Tuesday, June 30, 2020


वृत्त क्र. 591   
डॉक्टर्स डे निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
रक्तदान शिबिराचे आयोजन  
रक्तदानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
        नांदेड (जिमाका) दि. 30  :- जिल्ह्यात 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवन येथे सकाळी 11 वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 300 रक्तदाते उत्स्फुर्त रक्तदान करतील अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
000000




वृत्त क्र. 590   
निवृत्त महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते सपत्निक सत्कार 
नांदेड (जिमाका) दि. 30  :- महसूल विभागातील तीन निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ आदिंची उपस्थित होते.
भोकर तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त अव्वल कारकून केवलसिंग धनू जाधव, देगलूर तहसील कार्यालयातील स्वेच्छा सेवानिवृत्त मंडळ अधिकारी रमाकांत गणपतराव जोशी, लोहा तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई धोंडीबा विठ्ठल नाईनवाड यांनी त्यांच्या सेवा महसूल विभागात पूर्ण केल्या.  जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0000


वृत्त क्र. 589   
जिल्ह्यात फौजदारी प्रक्रियेचे कलम 144 लागू
नांदेड (जिमाका) दि. 30 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात 1 ते 31 जुलै 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केला आहे. याअनुषंगाने यापुर्वी निर्गमीत केलेले आदेश जशास तसे लागू राहणार आहे.  
राज्य शासनाचे आदेश 29 जून 2020 नुसार राज्यात नियम व अटीच्या अधिन ताळेबंदीचा कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढून मार्गदर्शन सुचना, निर्देश निर्गमित केले आहेत. त्याअनुषंगाने आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमांची काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टिकोणातून अंमलजबावणी करावी. संबंधित सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक साधने, सुविधांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुहे हे साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अणि भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000


वृत्त क्र. 588   
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर
नांदेड (जिमाका) दि. 30 :- अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम चुकीच्या बँक खात्यामुळे किंवा खाते बंद पडल्यामुळे खात्यावर जमा झाली नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्याकांशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. आर.कुंडगीर यांनी केले.
अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी 15 कलमी कार्यक्रम   घोषित केलेला आहे. या अंतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ऑनलाईन भरले आहेत. नवीन 18 हजार 349 व नुतनीकरण 36 हजार 435 असे एकूण 54 हजार 784 इतके विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या एकूण 54 हजार 784 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची एकुण रक्कम 6 करोड 12 लाख रुपये पुणे कार्यालयातून जमा करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली किंवा नाही हे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा पाहता येईल. काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. 9689357212 यांच्याशी संपर्क साधाण्यात यावा, असेही आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. आर.कुंडगीर यांनी केले आहे.
000000


वृत्त क्र. 587   
कोरोनातून 2 व्यक्ती बरे तर 4 नवीन बाधित
नांदेड (जिमाका) दि. 30 :- कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील  2  बाधित व्यक्ती आज बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 375 बाधितांपैकी एकुण 283  व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. यातील 75 बाधित व्यक्ती हे रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 17 व्यक्तींचा इतर आजारासह कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंगळवार 30 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 130 अहवालापैकी 124 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात 4 नवीन बाधित व्यक्ती आढळले. या बाधितांमध्ये छत्रपती चौक येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 32 वर्षाची 1 महिला, हदगाव तालुक्यातील पळसा या गावातील 16 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील 56 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. 
सोमवार 29 जून रोजी सायंकाळी नवीन कौठा नांदेड येथील 53 वर्षाचा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या बाधितावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. उपचार घेत असलेल्या 75 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 10 बाधितांची (4 महिला आणि 6 पुरुष बाधित ) प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात 75  बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 21, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 7 बाधित  औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले. मंगळवार 30 जून रोजी 66  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 766,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 414,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 593,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 04,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 375,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 02,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 17,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 283,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 75,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 66 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 586   
कृषि दिन कार्यक्रमाचे 1 जुलै रोजी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे बुधवार 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सन 2018-19 व सन 2019-20 या वर्षामध्ये कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच वसंतराव नाईक कृषि मित्र व शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रस्तावीत केलेले शेतकऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.    
00000


शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. 30 :- राज्यातील शेती आणि शेतकरी यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून वेळोवेळी शेतकऱ्यांसमोरील जी काही आव्हाने येतात त्यातून सावरण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिले आहे, असे सांगून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषि दिनानिमित्त शेतकरी बांधवांना चांगल्या खरीप हंगामाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.  
राज्यातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. राज्यातील शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन 1 जुलै या त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने शासनातर्फे कृषि दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यालयीन पातळीवर हा दिवस साजरा होण्यासमवेतच तो शेतकऱ्यांच्या समवेत बांधा-बांधावर साजरा व्हावा अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.
यावर्षी मागील चार महिन्यांच्या कालावधीत सर्वांसोबत कृषि क्षेत्र आणि शेतकऱ्यांनाही खूप काही सोसावे लागले आहे. या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पूर्व तयारी केली. काही शेतकऱ्यांनी इतर पिकांसमवेत सोयाबिनची लागवड केली. यातील काही शेतकऱ्यांचे सोयाबिन उगवू न शकल्याने मोठे नुकसान झाले. यासाठी चौकशी सुरु असून दोषी कंपनीविरुद्ध लवकरच कारवाई करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शासन शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे असून या कृषि दिनापासून शेतकरी बांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...