वेळेवर औषधोपचार घ्यावा. पन्नास वर्षावरील व्यक्तींनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. इतर राज्य व जिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांनी स्वत: पुढे येवून प्रशासनाला सहकार्य करावे व उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुखेड येथील बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. गाव, घरनिहाय संशयित व्यक्तींची तपासणी सर्वेक्षण मोहिम सुरु असून ॲटीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आढळलेल्या बाधित व्यक्तींना वेळेत उपचार देण्यात येत आहे. त्यामुळे बाधित व्यक्तीं बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहेत. डॉ. भोसीकर यांनी मुखेड कोविड केंअर सेंटर येथील अतिदक्षता विभागास भेट देवून व्हेटिलेटरबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.   
00000


वृत्त क्र. 706  
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी हा पंधरवाडा महत्वाचा
नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने कामपासह सर्वच पिक अत्यंत चांगल्या अवस्थेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरु होण्याआगोदर ठिबकवर कापसाची लागवड केली त्यांचा कापसाला आता फुलोरा आला आहे. हा आलेला फुलोरा या वातावरणात किडीला निमंत्रण देणारा असून यात प्रामुख्याने गुलाबी बोंडअळी, डोमकळी, शेंद्री बोंडअळी ही किड तशीच ठेवली तर कापसाचे उत्पादन हाती लागणार नाही. या किडीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी हाच पंधरवाडा अतिशय महत्वाचा असून शेतकऱ्यांनी याचा प्राथमिक अवस्थेतच बंदोबस्त करण्यासाठी लिंबोळी अर्कची फवारणी, डोमकळी नष्ट करणे व शेतात ट्रॅपलावणे ही तीन कामे प्राधान्याने करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झुमवर सर्व संबंधितांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत कापसावरील किड रोग व्यवस्थापनाच्यादृष्टिने सर्व संबंधितांना सुचना देण्यात आल्या.
पिकाच्या किड व्यवस्थापनासाठी प्राथमिक अवस्थेतच काही नैसर्गिक उपाय करुन यावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. यात प्रामुख्याने आठवड्याला एका लिंबोळी अर्कची फवारणी, डोमकळी असलेले फुले वेचून नष्ट करणे व ट्रॅपलावून यातील गोळा झालेली किड काळजीपूर्वक नष्ट करणे ही त्रीसुत्री खूप मोलाची आहे. याचा वापर वेळेवर सुरु केल्यास शेतकऱ्यांना रासायनिक फवारणीकडे आताच वळण्याची गरज भासणार नाही, असे चवलवदे यांनी सांगितले.
रासायनिक खताची हाताळणी हा अत्यंत आव्हानात्मक विषय झाला असून याचे दुष्परिणाम लागलीच दिसून येतात. यात शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवताला धोका होऊ नये यासाठी फवारणी करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना डोळ्याला मास्क, चष्मा, हातमोजे व इतर अत्यावश्यक काळजी घेतली पाहिजे यावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भर देऊन संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक जनजागृती करण्याचे सांगितले.    
00000


वृत्त क्र. 705  
कौशल्यावर आधारित काम करणाऱ्या
शेतमजुरांसाठी महत्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम
नांदेड (जिमाका) दि. 30 :- ग्रामीण भागातील शेतमजुरांचे कौशल्य वाढविण्याच्यादृष्टिने महाराष्ट्र शासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यात एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, कृषि क्षेत्रात काम करतांना सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, शेतीपूरक कार्यक्षम व्यवसायिक सेवांची शेतकऱ्यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापुर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे. शेतीतील उत्पादन गुणवत्तापूर्ण घेण्याच्यादृष्टिने प्रशिक्षण घेतलेले शेतमजूर शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सहाय्यभूत ठरतील. या शेतमजूरांना प्राशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सुक्ष्म सिंचनाची देखभाल दुरुस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी आदी कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिल्यास कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होवून शेतकऱ्यांनासुध्दा मोठा फायदा होणार आहे.
सद्यस्थितीमध्ये कापूस व मका या प्रमुख पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार आहे. ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आला आहे. जेणेकरुन किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल.
या प्रशिक्षणाबाबत संबंधीत जिल्ह्यातील प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधुन ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे अवाहन संचालक आत्मा कृषि आयुक्तालय पुणे यांनी केले आहे. 
00000


कोरोनातून आज 56 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 117 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 30 :-  जिल्ह्यात आज 30  जुलै रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 56 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 117 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 656 अहवालापैकी 457 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 685 एवढी झाली असून यातील 846 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 749 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे.
बुधवार 29 जुलै रोजी कंधार येथील 65 वर्षाची एक महिला, देगलूर येथील 68 वर्षाचा एक पुरुष डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे आणि वजिराबाद नांदेड येथील 40 वर्षाचा एक पुरुषाचा व गुरुवार 30 जुलै रोजी  नेरली नांदेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 74 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 56 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 19, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 13, उमरी कोविड केअर सेंटर येथील 10, खाजगी रुग्णालयातील 6, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 7, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1 अशा 56 कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये कलामंदिर येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, वाडी येथील 65 वर्षाची 1 स्त्री, गितानगर येथील 76 वर्षाचा 1 पुरुष, बालाजीनगर येथील 22 वर्षाचा एक पुरुष, सोमेश कॉलनी येथील 21 वर्षाची एक स्त्री, शास्त्रीनगर येथील 55 वर्षाची 1 स्त्री, चौफाळा रोड येथील 40 वर्षाचा एक पुरुष, गाडीपुरा येथील 40 वर्षाचा एक पुरुष, वसंतनगर येथील 32 वर्षाचा एक पुरुष, गोवर्धन घाट येथील 14 वर्षाचा एक मुलगा, गणेशनगर येथील 36 वर्षाची 1 स्त्री, आनंदनगर येथील 35 वर्षाचा एक पुरुष व 65 वर्षाची 1 स्त्री, मदिनानगर येथील 58 वर्षाचा एक पुरुष, हडको येथील 29 वर्षाचा एक पुरुष, सिडको येथील 52 वर्षाची 1 स्त्री, वसरणी येथील 17 वर्षाचा एक पुरुष तर 35, 70 वर्षाच्या दोन स्त्री, वाजेगाव येथील 23 वर्षाचा एक पुरुष असे नांदेड शहरातील बाधित आहेत.
अर्धापूर येथील 12 वर्षाचा एक मुलगा, सगरोळी येथील 18 वर्षाचा एक पुरुष व 55 वर्षाची एक स्त्री, कोलेबोर येथील 40 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 68 वर्षाचा एक पुरुष, करेमलकापूर देगलूर येथील 49 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 50 वर्षाचा एक पुरुष, भोईगल्ली येथील अनुक्रमे 14,28 व 31 वर्षाचे तीन पुरुष व 45 वर्षाची एक स्त्री, लाईनगल्ली येथील 18,48 वर्षाचे 2 पुरुष व 25,26,60 वर्षाच्या 3 महिला, नागोबा मंदिर येथील 68 वर्षाची 1 स्त्री, 50,72 वर्षाच्या 2 स्त्री, भाविदास चौक येथील 43 वर्षाचा एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील 52 वर्षाचा एक पुरुष, धर्माबाद येथील 28 वर्षाचा एक पुरुष, हदगाव येथील अनुक्रमे 15,15,17,28,24,30,30,47,50 वर्षाचे 9 पुरुष व 29,34,45,50 वर्षाच्या 4 महिला, तामसा येथील 29 वर्षाचा 1 पुरुष व 30 वर्षाची 1 महिला, कंधार येथील 70 वर्षाचा 1 पुरुष, हात्तेपुरा येथील 19 व 75 वर्षाचे 2 पुरुष, फुलवळ येथील 20,29 वर्षाचे 2 पुरुष व 48 वर्षाची 1 स्त्री, फुलेनगर येथील 34 वर्षाची 1 स्त्री, पानभोसी येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, सोनखेड येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, मंग्याल ता. मुखेड येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, वाल्मीक नगर येथील 38 वर्षाचा एक पुरुष, नायगाव येथील 40, 49 वर्षाचे 2 पुरुष, नरसी येथील 50 वर्षाची 1 स्त्री, कोकलेगाव येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, उमरी येथील 67 वर्षाचा 1 पुरुष, खुसदा पुर्णा येथील 49 वर्षाचा एक पुरुष हे आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
अँटिजेन तपासणीद्वारे हैदरबाग येथील 60 वर्षाचा एक पुरुष, गोवर्धन घाट येथील 40 वर्षाचा एक पुरुष, बोरबन येथील 14,39,40 वर्षाचे 3 पुरुष तर 13 व 37 वर्षाच्या 2 स्त्री, कोसरनगर येथील 20 वर्षाची 1 स्त्री, कौठा येथील 34 वर्षाचा 1 पुरुष, जयभीमनगर येथील 13,22,25,29,30,40,45 वर्षाचे 7 पुरुष व 6,16,19,34,35,40,60 वर्षाच्या 8 महिला, मुखेड येथील 18 वर्षाचा एक पुरुष तर 4,25,29,36 वय वर्षाच्या 4 महिला, नागसेननगर नांदेड येथील 12,13,14 वर्षाचे 3 पुरुष, राजनगर नांदेड येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, चिखलवाडी येथील 30 वर्षाचा 1 पुरुष व 10,34 वर्षाच्या 2 स्त्री, जेतवननगर येथील 47 वर्षाचा एक पुरुष, महाविर सोसायटी येथील 72 वर्षाचा एक पुरुष, हडको येथील 50 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 62 वर्षाची 1 स्त्री, दापका येथील 8 वर्षाचा एक पुरुष, भोकर येथील 51 वर्षाची 1 स्त्री हे बाधित आढळले.
जिल्ह्यात 749 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 130, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 269, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 25, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 19, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 15, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 95, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 39, लोहा कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर 27, भोकर कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर येथे 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 24, किनवट कोविड केअर सेंटर येथे 10, खाजगी रुग्णालयात 72 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 3 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 2 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 242,
घेतलेले स्वॅब- 13 हजार 776,
निगेटिव्ह स्वॅब- 10 हजार 876,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 117,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 685,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 22,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 56,
मृत्यू संख्या- 78,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 846,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 749,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 202. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...