Saturday, June 12, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित

दोघांचा मृत्यू तर 46 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 774 अहवालापैकी  15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 885 एवढी झाली असून यातील 87 हजार 918 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 529 रुग्ण उपचार घेत असून 6 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दि. 11 जून 2021 रोजी गोदावरी कोविड रुग्णालयात पाटबंधारे नगर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा तर 12 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे इंदिरानगर अर्धापूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 897 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, लोहा तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 2, हिमायतनगर 1, नायगाव 1, कंधार 1, हिंगोली 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 1, कंधार 1, लातूर 1 असे एकूण 15 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 46 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5, लोहा कोविड रुग्णालय 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 5, खाजगी रुग्णालय 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 6, किनवट कोविड रुग्णालय 11 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 529 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  22, लोहा कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय 5, देगलूर कोविड रुग्णालय 7,   हदगाव कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 329, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गह विलगीकरण 97, खाजगी रुग्णालय 43 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 115, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 132 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 73 हजार 725

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 71 हजार 357

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 885

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 918

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 897

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.73 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-26

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-198

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 529

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6

00000

 

 

बांबु लागवड व रेशीम लागवड मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन

नांदेड (जिमाका) दि. 12 :- बांबु लागवड व रेशीम लागवड मार्गदर्शन कार्यशाळा मंगळवार 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. कृषि, महसुल  व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

या कार्यशाळेस माजी आमदार पाशा पटेल, जळगावचे बांबु अभ्यासक संदिप माळी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे रेशीम संशोधक श्री लटपटे हे मार्गदर्शन करणार आहेत. बांबू व रेशीम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, उप वनसंरक्षक एम. आर. शेख व उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.

00000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 13 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 11 जून पर्यंत एकुण 4 लाख 59 हजार 789 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 12 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 38 हजार 230 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 41 हजार 940 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 80 हजार 170 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत

गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 12 :- दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सन 2020-21 या वर्षातील क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठीचा क्रीडा प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करण्यास सोमवार 21 जून पर्यंत तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव व यादी सादर करण्यास 15 जून ते 25 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

 

दहावी परीक्षेचे आयोजन 29 एप्रिल ते 20 मे  व बारावी परीक्षेचे आयोजन 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत करण्यात आले होते. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन 2020-21 या वर्षात इयत्ता 10 वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. तर इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 11 वी मधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सदर विद्यार्थ्यांस गुण सन 2020-21 साठी देण्यात येतील, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

000000

 

बालकामगार आढळून आल्यास कारवाई

-         सहाय्यक आयुक्त मोहसीन सय्यद

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून व्यवसायिक आस्थापनामध्ये बालकामगार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले.    

12 जून जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात बाल कामगार कामावर ठेवू नये याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने आज जनजागृती करण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियमांचे पालन करुन ही जनजागृती करण्यात आली. विविध व्यवसायिक आस्थापनांमध्ये तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बाल कामगार कामावर ठेवण्यात येणार नाही अशा प्रकारची शपथ घेण्यात आली. 

जिल्ह्यातील वेगवेगळ्या आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्याकडून बाल कामगार कामावर ठेवणार नाही असे हमीपत्र भरून घेतले. तसेच आस्थापनेत येथे बाल कामगार काम करत नाही अशा आशयाचे स्टीकर दर्शनी भागात लावण्यात आले. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारित अधिनियम 2016 अन्वये 14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. याप्रमाणे बालकास / किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

00000

 

परवानाधारक रिक्षा चालकांनी

सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करावे 

अर्ज करतांना अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे. यासाठी https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme या प्रणालीमध्ये रिक्षा परवानाधारकांनी स्वत:चे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमांक आदी माहितीची नोंद करावी. नोंद केलेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर अर्ज अनुदान खात्यामध्ये जमा होण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. अर्ज करतांना अडचणी आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व वरिष्ठ लिपीक आर. एच. कंधारकर यांच्याशी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 9 जून पर्यंत 2 हजार 819 ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. तर 1 हजार 381 परवानाधारकांचे अर्ज पुर्ननोंदणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.  

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...