Monday, July 2, 2018


अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका
महाराष्ट्र सायबरचे जनतेला आवाहन

             
मुंबई, दि २: राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणींच्या घटना घडत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे महाराष्ट्र सायबरने आवाहन केले आहे.
            समाज माध्यमांवरून पडताळणी न करता चुकीच्या पोस्टर्स प्रसारित करणे, कोणतीही खातरजमा न करता अफवा पसरविणे, संदेश फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. या गुन्ह्याबद्दल भारतीय दंड विधान कलम ५०५ कडक शिक्षा होऊ शकते. याकडे महाराष्ट्र सायबरने लक्ष वेधले आहे.
 राज्यभरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबतचे पोस्टर्स, व्हिडीओज समाजमाध्यमांद्वारे कोणतीही खातरजमा न करता व्हायरल केले जात आहेत. त्यातून एखाद्या व्यक्तीवर किंवा गटावर संशय घेऊन त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत आणि राज्यात शांततेचे आणि सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी नागरिकांनी कुठल्याही व्यक्ती अथवा गटाबद्दल संशय आल्यास त्वरित संबंधित पोलीस स्टेशन, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठीत नागरिक कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.
            आपल्या आवाहनात सायबर सेलने म्हटले आहे की, मुले पळविण्याच्या अफवा पसरविण्याने समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणे सर्वांसाठीच धोकादायक आहे. जनतेने अशा अफवांना बळी न पडता सत्यता पडताळून पहावी. समाज माध्यमांच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर येणाऱ्या माहितीची कोणतीही शहानिशा न करता निरपराध व्यक्तींना मारहाण करून मारून टाकण्याच्या घटना अतिशय गंभीर आहेत. नागरिकांनी कायदा घेऊन एखाद्याला इजा केल्यास शिक्षा होऊ शकते, असेही त्यांनी आवाहनात म्हटले आहे.
0000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...