शेकडो कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम संदर्भातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण
नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात व्दितीय प्रशिक्षण
नांदेड दि. 16 - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 16-नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण
इव्हीएम हॅन्डस ऑन ट्रेनिंग 15 एप्रिल 2024 रोजी ग्यानमाता विद्याविहार शाळा नमस्कार चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले. या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी भेट देऊन क्षेत्रीय अधिकारी व इव्हीएम तज्ज्ञ मार्गदर्शक यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात झाली. प्रत्येक मतदान अधिकारी-कर्मचारी यांनी ‘‘चुनाव का पर्व, देश का गर्व’’ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील येणा-या संभाव्य समस्यांबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या. तसेच या समस्यांचे निराकरण प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केल्यास निवडणूक पार पाडणे, घेणे अधिक सुलभ होते, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकात केले.
दोन्ही सत्रात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) ललितकुमार व-हाडे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते समाप्त होईपर्यंतची कामे करण्याबाबत प्रशिक्षण दिले. यात इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र (इव्हीएम) व व्ही.व्ही.पॅट यंत्रासंबंधी महत्वपुर्ण माहिती देण्यात आली.
निवडणुकीशी संबंधित विविध फॉर्म्स कसे भरतात, कोणकोणत्या समस्या येवू शकतात व त्या समस्यांचे उपाय कोणते याबद्दल सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षण संवादात्मक व चर्चात्मक पध्दतीने घेण्यात आले. यावेळी रामदास कोलगणे व तहसिलदार प्रगती चोंडेकर, बालाजी सोनटक्के, नायब तहसिलदार हे उपस्थित होते.
निवडणूक कार्यप्रणाली व मतदान केंद्रावरील कर्तव्ये, विविध फॉर्म, विविध प्रपत्रे, संवैधानिक व असंवैधानिक लिफाफ्याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) वापराबाबतची सुलभ प्रक्रीया चर्चेव्दारे समजावून सांगण्यात आली व प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन करण्यात आले. प्रत्येक सत्रातील पहिल्या टप्प्यात माहिती विषयक प्रशिक्षण दिले तर, दुस-या टप्प्यात प्रत्यक्ष ई.व्ही.एम. वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणास सुमारे 1 हजार कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या प्रत्येक सत्राच्या दुस-या टप्प्यात सर्व क्षेत्रिय अधिकारी आणि इव्हीएम मास्टर ट्रेनर यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) व व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष हाताळणीबाबतचे प्रशिक्षण उपस्थित कर्मचारी यांना देण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) जोडणी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणात टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये मतदान अधिकारी यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आले. तसेच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलबध करुन देण्यात आली होती.
प्रशिक्षणाच्या ठिकाणी विविध कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी एकुण 10 टेबलवर 20 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतदार सहायता कक्ष, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेचे अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस यांना पाचारण करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या ठिकाणी आवश्यक त्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन तहसिलदार रामदास कोलगणे व श्रीमती प्रगती चोंडेकर यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
०००००
No comments:
Post a Comment