Wednesday, May 20, 2020


व्यवसायिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात
नांदेड शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल  
नांदेड, दि. 20 :-कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात कोरोना विषयक नियम लागू केले आहेत. नांदेड वाघाळा शहर महापालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुसऱ्या दिवशी सहा दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 19 व 20 मे या दोन दिवसात नांदेड शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. व्यवसायिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील दुकाने सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली. तर काही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निश्चित केलेल्या नियम व अटी न पाळणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त विलास भोसीकर व सुधिर इंगोले यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार 20 मे रोजी दुसऱ्या दिवशी या पथकाने गुरुकृपा कलेक्शन रविनगर चौक कौठा, अपना ड्रेसेस वजिराबाद, लक्ष्मी कापड श्रीनगर नांदेड, मयुर मेन्स वेअर आनंदनगर नांदेड या दुकानांना परवानगी नसताना दुकाने उघडल्याबद्दल तसेच आर.सी.एफ शॉपर्स मार्ट श्रीनगर नांदेड, महालक्ष्मी ऑईल शोरुम आनंदनगर नांदेड यांनी दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त लोक जमविल्यामुळे तर बालाजी किराणा ॲन्ड जनरल स्टोअर्स सिडको यांनी निर्धारित वेळेवर दुकाने बंद न केल्याने या सात दुकानांना पथकाच्यावतीने प्रत्येकी 5 हजार रुपये असे कएुण 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
तसेच मंगळवार 19 मे रोजी या पथकाने नांदेड शहरातील सहा व्यवसायिकांनी सुरक्षित अंतर न ठेवणे, दुकाने उघडण्याची परवानगी नसताना दुकाने उघडणे, ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने बंद न करणे यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये दंड वसुल केला आहे. दोन दिवसात एकुण 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले यांच्या पथकाने रमेश चवरे, औकार स्वामी, अशोक भांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
00000


कोरोनाचे नवीन चार रुग्ण
64 स्वॅबची तपासणी चालू
नांदेड, दि. 20 :- कोरोना विषाणु संदर्भात बुधवार 20 मे 2020 रोजी सायं. 7 वा. नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवार 20 मे रोजी प्राप्त एकुण 13 अहवालापैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहचली असून उर्वरीत 31 नवीन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले तर 33 स्वॅब प्रलंबित असून एकुण 64 स्वॅबची तपासणी चालू आहे.  
नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे 24, 32, 33, 54 आहे. स्नेहनगर पोलीस कॉलनी, सांगवी नांदेड, तालुका मुखेड, भोकर येथील प्रत्येक एक याप्रमाणे 4 रुग्ण असून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे, एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय मुखेड व एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय भोकर येथे औषधोपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे.  एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला तर 36 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनाचे 67 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्ण, तर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे 2 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे एक रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
 सर्व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


अनुदानावर मिनि ट्रॅक्टर योजना 153 बचतगट पात्र
ईश्वर चिठ्ठीने (लकी ड्रॉ) बचतगटांची निवड होणार ;
सोडतीचा दिनांक लवकर कळविला जाणार  
नांदेड, दि. 20 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर, त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत एकूण 153 बचतगट पात्र झाले असून ईश्वर चिठ्ठीने (लकी ड्रॉ) पात्र बचत गटांपैकीच निवड होणार असून सोडतीची वेळ आणि दिनांक यथावकाश लवकर कळविण्यात येणार आहे, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन 2018-19 या वर्षात ज्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी अर्ज केला  होता. त्या सर्व अर्जांची तपासणी केली असता अर्जात त्रुटी आढळून आल्या असून एकुण 153 बचत गटांनी त्रुटीची पूर्तता केली आहे. पात्र व अपात्र बचतगटांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शनी ठिकाणी लावण्यात आली आहे. अर्ज केलेल्या सर्व बचत गटांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी यापूर्वीच चार वेळा संधी देण्यात आली होती. पहिली संधी 10 जुलै 2019 पर्यंत तर दुसरी 12 डिसेंबर 2019 पर्यंत  तिसरी संधी 30 डिसेंबर 2019 पर्यंत आणि चौथी संधी 14 फेब्रुवारी 2020 पर्यंत देण्यात आली होती.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...