Monday, March 18, 2024

 वृत्त क्र. 252

 

शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही

 

जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब

   

नांदेड दि. 18 :- भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश 16 मार्च 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.

 

लाऊडस्पिकर बंदी

ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर 

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सक्षम अधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावर ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी आणि रात्री. 10 वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश नांदेड जिल्ह्यासाठी 6 जून 2024 रोजीपर्यत अंमलात राहील.

 

विश्रामगृह वापरावर निर्बंध

कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध

निवडणूकीचे कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे याठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्याग्रह करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणणे,इत्यादी कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आले. हे आदेश नांदेड जिल्ह्यासाठी 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

 

परिसरात कालबद्ध निर्बंध

जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्त्यावरील वाहतुकीस प्रतिबंध

 

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय(जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड)येथे नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी उमेदवारांची गैरसोय व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यादृष्टीने नांदेड वाघाळा महानगरपालिका, नांदेड कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मालपाणी बिल्डिंगपर्यत दिनांक 28 मार्च ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत शासकीय सुट्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यत केवळ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांच्या वाहनाच्या ताफ्यात तीन वाहने व शासकीय कर्तव्य पार पाडणारे शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे वाहने वगळता इतर सर्व वाहनास या रस्त्यावरुन वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या कालावधीत श्याम टॉकीज ते चिखलवाडीकडे जाणाऱ्या वाहनास शिवाजी महाराज यांच्या पुतळया समोरील पोस्ट ऑफीस व न्यायालय मधील मार्गाद्वारे चिखलवाडीकडे येणास पर्यायी मार्ग देण्यात आला आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

 

शासकीय वाहनाचा गैरवापर नको

नांदेड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

 

संबंधित पक्षाचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके,

सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर प्रतिबंध

संबंधित पक्षांचे चित्रे/चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

 

मालमत्तेची विरुपता नको

शासकीय, निमशासकीय,सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध 

निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील.

 

शस्त्रास्त्रे वाहण्यास बंदी

 

शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर व शस्त्र बाळगण्यास बंदी 

 

निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे दिनांक 20 सप्टेंबर 2014 च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारके व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवाना दिलेली शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यास व शस्त्र बाळगण्यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहतील. 

 

नामनिर्देशनपत्र दाखल करताना अवलंब करावयाची कार्यपद्धत

निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक‍ प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. तसेच वाहनाच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात आणण्यास, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमित झाल्यापासून 6 जून 2024 पर्यत अंमलात राहील. 

 

मतदान केंद्र परिसरात 144 कलम

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेदरम्यान, नांदेड जिल्ह्यात ज्याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्यास, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता 26 एप्रिल 2024 रोजी प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश मतदानाच्‍या दिवशी  26 एप्रिल 2024 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यन्‍त अंमलात राहील.

00000


 वृत्त क्र. 251 

नांदेड नगरीमध्ये भव्य कव्वाली महोत्सवाचे उद्घाटन 

 

मतदानाचे कर्तव्य विसरू नका - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

नांदेड दि. 18  सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्कृतीचे जतन व संवर्धन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा नांदेड नगरीमध्ये भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुम नाट्यगृह नांदेड येथे  भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन दिनांक १८ मार्च ते २० मार्च, २०२४ दरम्यान करण्यात आले आहे.

 

हा कार्यक्रम पूर्वनियोजित, शासकीय व विहित परवानगीने घेण्यात येत आहे. कव्वाली महोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. याप्रसंगी बोलताना माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व नागरिकांना कव्वाली महोत्सवात कव्वालीच्या मनोरंजना सोबतच प्रबोधनाचा आनंद घेण्यासाठी प्रेरीत केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये निपक्षपातीपणे मतदान सर्वांनी करावे असे आवाहन केले. 

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीराम पांडे सहसंचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले. विकास माने उपविभागीय अधिकारी नांदेड, श्रीमती रेखा काळम कदम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात मतदान करण्याबाबत शपथ देखील घेण्यात आली.

 

कव्वाली, मुशायरा व संगीतावर आधारित असा भव्य सांस्कृतिक महोत्सव येत्या 18 मार्च ते 20 मार्च 2024  दररोज सायंकाळी 7 वाजता कुसुम नाट्यगृह नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या प्रथम पुष्पात दिनांक 18 मार्च 2024 रोजी सुप्रसिध्द चित्रपट गायक महेश जैन यांचे सादरीकरण करण्यात आले. सुप्रसिध्द गायिका श्रीमती रागेश्री जोशी, जालन्याच्या प्रसिद्ध गायिका, फनकार श्रीमती निकीता बंड, सुप्रसिध्द कव्वाल श्री. शिवकुमार मठपती सुप्रसिध्द कव्वाल स्वराज राठोड  यांचे सादरीकरण झाले.

 

हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असून या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी भरभरुन आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

00000







 वृत्त क्र. 250

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी

 

शासनाकडून विविध विभागाच्या बैठका सुरू

 

नांदेड दि. 18 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रशासन झपाट्याने कामाला लागले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या बैठका घेण्यात आल्या. राजकीय पक्ष, बँकांचे प्रतिनिधी, मुद्रक प्रकाशक,स्वीप जनजागृती, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती यांच्यासह विविध स्तरावर बैठकी आज सुरू होत्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सर्वप्रथम मुद्रक व प्रकाशकांची तसेच प्रकाशन संस्थांच्या मालकांची बैठक घेण्यात आली. निवडणूक काळामध्ये पत्रके, पोस्टर, इत्यादींची छपाई व प्रकाशन लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 127 मधील तरतुदीनुसार करण्यात येते. या अंतर्गत छापील साहित्याचे मुद्रक कोण व प्रकाशक कोण हे छापणे बंधनकारक आहे. याशिवाय साहित्य प्रकाशित करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले.

 

निवडणूक काळामध्ये कोणीही कोणाच्या नावाने किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही साहित्य प्रकाशित करू शकत नाही. त्यामुळे निवडणूक संदर्भातील मजकूर प्रकाशित करताना मुद्रक प्रकाशकांनी काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

दुसरी बैठक राजकीय पक्षांची घेण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या अंमलबजावणी पासून तर निवडणूक संपेपर्यंतच्या कार्यक्रमाबाबतची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.याशिवाय जिल्ह्यातील मतदारांची संख्या पोस्टल वोटिंग कशा पद्धतीने होईल, केंद्रांची माहिती, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बद्दल शंका समाधान आणि मतदान करताना मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

 

या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्यालेखा अधिकारी डॉ. जनार्धन पकवाने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी अनेक शंकांचे समाधान करून घेतले.

 

नांदेड जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रशासनाला उत्तम सहकार्य लाभले असून सर्व समित्या कार्यान्वित झाल्या असून कोणत्याही माहितीसाठी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यादरम्यान कोणतीही माहिती लागल्यास एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

या एक खिडकी कक्ष अंतर्गत उमेदवारांना वाहन परवाने झेंडे, पताके,चित्ररथ, मोबाईल व्हॅन,चौक सभा, जाहीर सभा, रॅली,उमेदवारांचे तात्पुरते प्रचार कार्यालय, हेलीपॅडचे अक्षांश रेखांश तसेच माध्यम प्रमाणीकरण व  सनियंत्रण कक्षाकडून एसएमएस, ऑडिओ आणि व्हिडिओ व इतर प्रचार साहित्य परवानग्या देण्यासाठी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

तत्पूर्वी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माध्यम प्रमाणीकरण सनियंत्रण समिती तर उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी स्वीप उपक्रमाची बैठक घेतली. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज कॅम्पस एम्बेसिडर व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

0000



वृत्त क्र. 249 17.3.2024.

 प्रकाशक, मुद्रक यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक 

नांदेड दि.17 – आचारसंहिता लागल्यानंतर वृत्तपत्रांचे मुद्रक आणि प्रकाशक यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती देण्यासाठी उद्या चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक आहे. सर्व मुद्रक प्रकाशकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे. यासाठी लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाची व त्या अनुषंगाने निवडणूक आचार संहितामध्ये करावयाच्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वृत्तपत्रांचे प्रकाशक, मुद्रक यांची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 18 मार्च 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वृत्तपत्रांचे प्रकाशक, मुद्रक यांनी या बैठकीस स्वत: उपस्थित राहावे, प्रतिनिधीस पाठवू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...