Sunday, November 3, 2019


पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीच्या अनुषंगाने मा. ना. श्री. रामदास कदम, पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा यांनी आज रविवार दि. 3 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड घेतलेली पत्रकार परिषद





कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 3 :-  राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे  सोमवार 4 नोव्हेंबर 2019 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 4 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.43 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने कहाळा बु. ता. नायगावकडे प्रयाण करतील. सकाळी 10.50 वा. अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा. स्थळ- कहाळा बु. ता. नायगाव. सकाळी 11.20 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत नायगाव तालुक्यातील सोमठाणा, मांजरम, गडगा येथील अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दुपारी 12.30 वा. गडगा ता. नायगाव येथे राखीव. दुपारी 1 वा. गडगा येथून मोटारीने लोहगाव ता. बिलोलीकडे प्रयाण करतील. दुपारी 1.15 वा. ते दुपारी 2.15 वाजेपर्यंत बिलोली तालुक्यातील लोहगाव, पांचपिंपळी फाटा येथील अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी व शेतकऱ्याशी चर्चा करतील. दुपारी 2.15 वा. पांचपिंपळी फाटा येथून मोटारीने बाभळी बंधारा ता. धर्माबादकडे प्रयाण. दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा. स्थळ- बाभळी बंधारा, ता. धर्माबाद जि. नांदेड. दुपारी 3.30 वा. बाभळी बंधारा येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह धर्माबादकडे प्रयाण करतील. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह धर्माबाद येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.40 वा. धर्माबाद रेल्वे स्थानक येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000
    













अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाची
पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून पाहणी
              
 :- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज जिल्ह्यात दौरा करुन अतिवृष्टीमुळे पिक नुकसान परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नांदेड, दि. 3

               राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव, मुखेड तालुक्यातील सलगरा, नायगाव तालुक्यातील कृष्णूर, नांदेड तालुक्यातील कामठा खु., गाडेगाव, मालेगाव यासह विविध गावांना भेटी देऊन सोयाबीन, ज्वारी, कापूस यासह अन्य शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
               यावेळी आमदार रामपाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, संबंधीत तालुक्याचे तहसिलदार, विविध विभागाचे सर्व संबंधित अधिकारी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       
पालकमंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे असून नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासन त्वरित पूर्ण करणार आहे. पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेती पिकांचे नुकसान झालेले दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
               जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. या आदेशात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी तात्काळ पंचनामे करावेत. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.   
जिल्ह्यात परतीच्या अवेळी पावसामुळे शेतातील पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांचे दावे भरुन मंजुरीसाठी विमा कंपनीकडे त्वरित पाठविण्यात यावेत. या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी, नायब तहसीलदार यांनी स्वत: क्षेत्रीय स्तरावर जाऊन पाहणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत.
00000

खरीप हंगामातील पिक नुकसानीचा आढावा
शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी
संवेदनशीलतेने सर्वेक्षणाची कामे वेळेत पूर्ण करा
 - पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 3 :- अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी पिकांच्या सर्वेक्षणाची कामे संवेदनशीलतेने वेळेत पूर्ण करा. यात बाधित शेतकरी वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक पालकमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणवीस, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, महेश वडदकर, एस. पी. बोरगावकर, शक्ती कदम, शरद झडके यांच्यासह तालुका व जिल्हास्तरावरील विविध विभाग, विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकरी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला समोर जात आहे. या परिस्थितीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यासाठी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुआस्थितीदर्शक तातडीने येत्या 4 ते 5 दिवसात पूर्ण करावीत. या कामात पिक विमा कंपनीची मोठी जबाबदारी असून शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने ग्राह्य धरावे. तसे लेखी हमीपत्र विमाकंपनीकडून घेण्याचे आदेश पालकमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री श्री. कदम म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाधित पिकांची पाहणी प्रत्यक्ष गावात शेतीत जाऊन करतांना सोयाबीनचे जास्त नुकसान झाले असून त्याखालोखाल कापूस, ज्वारी, तूर या मुख्य पिकांबरोबर हळद, केळीसह, काढणी केलेल्या इतर पिकांचे नुकसान झाले आहे. हे लक्षात घेऊन ड्रोन, शुटींग व आवश्यक छायाचित्राद्वारे सर्वेक्षण करावे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लघु उद्योग उभारणीसाठी उपाय योजना कराव्यात, असे निर्देश देऊन चारा पिकांचे नुकसान झाल्याकने जलसंपदा विभागाने गाळ पेरा क्षेत्रात मका लागवड करावी, प्रकल्पातील पाणीसाठा, रस्त्यांची दूरुस्ती यासह विविध विकास कामांबाबत आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यात संबंधीत यंत्रणेकडुन पिक नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून सद्यस्थितीत जवळपास 30 टक्कें पंचनामे पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्हायात 16 तालुक्यातील 1 हजार 546 गावांमध्ये एकूण 7 लाख 95 हजार 800 शेतकरी खातेदार आहेत. ज्यांचे पेरणी लायक क्षेत्र 8 लाख 10 हजार 661 हेक्ट आर. असून पेरणी खालील क्षेत्र 7 लाख 58 हजार 405 हे. आर. इतके आहे. ज्यापैकी 1 हजार 488 गावामधील एकूण 5 लाख 43 हजार 553 शेतकऱ्यांचे 4 लाख 11 हजार 372 हे. आर. क्षेत्र बाधीत झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे. ज्यापैकी सोयाबीन क्षेत्र 2 लाख 41 हजार 498 हे., कापूस 1 लाख 17 हजार 195 हे., ज्वारी 22 हजार 124 हे., तुर 6 हजार 006 हे. व इतर पिके 24 हजार 549 हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मदतीसाठी जिल्हास्तरावर यासंबंधाने तक्रार, हरकतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 02462- 235077 कार्यान्वीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...