Sunday, November 3, 2019


खरीप हंगामातील पिक नुकसानीचा आढावा
शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी
संवेदनशीलतेने सर्वेक्षणाची कामे वेळेत पूर्ण करा
 - पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 3 :- अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी पिकांच्या सर्वेक्षणाची कामे संवेदनशीलतेने वेळेत पूर्ण करा. यात बाधित शेतकरी वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक पालकमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणवीस, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, महेश वडदकर, एस. पी. बोरगावकर, शक्ती कदम, शरद झडके यांच्यासह तालुका व जिल्हास्तरावरील विविध विभाग, विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकरी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला समोर जात आहे. या परिस्थितीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यासाठी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुआस्थितीदर्शक तातडीने येत्या 4 ते 5 दिवसात पूर्ण करावीत. या कामात पिक विमा कंपनीची मोठी जबाबदारी असून शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने ग्राह्य धरावे. तसे लेखी हमीपत्र विमाकंपनीकडून घेण्याचे आदेश पालकमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री श्री. कदम म्हणाले, शेतकऱ्यांच्या बाधित पिकांची पाहणी प्रत्यक्ष गावात शेतीत जाऊन करतांना सोयाबीनचे जास्त नुकसान झाले असून त्याखालोखाल कापूस, ज्वारी, तूर या मुख्य पिकांबरोबर हळद, केळीसह, काढणी केलेल्या इतर पिकांचे नुकसान झाले आहे. हे लक्षात घेऊन ड्रोन, शुटींग व आवश्यक छायाचित्राद्वारे सर्वेक्षण करावे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लघु उद्योग उभारणीसाठी उपाय योजना कराव्यात, असे निर्देश देऊन चारा पिकांचे नुकसान झाल्याकने जलसंपदा विभागाने गाळ पेरा क्षेत्रात मका लागवड करावी, प्रकल्पातील पाणीसाठा, रस्त्यांची दूरुस्ती यासह विविध विकास कामांबाबत आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यात संबंधीत यंत्रणेकडुन पिक नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून सद्यस्थितीत जवळपास 30 टक्कें पंचनामे पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्हायात 16 तालुक्यातील 1 हजार 546 गावांमध्ये एकूण 7 लाख 95 हजार 800 शेतकरी खातेदार आहेत. ज्यांचे पेरणी लायक क्षेत्र 8 लाख 10 हजार 661 हेक्ट आर. असून पेरणी खालील क्षेत्र 7 लाख 58 हजार 405 हे. आर. इतके आहे. ज्यापैकी 1 हजार 488 गावामधील एकूण 5 लाख 43 हजार 553 शेतकऱ्यांचे 4 लाख 11 हजार 372 हे. आर. क्षेत्र बाधीत झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे. ज्यापैकी सोयाबीन क्षेत्र 2 लाख 41 हजार 498 हे., कापूस 1 लाख 17 हजार 195 हे., ज्वारी 22 हजार 124 हे., तुर 6 हजार 006 हे. व इतर पिके 24 हजार 549 हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे मदतीसाठी जिल्हास्तरावर यासंबंधाने तक्रार, हरकतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 02462- 235077 कार्यान्वीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...