Thursday, July 30, 2020


वृत्त क्र. 706  
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी हा पंधरवाडा महत्वाचा
नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने कामपासह सर्वच पिक अत्यंत चांगल्या अवस्थेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरु होण्याआगोदर ठिबकवर कापसाची लागवड केली त्यांचा कापसाला आता फुलोरा आला आहे. हा आलेला फुलोरा या वातावरणात किडीला निमंत्रण देणारा असून यात प्रामुख्याने गुलाबी बोंडअळी, डोमकळी, शेंद्री बोंडअळी ही किड तशीच ठेवली तर कापसाचे उत्पादन हाती लागणार नाही. या किडीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी हाच पंधरवाडा अतिशय महत्वाचा असून शेतकऱ्यांनी याचा प्राथमिक अवस्थेतच बंदोबस्त करण्यासाठी लिंबोळी अर्कची फवारणी, डोमकळी नष्ट करणे व शेतात ट्रॅपलावणे ही तीन कामे प्राधान्याने करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झुमवर सर्व संबंधितांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत कापसावरील किड रोग व्यवस्थापनाच्यादृष्टिने सर्व संबंधितांना सुचना देण्यात आल्या.
पिकाच्या किड व्यवस्थापनासाठी प्राथमिक अवस्थेतच काही नैसर्गिक उपाय करुन यावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. यात प्रामुख्याने आठवड्याला एका लिंबोळी अर्कची फवारणी, डोमकळी असलेले फुले वेचून नष्ट करणे व ट्रॅपलावून यातील गोळा झालेली किड काळजीपूर्वक नष्ट करणे ही त्रीसुत्री खूप मोलाची आहे. याचा वापर वेळेवर सुरु केल्यास शेतकऱ्यांना रासायनिक फवारणीकडे आताच वळण्याची गरज भासणार नाही, असे चवलवदे यांनी सांगितले.
रासायनिक खताची हाताळणी हा अत्यंत आव्हानात्मक विषय झाला असून याचे दुष्परिणाम लागलीच दिसून येतात. यात शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवताला धोका होऊ नये यासाठी फवारणी करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना डोळ्याला मास्क, चष्मा, हातमोजे व इतर अत्यावश्यक काळजी घेतली पाहिजे यावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भर देऊन संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक जनजागृती करण्याचे सांगितले.    
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...