Tuesday, April 16, 2024

वृत्‍त क्र. 350

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी

26 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी

 

नांदेड (जिमाका) 16 :- भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  कार्यक्रमाची घोषणा केली आहे.  या कार्यक्रमानुसार 16- नांदेड लोकसभा मतदार संघात मतदान दुस-या टप्‍प्यात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या निमित्ताने शुक्रवार 26 एप्रिल 2024 या मतदानाच्या दिवशी शासनाने  सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे.

 

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या -त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील ही सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, इतर प्रतिष्‍ठान यांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहीलअसे उपसचिव व सह मुख्‍य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

0000

वृत्‍त क्र. 349

 शेकडो कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम संदर्भातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण

नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात व्दितीय प्रशिक्षण

नांदेड दि. 16 - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 16-नांदेड लोकसभा मतदार संघाच्‍या अंतर्गत 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण
 इव्हीएम हॅन्डस ऑन ट्रेनिंग 15 एप्रिल 2024 रोजी ग्‍यानमाता विद्याविहार शाळा नमस्‍कार चौक नांदेड येथे आयोजित करण्‍यात आले होते. हे प्रशिक्षण दोन सत्रात घेण्‍यात आले. या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी भेट देऊन क्षेत्रीय अधिकारी व इव्‍हीएम तज्‍ज्ञ मार्गदर्शक यांना आवश्‍यक त्‍या सूचना केल्‍या.    

सकाळी 10 वाजता प्रत्‍यक्ष प्रशिक्षणास सुरुवात झाली. प्रत्येक मतदान अधिकारी-कर्मचारी यांनी ‘‘चुनाव का पर्व, देश का गर्व’’ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येणा-या संभाव्‍य समस्‍यांबाबत सविस्‍तर सूचना देण्‍यात आल्‍या. तसेच या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास निवडणूक पार पाडणे, घेणे अधिक सुलभ होते, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी प्रशिक्षणाच्‍या सुरुवातीच्‍या प्रास्‍ताविकात केले.

दोन्‍ही सत्रात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) ललितकुमार व-हाडे यांनी सादरीकरणाच्‍या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु झाल्‍यापासून ते  समाप्‍त होईपर्यंतची कामे करण्‍याबाबत प्रशिक्षण दिले. यात इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्र (इव्‍हीएम) व व्ही.व्ही.पॅट यंत्रासंबंधी महत्‍वपुर्ण माहिती देण्यात आली.

 निवडणुकीशी संबंधित विविध फॉर्म्‍स कसे भरतात, कोणकोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सविस्‍तर प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षण संवादात्‍मक व चर्चात्‍मक पध्‍दतीने घेण्‍यात आले. यावेळी रामदास कोलगणे व तहसिलदार प्रगती चोंडेकर, बालाजी सोनटक्के, नायब तहसिलदार हे उपस्थित होते.

निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्ये, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे, संवैधानिक व असंवैधानिक लिफाफ्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्‍हीएम) वापराबाबतची सुलभ प्रक्रीया चर्चेव्दारे समजावून सांगण्‍यात आली व प्रशिक्षणार्थींच्‍या प्रश्‍नांचे, शंकांचे निरसन करण्यात आले. प्रत्‍येक सत्रातील पहिल्‍या टप्‍प्‍यात माहिती विषयक प्रशिक्षण दिले तर, दुस-या टप्‍प्‍यात प्रत्‍यक्ष ई.व्‍ही.एम. वापराचे प्रशिक्षण देण्‍यात आले. सदर प्रशिक्षणास सुमारे 1 हजार कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षणाच्या प्रत्‍येक सत्राच्‍या दुस-या टप्‍प्‍यात सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि इव्‍हीएम मास्टर ट्रेनर यांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्‍हीएम) व व्‍हीव्‍हीपॅट प्रत्यक्ष हाताळणीबाबतचे प्रशिक्षण उपस्थित कर्मचारी यांना देण्यात आले. यामध्ये इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्‍हीएम) जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात टपाली मतपत्रिकेव्‍दारे मतदान करण्‍यासाठी सुविधा कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली होती. त्‍यामध्‍ये मतदान अधिकारी यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्रे वितरीत करण्‍यात आले. तसेच टपाली मतदान करण्‍याची सुविधा उपलबध करुन देण्‍यात आली होती.

प्रशिक्षणाच्‍या ठिकाणी विविध कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्‍यासाठी एकुण 10 टेबलवर 20 कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती. तसेच मतदार सहायता कक्ष, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेचे अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस यांना पाचारण करण्‍यात आले होते. या प्रशिक्षणाच्‍या ठिकाणी आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या होत्‍या. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन तहसिलदार रामदास कोलगणे व श्रीमती प्रगती चोंडेकर यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
०००००







 वृत्‍त क्र. 348

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड जिल्ह्यात 21 एप्रिल 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.

 त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

वृत्‍त क्र. 347

नांदेडमध्ये ऑटोचालकही मतदार जागृती उपक्रमामध्ये सहभागी 

सिईओ व आयुक्ताचे मार्गदर्शन 

नांदेड,१६- नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आज याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागाने शहरात मतदान जनजागृती केली जाणार आहे. 

 नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेत आज मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा  स्वीपच्या प्रमुख मिनल करनवाल व महापालिकीचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ऑटोरिक्षांना मतदान करण्यासंदर्भाचे स्टीकर लावण्यात आले. यावेळी महापालीकेचे सहाय्यक आयुक्त गिरिष कदम, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, डॉ. सान्वी जेठानी आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या चळवळीत ऑटोरिक्षा संघटनेने पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ऑटोरिक्षा बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना येत्या २६ एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी सांगावे असेही त्या म्हणाल्या. 

यावेळी व्होट करेगा व्होट करेगा सारा नांदेड व्होट करेगा या घोषवाक्ये परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वीप कक्षाचे प्रलोभ कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, सुनील मुत्तेपवार, शुभम तेलेवार, सारिका आचने, साईनाथ चिद्रावार, आशा घुले, रवी ढगे आदींची उपस्थिती होती.

दिव्यांगांच्या मतदानासाठी

ऑटोचालक येणार पुढे

नांदेड लोकसभा निवडणुकीत सर्वांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदानापासून कुणी वंचित राहु नये, या हेतूने दिव्यांग, बहुविकलांग मतदारासाठी टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने माफक दरात ऑटोरिक्षा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अहेमद बाबा बागवाले यांनी माहिती दिली. दिव्यांगांना मतदान केंद्र पर्यंत येण्यासाठी आमची गरज लागल्यास मदत करूया ,असे त्यांनी सांगितले.

००००









वृत्‍त क्र. 346

 लोकसभा मतदानासाठी 26 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी ; शुक्रवारी बाजार नाही 

 मोठया संख्येने मतदानाला बाहेर पडण्याचे आवाहन  

नांदेड,दि. 16 :- भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमानुसार 16- नांदेड लोकसभा मतदार संघात मतदान दुस-या टप्‍प्यात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या निमित्ताने शुक्रवार 26 एप्रिल 2024 या मतदानाच्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. या दिवशी असणारे आठवडी बाजार एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या -त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील ही सुट्टी लागू राहील. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, इतर प्रतिष्‍ठान यांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे उपसचिव व सह मुख्‍य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

सर्व आठवडी बाजार बंद राहणार 

तर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी काढलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्‍ह्यातील जे विधानसभा क्षेत्र नांदेड, हिंगोली व लातूर मतदार संघात येतात त्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी येणा-या बाजाराच्‍या तारखांमध्‍ये बदल केला आहे. मतदानाच्‍या दुस-या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहे.

 २६ एप्रिलला बाजार बंद 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 83-किनवट, 84-हदगाव व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील 85-भोकर, 86-नांदेड उत्तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड या 8 विधानसभा मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.   

 शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी हदगाव तालुक्यात हदगाव, किनवट तालुक्यात इस्लापूर, माहूर तालुक्यात सिंदखेड, अर्धापूर तालुक्यात अर्धापूर, धर्माबाद तालुक्यात करखेली, कारेगाव फाटा, नायगाव खै. तालुक्यात बरबडा, देगलूर तालुक्यात माळेगाव म., बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहर, आदमपूर, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद, जांब बु. तर नांदेड येथील साठे चौक ते आयटीआय रस्ता, शिवाजीनगर ते ज्योती टॉकीज रोड तसेच गोकुळनगर ते रेल्वेस्टेशन या मार्गावर व रोड क्र. 26 येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 27 एप्रिल 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे. 

लोहा क्षेत्रात ७ मे रोजी बाजार बंद  

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नांदेड जिल्ह्यातील 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील 88-लोहा या विधानसभा मतदारसंघात मंगळवार 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. 

मंगळवार 7 मे 2024 रोजी लोहा तालुक्यातील मारतळा, कलंबर व लोहा येथील आठवडी बाजार बंद राहतील. तर या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार 8 मे 2024 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

00000

वृत्‍त क्र. 345

आतापर्यत आचारसंहिता भंगच्‍या सात तक्रारी ; 

एका महिन्‍यात एकूण 60 लाखांचा ऐवज जप्‍त 

नांदेड दि.१६ :- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून एक महिना झाला आहे. या एक महिण्याच्‍या कालावधीत आचारसंहिता कक्षामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत ६० लाखांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे. तर आचारसंहिता भंगच्‍या ७ तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचार संहिता कक्षाचे प्रमुख महेश वडदकर यांनी दिली आहे. 

लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून या काळामध्ये सामान्य नागरिकांपासून राजकीय पक्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

नांदेड लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्‍ह्यामध्‍ये किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्र हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी ( एकूण मतदार संख्या ५ लक्ष ५९ हजार ५७१ ) तर लोहा विधानसभा क्षेत्र ( एकूण मतदार संख्या २ लक्ष ९३ हजार २६३ ) लातूर मतदार संघासाठी मतदान करणार आहे. तर भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगूलर, मुखेड अशा सहा मतदार संघांचा मिळून  एकूण १८ लाख ५१ हजार ८४३ मतदार आपल्‍या मतदानाचा हक्‍क १६ नांदेड लोकसभा मतदार संघासाठी बजावणार आहेत. यामध्‍ये दिव्‍यांग मतदाराची संख्‍या 15 हजार 667 तर 85 वयापेक्षा अधिक असणा-या मतदारांची संख्‍या २४  हजार 984 तर 18 -19 या गटातील नवमतदाराची संख्‍या 29 हजार 345 आहे.

सात तक्रारी दाखल 

आचारसंहिता भंगच्‍या आतापर्यत आचार संहिता कक्षाकडे ७ गुन्ह्याची नोंदणी करण्‍यात आली आहे आहे. दाखल तक्रारीममध्‍ये पहिली तक्रार 29 मार्चची आहे. शासकीय कर्मचा-याने लोक प्रतिनिधीत्‍व कायदाचा भंग केल्‍याची ही तक्रार आहे. दुसरी तक्रार 29 तारखेचीच असून प्रकाशकाच्‍या नावाशिवाय बॅंनर लावण्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. तिसरी तक्रार 30 मार्चची असून महाराष्‍ट्रात बंदी घालण्‍यात आलेल्‍या तंबाखुजन्‍य पदार्थाच्‍या जप्‍तीची आहे. 1 एप्रिल रोजी चौथी तक्रार नोंदविण्‍यात आली असून निरी प्रतिबंधीत पेय वाहून नेण्‍याची ही तक्रार आहे. पाचवी तक्रार 3 एप्रिल रोजी नोंदविण्‍यात आली असून ग्रामसेवकाने राजकीय पक्षाच्‍या कार्यक्रमात सहभाग असल्‍याची तक्रार आहे. 14 एप्रिल रोजी परवानगी न घेता फलक लावण्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे तर सातवी तक्रार ही बेकायदेशिरपणे प्रमाणापेक्षा अधिक मद्य बाळगल्‍याप्रकरणी आहे. अशा एकूण सात तक्रारी दाखल झाल्‍या आहेत.

60 लाखांचा ऐवज जप्‍त 

आचारसंहिता लागल्‍यापासून एका महिन्‍यामध्‍ये एकूण 59 लक्ष 92 हजार 342 रुपयांचा ऐवज आतापर्यत जप्‍त करण्‍यात आला आहे. यामध्‍ये 52 लक्ष 43 हजार 200 रुपयांची रोकड आहे. 3 लक्ष 2 हजार 45 रुपयांची चांदी तर 4 लक्ष 44 हजार 220 रुपयांचे सोने आहे. मद्याच्‍या 54 बाटल्‍याचाही समावेश आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...