महात्मा गांधी असते तर
कोरोनाबाधितांच्या सुश्रुषासाठी धावले असते !
सर्वसामान्य व्यक्तींबाबत जे काही भय आणि न्युनगंड असतो तो गांधींच्या व्यक्तीमत्वात लहानपणी होता. प्रचंड भित्रट होते ते. लहानपणी त्यांच्या सांभाळ करणारी, त्यांच्यासोबत असणारी रंभाताई जेंव्हा राक्षसाच्या गोष्टी सांगायची तेंव्हा ते थरकाप करत झोपी जायचे. अंधाराची प्रचंड भिती त्यांना ! अनोळखा व्यक्ती आला तर त्याच्याशी बोलण्यातही ते प्रचंड घाबरुन जायचे. वकालतीचा दाखला घेतल्यानंतर जेंव्हा पहिल्यांदा ते कोर्टापुढे प्रकरण मांडण्यासाठी उभे टाकले तेंव्हा त्यांचे पाय प्रचंड लटपट करत होते. अर्थात हे व्यक्तीमत्त्व होते मोहन करमचंद गांधी यांचे. अफ्रिकेत आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अंगात धैर्य यायला लागले. “माझी भिती ही माझ्या पुरतीच सिमीत आहे” असे सांगून त्यांनी या भितीच्या पल्याड असलेली लज्जाशिलता याचीच पुढे ढाल केली. मी कमी बोलतो ते त्यामुळेच हे सत्य त्यांनी स्विकारत त्याची प्रांजळ कबुली दिली. काहीही बोलायचे असेल तर विचार करुन बोलले पाहिजे आणि इतरांना कुणाला जर काही सांगायचे असेल तर स्वत: कृतीचा अनुभव घेऊन तसे सांगितले पाहिजे असा एक वस्तुपाठ त्यांनी समाजापुढे उभा केला.
1936-37 या कालावधीत गांधी सेवाग्रामला असतांना एक प्रसंग घडला. गांधी नेहमीच्या कामात होते. “एक मळकट कपडे असलेला व अंगातून दुर्गंधी येणारा कोणीतरी व्यक्ती तुम्हाला भेटायचा म्हणतो आहे” असे एका कार्यकर्त्यांनी बापूंना सांगितले. ती व्यक्ती बापू जवळ आली आणि बापूंना म्हणाली “बापू मला इथेच जगायचे आहे आणि इथेच मरायचे आहे. गांधींनी या व्यक्तीचे आश्रमात स्वागत केले. या व्यक्तीला महारोग होऊन तो धोकादायक वळणावर गेला होता. त्यांची सुश्रुषा करण्यासाठी गांधींनी कोणताही संकोच बाळगला नाही. या व्यक्तीसाठी एक स्वतंत्र कुटी बांधली. नित्यनियमाने बापू त्यांची सेवा करत राहिले. 1945 मध्ये त्यांना सिमला येथे कॉन्फरन्सला जावे लागले होते. या कॉन्फरन्समध्ये काही दिवस त्यांना उसंतीचे मिळाले होते. याचा विचार करुन वर्ध्याला काही तासांकरीता येऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काही व्यक्तींनी या निर्णयाला विरोध केला. बापू कशासाठी एवढा अटापिटा करुन वर्ध्याला जात आहेत अशी कुजबूजही सुरु झाली.
बापू काही तासासाठी वर्ध्याला आले. आश्रमात त्यांनी जी स्वतंत्र पर्णकुटी उभारली होती त्या कुटीकडे धाव घेत आगोदर महारोग्याची सुश्रुषा केली. कोणत्याही आजारी व्यक्तीबद्दल बापूनी सदैव जागरुकता दाखवत त्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला. ज्या व्यक्तीच्या सुश्रुतेसाठी बापू एवढ्या दूरुन आले ती व्यक्ती होती संस्कृत पंडित परचुरे शास्त्री !
महामारी आणि साथीचे आजार बापूने खूप जवळून अनुभवले. कुष्ठरोगासारखे संसर्गजन्य आजारही त्यांनी पाहिले. रुग्णांची सेवा हा त्यांच्या आश्रमातील जीवनशैलीचा किंवा एक भाग त्यांनी तयार केला. साबरमती आश्रमात एक मुलगा आजारी पडला होता. बापूंना हे कळले. त्या मुलाला बापू सरळ जाऊन विचारतात, “तुला काही हवे का?” त्या मुलाने कॉफी पिण्याची इच्छा व्यक्त केली. बापूंनी कॉफी स्वत: करुन ती त्या मुलाला दिली.
आजारी व्यक्तीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण त्यांनी दिला. परिस्थितीला एकवेळ दुर्लक्ष करता येईल परंतू ज्या परिस्थितीतून जो व्यक्ती जात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही याचे मोठे मापदंड त्यांनी समाजापुढे निर्माण केले. एखादा पापी व्यक्ती असेल तर त्याची घृणा करुन चालणार नाही तर त्याने जे पाप केले आहे त्या पापाची घृणा केली पाहिजे असा व्यापक विचार त्यांनी दिला.
कोविड-19 च्या बाबतीमध्ये जो स्टिगमा आहे, जे भय समाजात निर्माण झाले आहे ते संपविण्यासाठी बापू जर आज हायात असते तर निश्चितच त्यांनी पुढाकार घेतला असता. कोरोना बाधित व्यक्तींच्या सुश्रुषतेसाठी ते धावले असते. कोविड बद्दल काळजी ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि मनात याबाबत भयगंड निर्माण करुन कोविड बाधितांकडे अपमानास्पद पद्धतीने पाहणे ही वेगळी गोष्ट आहे. माणूस म्हणून जी माणुसकी या साथरोगाच्या बाबत अत्यावश्यक आहे नेमकी तीच संवेदना, माणुसकी आपल्याला अभावाने आढळते. भयगंडतेच्या वाटेवर असलेल्या साऱ्या समाजाला सावरण्यासाठी बापू आज तुम्ही हवे आहात. प्रत्येक गावोगाव व्यक्तीगत सुरक्षिततेची काळजी घेऊन कोरोना बाधितांची सेवा करण्यासाठी आश्रमांसारखे, सुश्रुषालयासारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी आज बापू हवे आहेत. समाजातील आपल्या घटकाला समाजाच्या मदतीनेच उभे करण्यासाठी आज बापू तुमची नितांत गरज आहे. ज्या गावात जिथे कुठे काही चांगले घडते तेथे बापू अधुन-मधुन प्रत्ययासही येतात. एक बापू भयाच्या पलिकडे जाऊन सुरक्षिततेची सर्व काळजी घेत हॅपी क्लबमध्ये दिसतो. रक्ताचे नाते नसतांना अंत्यविधी सोपस्कार पूर्ण करणे हे सोपे काम नाही. हॅपी क्लबच्या सदस्यांनी गांधीचाच प्रत्यय दिला आहे. दुसरा बापू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना काही मदत करतांना दिसतो आहे.
समाजात जी भयगंडता आजच्या घडीला आहे ती किमान घालवता जरी आली तरी गांधींच्या या जयंतीला समाजाकडून मोठी भेट दिल्यासारखे होईल. बापूंनी सर्व समाजच आपले कुटूंब मानले होते. आश्रमांच्या माध्यमातून आश्रमात असलेले व आश्रमाच्या बाहेर असलेले यात बापूंनी कधी फरक केला नाही. एक कुटुंब म्हणून त्यांनी जी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव करुन दिली ती आजच्या घडीला लाखमोलाची आहे.
- विनोद रापतवार
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
*******
No comments:
Post a Comment