Friday, January 12, 2018

शिष्यवृत्ती प्रस्तावाचे आवाहन
नांदेड, दि. 12 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचे ऑफलाईन प्रस्ताव शनिवार 20 जानेवारी 2018 पर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांनी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आ. ब. कुंभारगावे यांनी केले आहे.
सन 2017-18 साठी शिष्यवृत्तीचे ऑफलाईन प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन प्रतीत प्रवर्गनिहाय गटशिक्षण अधिकारी यांची प्रती स्वाक्षरी घेऊन तसेच सॉफ्ट कॉपी, विद्यार्थ्यांचे आधार संलग्न खाते क्रमांक नमूद करुन त्याचा पुरावा प्रस्तावासोबत जोडावा. तसेच विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक व आधार क्रमांक अचुक असल्याची खात्री करुन गटशिक्षण कार्यालयाकडे प्रस्ताव जमा करावेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


शासकीय योजनांबाबत  
महाशिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 12 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विधी सेवा योजना, विविध शासकीय योजनांबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार 18 जानेवारी 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे सकाळी 9 वा. महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, वयोवृद्ध, दिव्यांग, अनु. जाती / जमाती, विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.

00000
रोजगार मेळाव्यात 102 उमेदवारांची निवड
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यावर अवलंबीत उमेदवारांची जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने नांदेड येथे नुकताच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीत विविध पदांवर 102 उमेदवारांची निवड करण्यात आली, अशी माहिती सहायक संचालक उल्हास सकवान यांनी दिली आहे.
या मेळाव्यात आयटीआयचे श्री. ढगे यांनी उमेदवारांनी अंगी असलेले कौशल्य ओळखून स्वत:चा विकास केला पाहिजे, असे सांगितले. श्री. सकवान म्हणाले, खाजगी क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या प्रमाणावर संधी असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी कंपनीकडून पदासंबंधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. यात सेल्स अधिकारी, हेल्पर, सुरक्षा रक्षक, क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन ट्रेनी या पदाची भरती करण्यात आली.

00000
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा
नांदेड, दि. 12 :- मराठी भाषा संवर्धन पंधरवाडाचे औचित्य साधून जेष्ठ बालकवी माधव चुकेवाड यांच्या हस्ते मराठी भाषेचे पुस्तके वाटप करण्यात आली. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 1 ते 15 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नुकताच उद्योग भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
यावेळी श्री. चुकेवाड म्हणाले, ग्रामीण भागात बोलल्या जाणाऱ्या अनेक शब्दांचा उपयोग प्रमाण भाषेत केल्यास मातृभाषा समृद्ध होईल. ॲड. एस. एन. टेळकीकर यांनी मातृभाषेचा प्रचार आणि प्रसार होण्याची गरज असून भाषा संवर्धनासाठी मराठी पुस्तक व वर्तमानपत्राचे वाचन करावे, असे सांगितले.  सहायक कामगार आयुक्त बी. एम. मोरडे यांनी प्रत्येकांनी मराठी भाषा संवर्धनाची कास धरुन समाजात जनजागृती करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरकारी कामगार अधिकारी अविनाश पेरके यांनी केले.

0000
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत
नांदेड, दि. 12 :- राज्याचे वन, वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पाथरीचे आमदार मोहन फड, औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपवनसंरक्षक केशव वाबळे, सामाजिक वनीकरण उपसंचालक सुर्यकांत मंकावार, तहसिलदार किरण अंबेकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  त्यांच्यासोबत वन विभागाचे सचिव विकास खारगे यांचेही आगमन झाले.
तसेच याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मिनल पाटील-खतगावकर, नगरसेवक गुरुप्रितकौर सोडी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतूक हंबर्डे, परभणीचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, डॉ. शोभा वाघमारे, श्रीमती धनश्री देव, श्रीमती शितल भालके, एकनाथ मामडे आदींनी मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे स्वागत केले. मंत्री श्री. मुनगंटीवार हे गौड ता. पुर्णा. जि. परभणी दौऱ्यावर आले होते. त्यासाठी त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले होते.

00000
ग्रामीण महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण
नांदेड, दि. 12 :- स्टेट बँक-आरसेटी नांदेड येथे ग्रामीण महिलांसाठी शिवणकला (टेलरिंग / ड्रेस डीझायनिंग) प्रशिक्षणाचे आयोजन बुधवार 17 जानेवारी  ते गुरुवार 15 फेब्रुवारी 2018 या कालावधीत केले आहे. इच्छुक युवतींने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक दिलीप शिरपुरकर यांनी केले.
स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील ज्यांचे वय 18 ते 45 वर्षे दरम्यान आहे या युवतींसाठी  शिवणकला (टेलरिंग आणि ड्रेस डीझायनिंग) तीस दिवसाच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. हे प्रशिक्षण निवासी स्वरूपातील असून पात्र उमेदवारांसाठी मोफत  उपलब्ध आहे. प्रशिक्षणात शिवणकला कौशल्य या मुख्य विषयाव्यतिरिक्त उद्योजकीय सक्षमता, विपणन, बँकिंग व्यवहार, मुद्रा कर्ज योजना आदी विषयी माहिती देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 02462 230036 या कार्यालयीन क्रमांकावर अथवा संदीप जाधव- 9860366710 शिवाजी चव्हाण- 9405824927 प्रशिक्षक, संदीप नारवाड- 8149711303  कार्यालयीन सहाय्यक यांचेशी संपर्क करून प्रवेश निश्चीत करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...