Monday, July 2, 2018


अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका
महाराष्ट्र सायबरचे जनतेला आवाहन

             
मुंबई, दि २: राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणींच्या घटना घडत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे महाराष्ट्र सायबरने आवाहन केले आहे.
            समाज माध्यमांवरून पडताळणी न करता चुकीच्या पोस्टर्स प्रसारित करणे, कोणतीही खातरजमा न करता अफवा पसरविणे, संदेश फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. या गुन्ह्याबद्दल भारतीय दंड विधान कलम ५०५ कडक शिक्षा होऊ शकते. याकडे महाराष्ट्र सायबरने लक्ष वेधले आहे.
 राज्यभरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबतचे पोस्टर्स, व्हिडीओज समाजमाध्यमांद्वारे कोणतीही खातरजमा न करता व्हायरल केले जात आहेत. त्यातून एखाद्या व्यक्तीवर किंवा गटावर संशय घेऊन त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत आणि राज्यात शांततेचे आणि सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी नागरिकांनी कुठल्याही व्यक्ती अथवा गटाबद्दल संशय आल्यास त्वरित संबंधित पोलीस स्टेशन, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठीत नागरिक कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.
            आपल्या आवाहनात सायबर सेलने म्हटले आहे की, मुले पळविण्याच्या अफवा पसरविण्याने समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणे सर्वांसाठीच धोकादायक आहे. जनतेने अशा अफवांना बळी न पडता सत्यता पडताळून पहावी. समाज माध्यमांच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर येणाऱ्या माहितीची कोणतीही शहानिशा न करता निरपराध व्यक्तींना मारहाण करून मारून टाकण्याच्या घटना अतिशय गंभीर आहेत. नागरिकांनी कायदा घेऊन एखाद्याला इजा केल्यास शिक्षा होऊ शकते, असेही त्यांनी आवाहनात म्हटले आहे.
0000




मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका ;
नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना अवगत करावे
जिल्हादंडाधिकारी यांचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश
नांदेड, दि. 2 :- मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांबाबत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आपल्या परीक्षेत्रात अधिनस्त असणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी ( मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पोलीस पोटील, शिक्षक) यांना आपल्या स्तरावरुन नागरिकांना या अफवांवर विश्वास ठेऊ नका व कर्तव्याच्या ठिकाणी अशी घटना घडत असेल तर कायदा हातात न घेता याबाबत पोलीस विभागाला अवगत करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आली असल्याच्या अफवा सोशल मिडिया ( व्हॉटस् अप, भ्रमणध्वनी आदी ) वरुन मुले पळविणाऱ्या टोळ्या आल्याचे संदेश फिरत असून या अफवांमुळे गैरसमज होऊन नागरिकांकडून संशयीत दिसणाऱ्या उपजिविकेसाठी भटकणाऱ्या व्यक्ती तसेच समुह यांना मुले पळविणारे असल्याचे समजून विनाकारण मारहाण केल्या जात आहे. परिणामी मारहाणीत काही घटनांमध्ये संबंधिताचा मृत्यू सुद्धा झालेला आहे, असेही जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केलेल्या पत्रात नमूद केले आहे. 
00000


संजय गांधी निराधार
अनुदान योजनेची आज बैठक
 नांदेड दि. 2 :- महानगरपालिका हद्दीत (संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना) या विशेष सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष विनोद बियाणी यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार 3 जुलै 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 11 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे तहसिलदार संगांयो शहर नांदेड यांनी कळविले आहे.
000000


बांधकाम कामगारांसाठी
विशेष नोंदणी अभियान सुरु     
 नांदेड दि. 2 :-  अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम कामगारांसाठी 2 ते 31 जुलै 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात प्रत्यक्ष बांधकामाच्या साईटवर जाऊन कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांनी या नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वाय. एस. पडियाल यांनी केले आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व क्रीडाई नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या नोंदणी अभियानाचे काम सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शंभर ते 125 लाभार्थी बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. यावेळी  क्रीडाईचे अध्यक्ष गणेश कल्याणकर, बी. शिवकुमार तसेच क्रीडाईचे इतर पदाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल, सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख उपस्थित होते.
बांधकाम कामगारांनी या नोंदणी अभियानात आपला सक्रीय सहभाग नोंदवून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. तसेच बांधकाम क्षेत्रातील निगडीत असलेल्या सर्व बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार यांनी त्यांचेकडे काम करत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करावी. बांधकाम क्षेत्रात इतरत्र काम करणाऱ्या बांधकाम कामगारांने देखील नोंदणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय नांदेड उद्योग भवन तळ मजला औद्योगिक वसाहत शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वाय. एस. पडियाल व सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशमुख यांनी केले आहे.
00000


जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
कार्यालय देगलूर नाका येथे स्थलांतरीत     
 नांदेड दि. 2 :- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड हे कार्यालय शनिवार 30 जून 2018 पासून जिल्हा पशु वैद्यकीय सर्वचिकित्सालय, देगलूर नाका, नांदेड या कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 0.85 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात सोमवार 2 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 0.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 13.52 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 255.33 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 27.29 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 2 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.88 (316.15), मुदखेड- 4.00 (438.68), अर्धापूर- 2.67 (268.34), भोकर- निरंक (359.25), उमरी- निरंक (262.31), कंधार- निरंक (281.83), लोहा- निरंक (282.98), किनवट- 0.57 (170.42), माहूर- 2.50 (243.25), हदगाव- 1.57 (323.43), हिमायतनगर- निरंक (298.35), देगलूर-0.33 (103.00), बिलोली- निरंक (177.60), धर्माबाद- निरंक (206.65), नायगाव- निरंक (219.40), मुखेड- 1.00 (133.70). आज अखेर पावसाची सरासरी 255.33 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4085.34) मिलीमीटर आहे.
00000


वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा
पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड, दि. 2 :- वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर वस्तू व सेवाकर भवन नांदेड येथे रविवार 1 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यकर सहआयुक्त एम. एम. कोकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यकर उपाअयुक्त आर. टी. धनावत हे होते.
राज्यकर सहआयुक्त श्री. कोकणे यांनी वर्षेभरातील वस्तू व सेवा कराच्या कामगिरीच माहिती दिली. तसेच राज्यकर उपायुक्त धनावत यांनी येणाऱ्या काळातील वस्तु व सेवा कर समोरील आव्हाने आणि होऊ घातलेले तांत्रिक बदल याबद्दल माहिती दिली.
यावेळी मागील वित्तीय वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्यकर उपायुक्त आर. टी. धनावत, सहाय्क राज्यकर आयुक्त पी. एस. गोपनर, राज्यकर अधिकारी आनंद कल्लुरकर, राज्यकर निरीक्षक शिवाजी भोळे, संभाजी गोरे, कर सहाय्यक श्रीम, स्मिता शेळके, पांडुरंग कतुरे, कंधारे यांना सन्मानपत्र, पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रस्ताविक सहायक राज्यकर आयुक्त विकाय वैद्य यांनी केले. कार्यक्रमास सनदी लेखापाल संघटनेने अध्यक्ष सी. ए. अयलाने व कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष गंगाकिशन कांकर, सनदी लेखपाल, कर सल्लागार, व्यापारी प्रतिनिधी व वस्तू व सेवा कर भवन येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी राज्यकर अधिकारी तोटेवाड यांनी आभार मानले. वस्तु व सेवाकर कार्यालय परिसरात प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षारोपण करण्यात आले. आस्थापना शाखेच्यावतीने एम. आर. पुरी यांनी मौखिक आरोग्य तपासणी, त्वचा व केशविकार तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रकारे उत्साही वातावरणात वस्तू व सेवा कराचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आल्याचे वस्तु व सेवा कर विभाग नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
00000


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना
 पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह
समाज कल्याण कार्यालयास संपर्क साधावा
नांदेड, दि. 2 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016-17 या शैक्षणिक वर्षात पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे अशा विद्यार्थ्यांनी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाचा लाभ घेण्यासाठी मंगळवार 10 जुलै 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन नांदेड येथे कागदपत्रासह संपर्क साधवा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. सन 2016-17 मध्ये उत्तीर्ण झालेल्या परिक्षेचे गुणपत्रक. सन 2017-18 मध्ये शिकत असलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड. सुधारीत आय.एफ.एस. सी कोडसह बँक पासबुकची झेरॉक्स प्रत. सन 2017-18 मध्ये शिकत असलेल्या महाविद्यालयाचे किमान 75 टक्के हजेरीसह उपस्थिती प्रमाणपत्र.
सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेसाठी अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी या सुचनेप्रमाणे कार्यालयास संपर्क करावा. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी किमान 60 टक्के गुण मिळविलेले असावेत. 60 टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या किंवा एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना सन 2017-18 चा लाभ मिळणार नाही. जे विद्यार्थी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात कोणत्याही कोर्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते उदा. बीए, बीएससी, बीकॉम, पॉली तृतीय वर्ष, एमए, एमएससी, एमकॉम द्वितीय वर्षे, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ शेवटचे वर्षे व इयत्ता बारावी या विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधू नाही. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी या सुचना गृहित धराव्यात. दि. 10 जुलै 2018 या तारखेपर्यंत संपर्क न झाल्यास विद्यार्थ्यांचा लाभ देण्यास विचार केला जाणार नाही, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


लोहा तहसील प्रांगणात वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त वृक्षारोपण
शासनाच्‍या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत
लोहा-कंधार तालुका वृक्षमय करावा :  आमदार चिखलीकर
        नांदेड, दि. 2 :- हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांचा जन्‍मदिन हा कृषी दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. सध्या पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. ही बाब विचारात घेता वृक्षांची संख्‍या वाढविणे आवश्‍यक आहे.  शासनाने 13 कोटी वृक्ष लागवड करण्‍याचा महत्‍वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून सदर कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक झाडे लावून ती जगवावी व लोहा-कंधार तालुका वृक्षमय करावा, असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त शासनाच्‍या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ 1 जुलै रोजी तह‍सील कार्यालयाच्‍या प्रांगणात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण करुन करण्‍यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी आयोजीत समारंभात स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्‍यात आले.
विभागीय आयुक्‍त औरंगाबाद पुरूषोत्‍तम भापकर यांच्‍या निर्देशानुसार, जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या आदेशानुसार व अप्‍पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी रोहयो महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली उप विभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांच्‍या सुक्ष्‍म नियोजनात लोहा तालुक्‍यात वृक्षारोपणाची कार्यवाही करण्‍यात येत आहे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात तहसीलदार ड. आशिषकुमार बिरादार म्हणाले 13 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्‍वकांक्षी कार्यक्रम आहे. 1 जुलै ते 31 जुलै हा महिना वृक्ष लागवड महिना म्‍हणून साजरा करीत आहे. त्‍या अनुषंगाने महाराष्‍ट्र शासनाच्‍या अखत्‍यारीतील सर्व कार्यालय, ग्रामपंचायती, शाळा यांच्‍या परिसरामध्‍ये तसेच मोकळया जागेत, रस्‍त्‍याच्‍या कडेला वृक्ष लागवड करावयाचे आहे. त्‍याची सुरूवात 1 जुलै या कृषी दिनापासून करण्‍यात आली आहे.
तालुका कृषी अधिकारी विश्‍वांभर मंगनाळे यांनी यावेळी कृषी दिनाचे महत्‍व विषद केले. त्‍यांनी यावेळी कृषी विभागाच्‍या पिक विमा, पिक कर्ज याबाबतची परिपुर्ण माहिती दिली. पिक विमा भरण्‍याची मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै 2018 व कर्जदार शेतक-यांसाठी 30 जुलै आहे. ऐनवेळी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी शेतक-यांनी तात्‍काळ महा-ई सेवा केंद्र/आपले सरकार पोर्टल/स्‍वत: ऑनलाईन इंटरनेटवर विम्‍याचा हप्‍ता भरावा, असे आवाहन केले.
सामाजीक वनिकरण परिक्षेत्र कंधार-लोहाचे वनक्षेत्रपाल तौर यांनी वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्‍ध असल्‍याचे सांगून वृक्ष लागवड मोठया प्रमाणात करण्‍यासाठी त्‍यांच्‍या विभागाकडून रोपे उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील. सर्व संबंधीतांनी त्‍यांच्‍या कार्यालयाशी तात्‍काळ संपुर्ण साधून आवश्‍यक तेवढे सर्व रोपे उपलब्‍ध करुन घ्‍यावे, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
यावेळी कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, डीवायएसपी मोरे, तहसीलदार डॉ. बिरादार, कंधारच्‍या तहसीलदार श्रीमती अरुणा संगेवार, गटविकास अधिकारी पी.पी. फांजेवाड, तालुका कृषी अधिकारी विश्‍वांबर मंगनाळे, कंधार-लोहा परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तौर, जिल्‍हा परिषद सदस्‍या प्रणीताताई चिखलीकर-देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, चंद्रसेन पाटील, लोहा पंचायत समितीचे सभापती सति पाटील उमरेकर, कृषी उत्‍पन्न बाजार समिती सभापती बालाजी पाटील मारतळेकर, उपसभापती बळी पाटील जानापुरीकर, पंचायत समिती सदस्‍य नरेंद्र गायकवाड, गुलाब पाटील, तिडके, शरद पवार, दत्‍ता वाले, भास्‍कर पवार, शेषराव चव्‍हाण, नामदेव पाटील पवार, पत्रकार शेख, नायब तहसीलदार एस.पी. जायभाये, अशोक मोकले, एस.एम. देवराये, सारंग चव्‍हाण, आदीसह अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.
000000


मुलांचे शासकीय वसतिगृहात
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
 नांदेड, दि. 2 :-  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागे बाफना रोड नांदेड येथे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 49 रिक्त जागांसाठी दहावी उत्तीर्ण असलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मोफत वितरीत करण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज गृहपाल मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) नांदेड येथे सादर करावे असे अवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) नांदेड यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत या वसतिगृहात अनुसुचित जाती 35 जागा, विशेष मागास प्रवर्ग 2 अपंग 3, अनाथ 2 याप्रमाणे जागा रिक्त आहेत. त्याकरीता दिनांक 20 ऑगस्ट 2018 पर्यंत पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृहात अर्ज सादर करावे. प्रवेश हे गुणवत्ता व आरक्षणावर अधारीत असुन प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2017-18 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमीक परीक्षेत वसतिगृहाचा निकाल 100 टक्के लागला असुन 12 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...