Monday, March 18, 2024

 वृत्त क्र. 250

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी

 

शासनाकडून विविध विभागाच्या बैठका सुरू

 

नांदेड दि. 18 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रशासन झपाट्याने कामाला लागले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या बैठका घेण्यात आल्या. राजकीय पक्ष, बँकांचे प्रतिनिधी, मुद्रक प्रकाशक,स्वीप जनजागृती, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती यांच्यासह विविध स्तरावर बैठकी आज सुरू होत्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सर्वप्रथम मुद्रक व प्रकाशकांची तसेच प्रकाशन संस्थांच्या मालकांची बैठक घेण्यात आली. निवडणूक काळामध्ये पत्रके, पोस्टर, इत्यादींची छपाई व प्रकाशन लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 127 मधील तरतुदीनुसार करण्यात येते. या अंतर्गत छापील साहित्याचे मुद्रक कोण व प्रकाशक कोण हे छापणे बंधनकारक आहे. याशिवाय साहित्य प्रकाशित करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले.

 

निवडणूक काळामध्ये कोणीही कोणाच्या नावाने किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही साहित्य प्रकाशित करू शकत नाही. त्यामुळे निवडणूक संदर्भातील मजकूर प्रकाशित करताना मुद्रक प्रकाशकांनी काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

दुसरी बैठक राजकीय पक्षांची घेण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या अंमलबजावणी पासून तर निवडणूक संपेपर्यंतच्या कार्यक्रमाबाबतची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.याशिवाय जिल्ह्यातील मतदारांची संख्या पोस्टल वोटिंग कशा पद्धतीने होईल, केंद्रांची माहिती, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बद्दल शंका समाधान आणि मतदान करताना मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

 

या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्यालेखा अधिकारी डॉ. जनार्धन पकवाने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी अनेक शंकांचे समाधान करून घेतले.

 

नांदेड जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रशासनाला उत्तम सहकार्य लाभले असून सर्व समित्या कार्यान्वित झाल्या असून कोणत्याही माहितीसाठी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यादरम्यान कोणतीही माहिती लागल्यास एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

या एक खिडकी कक्ष अंतर्गत उमेदवारांना वाहन परवाने झेंडे, पताके,चित्ररथ, मोबाईल व्हॅन,चौक सभा, जाहीर सभा, रॅली,उमेदवारांचे तात्पुरते प्रचार कार्यालय, हेलीपॅडचे अक्षांश रेखांश तसेच माध्यम प्रमाणीकरण व  सनियंत्रण कक्षाकडून एसएमएस, ऑडिओ आणि व्हिडिओ व इतर प्रचार साहित्य परवानग्या देण्यासाठी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

तत्पूर्वी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माध्यम प्रमाणीकरण सनियंत्रण समिती तर उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी स्वीप उपक्रमाची बैठक घेतली. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज कॅम्पस एम्बेसिडर व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

0000



No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...