Sunday, November 3, 2019

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाची
पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून पाहणी
              
 :- जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज जिल्ह्यात दौरा करुन अतिवृष्टीमुळे पिक नुकसान परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नांदेड, दि. 3

               राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव, मुखेड तालुक्यातील सलगरा, नायगाव तालुक्यातील कृष्णूर, नांदेड तालुक्यातील कामठा खु., गाडेगाव, मालेगाव यासह विविध गावांना भेटी देऊन सोयाबीन, ज्वारी, कापूस यासह अन्य शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
               यावेळी आमदार रामपाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, संबंधीत तालुक्याचे तहसिलदार, विविध विभागाचे सर्व संबंधित अधिकारी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       
पालकमंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे असून नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासन त्वरित पूर्ण करणार आहे. पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेती पिकांचे नुकसान झालेले दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
               जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. या आदेशात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी तात्काळ पंचनामे करावेत. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.   
जिल्ह्यात परतीच्या अवेळी पावसामुळे शेतातील पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांचे दावे भरुन मंजुरीसाठी विमा कंपनीकडे त्वरित पाठविण्यात यावेत. या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी, नायब तहसीलदार यांनी स्वत: क्षेत्रीय स्तरावर जाऊन पाहणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...