Thursday, October 1, 2020

 

महात्मा गांधी असते तर

कोरोनाबाधितांच्या सुश्रुषासाठी धावले असते ! 

सर्वसामान्य व्यक्तींबाबत जे काही भय आणि न्युनगंड असतो तो गांधींच्या व्यक्तीमत्वात लहानपणी होता. प्रचंड भित्रट होते ते. लहानपणी त्यांच्या सांभाळ करणारी, त्यांच्यासोबत असणारी रंभाताई जेंव्हा राक्षसाच्या गोष्टी सांगायची तेंव्हा ते थरकाप करत झोपी जायचे. अंधाराची प्रचंड भिती त्यांना ! अनोळखा व्यक्ती आला तर त्याच्याशी बोलण्यातही ते प्रचंड घाबरुन जायचे. वकालतीचा दाखला घेतल्यानंतर जेंव्हा पहिल्यांदा ते कोर्टापुढे प्रकरण मांडण्यासाठी उभे टाकले तेंव्हा त्यांचे पाय प्रचंड लटपट करत होते. अर्थात हे व्यक्तीमत्त्व होते मोहन करमचंद गांधी यांचे. अफ्रिकेत आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अंगात धैर्य यायला लागले. माझी भिती ही माझ्या पुरतीच सिमीत आहे असे सांगून त्यांनी या भितीच्या पल्याड असलेली लज्जाशिलता याचीच पुढे ढाल केली. मी कमी बोलतो ते त्यामुळेच हे सत्य त्यांनी स्विकारत त्याची प्रांजळ कबुली दिली. काहीही बोलायचे असेल तर विचार करुन बोलले पाहिजे आणि इतरांना कुणाला जर काही सांगायचे असेल तर स्वत: कृतीचा अनुभव घेऊन तसे सांगितले पाहिजे असा एक वस्तुपाठ त्यांनी समाजापुढे उभा केला. 

1936-37 या कालावधीत गांधी सेवाग्रामला असतांना एक प्रसंग घडला. गांधी नेहमीच्या कामात होते. एक मळकट कपडे असलेला व अंगातून दुर्गंधी येणारा कोणीतरी व्यक्ती तुम्हाला भेटायचा म्हणतो आहे असे एका कार्यकर्त्यांनी बापूंना सांगितले. ती व्यक्ती बापू जवळ आली आणि बापूंना म्हणाली बापू मला इथेच जगायचे आहे आणि इथेच मरायचे आहे. गांधींनी या व्यक्तीचे आश्रमात स्वागत केले. या व्यक्तीला महारोग होऊन तो धोकादायक वळणावर गेला होता. त्यांची सुश्रुषा करण्यासाठी गांधींनी कोणताही संकोच बाळगला नाही. या व्यक्तीसाठी एक स्वतंत्र कुटी बांधली. नित्यनियमाने बापू त्यांची सेवा करत राहिले. 1945 मध्ये त्यांना सिमला येथे कॉन्फरन्सला जावे लागले होते. या कॉन्फरन्समध्ये काही दिवस त्यांना उसंतीचे मिळाले होते. याचा विचार करुन वर्ध्याला काही तासांकरीता येऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काही व्यक्तींनी या निर्णयाला विरोध केला. बापू कशासाठी एवढा अटापिटा करुन वर्ध्याला जात आहेत अशी कुजबूजही सुरु झाली. 

बापू काही तासासाठी वर्ध्याला आले. आश्रमात त्यांनी जी स्वतंत्र पर्णकुटी उभारली होती त्या कुटीकडे धाव घेत आगोदर महारोग्याची सुश्रुषा केली. कोणत्याही आजारी व्यक्तीबद्दल बापूनी सदैव जागरुकता दाखवत त्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. ज्या व्यक्तीच्या सुश्रुतेसाठी बापू एवढ्या दूरुन आले ती व्यक्ती होती संस्कृत पंडित परचुरे शास्त्री ! 

महामारी आणि साथीचे आजार बापूने खूप जवळून अनुभवले. कुष्ठरोगासारखे संसर्गजन्य आजारही त्यांनी पाहिले. रुग्णांची सेवा हा त्यांच्या आश्रमातील जीवनशैलीचा किंवा एक भाग त्यांनी तयार केला. साबरमती आश्रमात एक मुलगा आजारी पडला होता. बापूंना हे कळले. त्या मुलाला बापू सरळ जाऊन विचारतात, तुला काही हवे का? त्या मुलाने कॉफी पिण्याची इच्छा व्यक्त केली. बापूंनी कॉफी स्वत: करुन ती त्या मुलाला दिली. 

आजारी व्यक्तीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण त्यांनी दिला. परिस्थितीला एकवेळ दुर्लक्ष करता येईल परंतू ज्या परिस्थितीतून जो व्यक्ती जात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही याचे मोठे मापदंड त्यांनी समाजापुढे निर्माण केले. एखादा पापी व्यक्ती असेल तर त्याची घृणा करुन चालणार नाही तर त्याने जे पाप केले आहे त्या पापाची घृणा केली पाहिजे असा व्यापक विचार त्यांनी दिला. 

कोविड-19 च्या बाबतीमध्ये जो स्टिगमा आहे, जे भय समाजात निर्माण झाले आहे ते संपविण्यासाठी बापू जर आज हायात असते तर निश्चितच त्यांनी पुढाकार घेतला असता. कोरोना बाधित व्यक्तींच्या सुश्रुषतेसाठी ते धावले असते. कोविड बद्दल काळजी ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि मनात याबाबत भयगंड निर्माण करुन कोविड बाधितांकडे अपमानास्पद पद्धतीने पाहणे ही वेगळी गोष्ट आहे. माणूस म्हणून जी माणुसकी या साथरोगाच्या बाबत अत्यावश्यक आहे नेमकी तीच संवेदना, माणुसकी आपल्याला अभावाने आढळते. भयगंडतेच्या वाटेवर असलेल्या साऱ्या समाजाला सावरण्यासाठी बापू आज तुम्ही हवे आहात. प्रत्येक गावोगाव व्यक्तीगत सुरक्षिततेची काळजी घेऊन कोरोना बाधितांची सेवा करण्यासाठी आश्रमांसारखे, सुश्रुषालयासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी आज बापू हवे आहेत. समाजातील आपल्या घटकाला समाजाच्या मदतीनेच उभे करण्यासाठी आज बापू तुमची नितांत गरज आहे. ज्या गावात जिथे कुठे काही चांगले घडते तेथे बापू अधुन-मधुन प्रत्ययासही येतात. एक बापू भयाच्या पलिकडे जाऊन सुरक्षिततेची सर्व काळजी घेत हॅपी क्लबमध्ये दिसतो. रक्ताचे नाते नसतांना अंत्यविधी सोपस्कार पूर्ण करणे हे सोपे काम नाही. हॅपी क्लबच्या सदस्यांनी गांधीचाच प्रत्यय दिला आहे. दुसरा बापू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना काही मदत करतांना दिसतो आहे.   

समाजात जी भयगंडता आजच्या घडीला आहे ती किमान घालवता जरी आली तरी गांधींच्या या जयंतीला समाजाकडून मोठी भेट दिल्यासारखे होईल. बापूंनी सर्व समाजच आपले कुटूंब मानले होते. आश्रमांच्या माध्यमातून आश्रमात असलेले व आश्रमाच्या बाहेर असलेले यात बापूंनी कधी फरक केला नाही. एक कुटुंब म्हणून त्यांनी जी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करुन दिली ती आजच्या घडीला लाखमोलाची आहे.    

- विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

*******





 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात

ताळेबंदीच्या कालावधी 31 ऑक्टोंबरपर्यंत वाढ


नांदेड (जिमाका) दि. 1 :-कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाऊन) च्या कालावधी 31 ऑक्टोंबर 2020 पर्यत वाढविण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमित केला आहे.

 

या आदेशात नमूद केले आहे की, कोविड-19 व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुढील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक, फौजदारी कारवाईस पात्र राहील. सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरात जेथे लोकांचा वावर आहे तेथे असतांना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 1 हजार रुपये दंड आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्रामीण-शहरी या दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावनी स्थानिक स्वराज्य संस्थानी करावी. नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित करणेस मनाई करण्यात आली आहे.

 

प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या संपुर्ण कार्यक्रमासाठी मर्यादेत लग्न संबंधित समारंभाचे आयोजन तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी दिलेले आदेश-अटी व शर्तीचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक आहे. अंत्यविधी सारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून उपस्थित राहण्यास परवानगी राहील.

 

नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्याठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे. अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून थूंकल्यास 1 हजार रुपये दंड आकारावा. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करण्यात आली आहे. कामाच्या  ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितावर बंधनकारक राहील

 

शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थ्रर्मल स्कॅनिंग, हॅडवॉश, सॅनिटायझर यांची आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलण्याच्या वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

प्रतिबंधित क्षेत्र

प्रतिबंधीत क्षेत्रात 19 व 21 मे 2020 च्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये तयार करण्यात येत असलेले  कन्टेमेंट झोन हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. तेथे केंद्र शासनाने व राज्य शासनाने पूर्वी दिलेल्या सुचना जशात तसे लागू राहतील. नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करण्यात आली आहे. (प्रतिबंधित/बंद क्षेत्रे) सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्टीट्युट हे 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत बंद राहतील. परंतू ऑनलाईन, दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, करमणूक, उद्याने, थिएटर, बार, सभागृह, असेंबली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. एमएचएने परवानगी दिलेल्या व्यतीरिक्त आंतरराष्ट्रीय वाहतुक. सर्व सामाजिक, राजकिय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. या आदेशापुर्वी सर्व अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने आस्थापना यांना लागू करण्यात आलेले आदेश जशास तसे लागू राहतील. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेंपर्यत चालू राहतील. मेडीकल/औषधांची दुकाने पुर्ण वेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. यापुर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी, क्षेत्रे पुर्ववत सुरु राहतील. यापुर्वी दिलेले आदेश या आदेशास सलग्न राहतील आणि सदरचे आदेश 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत कायम राहतील. हॉटेल्स, फुड कोर्टस, रेस्टॉरन्टस् आणि बार 5 ऑक्टोंबर 2020 पासून आस्थापनेच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील. सदर आस्थापना सुरु करण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येतील. ऑक्सीजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांना हालचालीस राज्यात व राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन असणार नाही. राज्य व केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले कोव्हीड-19 बाबतच्या प्रतिबंधात्मक उपायोजनाचा वापर करुन राज्यातील रेल्वे सेवा सुरु करण्यात येत आहे. यापुर्वी परवानगी देण्यात आलेल्या क्रिया, बाबी नेमून दिलेल्या आर्दश कार्यप्रणाली सूचनेप्रमाणे चालू राहतील. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुद्ध मुख्य सचिव महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनवर्सन यांच्याकडील आदेशात नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनिय / कायदेशील कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावी असेही 1 ऑक्टोंबर 2020 रोजी निर्गमीत केलेल्या आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 

222 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

195 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 1:- गुरुवार 1 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 222 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 195 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 144 बाधित आले. 

आजच्या एकुण 828 अहवालापैकी 626 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 901 एवढी झाली असून यातील 12 हजार 175 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 246 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 54 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकुण पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 30 सप्टेंबर रोजी मोहमंदनगर भोकर येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा, सराफा मुखेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर गुरुवार 1 ऑक्टोंबर रोजी शिवाजीनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 406 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 15, बिलोली कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड केअर सेंटर 3, मुखेड कोविड केअर सेंटर 33, लोहा कोविड केअर सेंटर 3, धर्माबाद कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालय 17, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 9, किनवट कोविड केअर सेंटर 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 8, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 85, उमरी कोविड केअर सेटर, नायगाव कोविड केअर सेंटर 6 असे 222 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 27, अर्धापूर तालुक्यात 3, भोकर 1, कंधार 1, हिमायतनगर 2, किनवट 1, बिलोली 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1, धर्माबाद 4, मुखेड 3, लोहा 1, नायगाव 1, माहूर 2, परभणी 1 असे एकुण 51 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 52, अर्धापूर तालुक्यात 7, कंधार 11, बिलोली 9, हदगाव 2, धर्माबाद 4, भोकर 1, देगलूर 3, ठाणे 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड 8, मुखेड 27, माहूर 2, लोहा 2, नायगाव 7, उमरी 2, बासर 1, पुणे 1, लातूर 1 असे एकूण 144 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 246 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 252, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 883, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 92, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 33, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 20, नायगाव कोविड केअर सेंटर 57, बिलोली कोविड केअर सेंटर 28, मुखेड कोविड केअर सेंटर 106, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 57, लोहा कोविड केअर सेंटर 45, हदगाव कोविड केअर सेंटर 49, भोकर कोविड केअर सेंटर 26, कंधार कोविड केअर सेंटर 20, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 52, मुदखेड कोविड केअर सेटर 32, माहूर कोविड केअर सेंटर येथे 17, किनवट कोविड केअर सेंटर येथे 67, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 59, उमरी कोविड केअर सेंटर 40, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, मांडवी कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात 273 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद 1, निजामाबाद 1, लातूर 2, अकोला 1, मुंबई 2, आदिलाबाद येथे संदर्भित 2 झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 84 हजार 446,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 64 हजार 791,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 901,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 12 हजार 175,

एकूण मृत्यू संख्या- 406,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 79 टक्के.

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 259,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 246,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 54. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत

इच्छूक लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत


नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घ्यावा. या  योजनेची माहिती http://dof.gov.in/pmmsy या संकेतस्थळावर उपलब्ध असून या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड, देवाशिष कॉम्प्लेक्स, दुसरा माळा, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, डॉक्टरलेन, नांदेड  दु. क्र. (02462-252424 ) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, र.रा. बादावार यांनी केले आहे.

 

मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ व्हावी आणि मच्छिमारांच्या हितसंवर्धनासाठी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावनी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना नांदेड जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 29 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती सर्व सामान्य होतकरु मच्छिमार, मत्स्यकास्तकार यांना व्हावी व ही योजना लाभार्थी भिमूख होण्यासाठी सर्व लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालीप्रमाणे आहेत.

केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसाय हा पुरक व अग्रक्रमीत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. भुजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्टया कमकुवत पारंपारीक मच्छिमाराचे, मत्स्यव्यावसायिकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शाश्वत आर्थिक उत्पनाचे स्त्रोत व रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे. कृषिक्षेत्राच्या सकल मुल्यांत वाढ करणे आणि निर्यातीत योगदान वाढविणे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा कालावधी 2020-21 ते 2024-25 असा आहे. या कालावधीकरीता केंद्र शासनाने एकूण 20 हजार 50 कोटी गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये केंद्र हिस्सा 9 हजार 407 कोटी, राज्य हिस्सा 4 हजार 880 कोटी आणि लाभार्थी हिस्सा 5 हजार 763 कोटी याप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 40 टक्के (केंद्र हिस्सा 24 टक्के व राज्य हिस्सा 16 टक्के ) व अनुसूचित जाती, जमाती, महिला या प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 60 टकके (केंद्र हिस्सा 36 टक्के व राज्य हिस्सा 24 टक्के) या सुत्राप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर करण्याची तरतुद आहे. प्रकल्प किंमतीच्या अर्थसहाय्या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम ही लाभार्थी हिस्सा असेल.

 

या योजनेअंतर्गत लाभार्थी भिमूख भुजलशयीन मत्स्यव्यवसायाच्या विकासाकरीता नवीन तळी, तलावांचे बांधकाम, अस्तित्वातील तळी, तलावांचे नुतनीकरण, मत्स्य, कोळंबी संवर्धनासाठी निविष्ठा वापरावर अनुदान, भारतीय प्रमुख कार्प व इतर संवर्धनायोग्य माशांच्या बीज उत्पादनासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करणे. मासळी वाहतुकीच्या पायाभूत सुविधेसाठी अर्थसहाय्य, शोभिवंत मासे संवर्धन व विक्री, मच्छिमारांना विमाछत्र, प्रशिक्षण कार्यक्रम बर्फ कारखाना, शीतरोधक वाहने, पुनर्चक्रीय पध्दतीने मत्स्यसंवर्धन आणि जैवपुंज पध्दतीने मत्स्यसंवर्धन इत्यादी प्रकारच्या योजनांचा समावेश यात आहे.

0000

 

लंपी चर्मरोगाबाबत राज्यातील खालील जिल्हे

नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- लंपी चर्मरोगाच्याबाबत राज्यातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर, भंडारा, बुलडाणा, बीड, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांना नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. नुकतीच याबाबत राज्याच्या कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्यावतीने अधिसुचना प्रसिद्ध केली आहे.

 

कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित गोजातीय प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणतेही अन्य काम पार पाडणे यास मनाई करता येईल .

 

उक्त नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बाधित झालेल्या गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे या गोष्टीला मनाई करता येईल.

 

लंम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने गुरे आणि म्हशी आणि गोजातीय प्रजातीमधील इतर सर्व प्राणी यांना ज्याठिकाणी ते पाळले जातात. त्या ठिकाणापासून नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरीत अन्य कोणत्याही ठिकाणी नेण्या आणण्यास मनाई करता येईल. 

 

कोणत्याही व्यक्तीस बाधीत गोजातीय प्रजातीचे जीवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही बाधीत झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादन उक्त नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करता येईल.

00000

 

नांदेड वनविभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने

वन्यजीव छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

चार ऑक्टोंबरपर्यंत छायाचित्र पाठविण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यातील वनवैभव आणि वन्यजीव वैशिष्ट्याचा परिचय अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा या उद्देशाने नांदेड वनविभागाच्यावतीने वन्यजीव छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे. 

या स्पर्धेसाठी फुलपाखरे / पतंग, पक्षी आणि वन्यजीव या तीन प्रकारात इच्छुकांनी आपआपली छायाचित्रे आपल्या नावासह wildnanded@gmail.com या ईमेलवर 4 ऑक्टोंबर पूर्वी पाठविण्याचे आवाहन केले आहे. छायाचित्रासोबत छायाचित्रकाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर देण्यात यावा. केवळ नांदेड जिल्ह्यातील व्यक्तींना या स्पर्धेसाठी भाग घेता येईल. छायाचित्राची माहिती देतांना त्यात ज्याचे छायाचित्र काढलेले त्याचे कॉमन असलेले नाव, शास्त्रोक्त नाव असणे आवश्यक आहे. प्रत्येक स्पर्धकाला यातील प्रत्येक गटासाठी केवळ एकच छायाचित्र पाठविता येईल. ई-मेलवर पाठविल्या जाणारे छायाचित्र हे दोन एमबीपर्यंत जेपीईजी फॉरमेटमध्ये पाठवावीत. प्रत्येक गटातल्या विजेत्यांना WILDLIFE PHOTOGRAPHER OF NANDED 2020  या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. 

त्याचबरोबर चित्रकला व निबंधलेखन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यात पहिले ते पाचवी गटासाठी माझा आवडता वन्यप्राणी / पक्षी हा विषय तर सहावी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या परिसरातील जैवविविधता हे विषय चित्रकला स्पर्धेसाठी असतील. निबंध लेखन स्पर्धेसाठी पहिली ते पाचवी गटासाठी वन्यजीवांचे महत्व आणि सहावी ते दहावी वयोगटासाठी माझा वन्यजीव सफारी / प्राणी संग्रालयातील अनुभव हा विषय ठेवण्यात आला आहे. यास प्रथम 2 हजार रुपये, द्वितीय 1 हजार रुपये तर तिसरे बक्षीस 500 रुपयाचे ठेवण्यात आले आहे. 

चित्रकलेसाठी  ए 4 साईजच्या कागदावरच चित्र काढण्याच्या सुचना असून निबंध स्पर्धेसाठी ए 4 साईजची जास्तीत जास्त दोन पाने निबंधासाठी असतील. स्पर्धकांनी त्यावर आपले संपूर्ण नाव, वर्ग, शाळा, गाव व मोबाईल नंबर टाकावा. चित्र आणि निबंध wildnanded@gmail.com या ईमेल आयडीवर 4 ऑक्टोंबर 2020 पर्यंत पाठवावीत. विजेत्यांची घोषणा ही 7 ऑक्टोंबरपूर्वी केली जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या प्रोबेशनरी अधिकारी मधुमिता यांनी दिली आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...